स्वाइन फ्लूची लक्षणे दिसताच उपचार घ्या

तज्ज्ञांचा सल्ला; गर्दी, बदलत्या हवामानामुळे धोका

नाशिक : प्रतिनिधी
मधेच कडक ऊन, तर कधी तुफान पाऊस असे काहीसे वातावरण सध्या नाशिककर अनुभवत आहेत. ऑक्टोबर हीटसारखे सकाळी आणि दुपारच्या वेळात उन्हाचा चटका आणि सायंकाळी पावसाच्या जोरदार सरी, अशा वातावरणामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. बदलते हवामान, वाढलेली आर्द्रता आणि सण-उत्सवानिमित्ताने होणारी गर्दी यामुळे स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत गर्भवतींंनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. ताप, खोकला, अंगदुखी किंवा श्वसनाचा त्रास सुरू झाल्यास स्वतःहून औषधे न घेता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे तज्ज्ञ सांगताहेत.
गणेशोत्सवादरम्यान 18 दिवसांत स्वाइन फ्लू रुग्णांची संख्या 114 झाल्याचे नुकतेच समोर आले. डेंग्यू, मलेरिया आणि तापाच्या आजारानंतर स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढत आहेत. आतापर्यंत शहर आणि ग्रामीण भागातील 11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे डॉक्टरांकडून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ताप, खोकला, घसादुखी, अंगदुखी यांसारखी लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता वेळेत वैद्यकीय सल्ला घेणे आणि आवश्यक तपासणी करणे महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
स्वाइन फ्लूमध्ये तापासोबत खोकला, घसादुखी आणि सर्दी अधिक दिसते. डेंग्यूमध्ये तीव्र अंगदुखी, डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे व मळमळ यांसारखी लक्षणे दिसतात. मात्र, केवळ लक्षणांवरून निश्चित निदान करता येत नसल्याने आवश्यकतेनुसार तपासणी करणे महत्त्वाचे आहे.
गर्भवती महिला, 65 वर्षांवरील व्यक्ती, पाच वर्षांखालील मुले, तसेच दमा, मधुमेह, हृदय किंवा फुफ्फुसाचे आजार आणि रोगप्रतिकारकशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना स्वाइन फ्लूमुळे गंभीर आजाराचा धोका अधिक असू शकतो. ताप, खोकला किंवा अंगदुखी सुरू झाल्यास या व्यक्तींनी विशेषतः लवकर डॉक्टरांशी संपर्क साधावा.
श्वास घेण्यास त्रास, छातीत दुखणे, गोंधळ, अत्यंत अशक्तपणा किंवा निर्जलीकरण जाणवत असल्यास तातडीने रुग्णालयात जावे. गर्भवतींंनी उपचारास विलंब करू नये. स्वाइन फ्लूचे निदान झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रति फ्लू औषधोपचार सुरू करणे आवश्यक आहे.

ही आहेत लक्षणे
स्वाइन फ्लूची सुरुवात अचानक ताप, थंडी वाजणे, अंगदुखी, डोकेदुखी, खोकला, घसा दुखणे आणि अशक्तपणा या लक्षणांनी होऊ शकते. मात्र, श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणे किंवा दाब जाणवणे, अत्यंत अशक्तपणा, चक्कर किंवा गोंधळ होणे, लघवी कमी होणे, झटके येणे यांसारखी गंभीर लक्षणे. मुलांमध्ये जलद श्वास, ओठ किंवा चेहरा निळसर होणे, बरगड्या आत ओढल्या जाणे आणि तीव्र डीहायड्रेशन ही धोक्याची चिन्हे आहेत.

असे घ्या उपचार
स्वाइन फ्लूच्या निदानासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने नाक किंवा घशातील नमुन्याची आरटी-पीसीआर अथवा अन्य इन्फ्लुएन्झा चाचणी केली जाऊ शकते.
ताप, खोकला व घसादुखी तीन दिवसांपेक्षा जास्त काळ रहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
उपचारास विलंब झाल्यास न्यूमोनिया, श्वसनसंस्था निकामी होणे, तसेच अनेक अवयव निकामी होण्याचा धोका असतो.

स्वाइन फ्लू आणि डेंग्यू लक्षणांमधील फरक
घटक                            स्वाइन फ्लू                                     डेग्यू
मुख्य लक्षणे           खोकला, घसादुखी, नाक गळणे,       तीव्र सांधे, अंगदुखी,                                      श्वासाचा त्रास                                   डोळ्यामागचे दुखणे
त्वचेवर परिणाम    पुरळ येत नाही                                 अंगावर लाल पुरळ येते
रक्त तपासणी       पांढर्‍या पेशी सामान्य किंवा कमी      प्लेटलेट झपाट्याने कमी
प्रसाराचा मार्ग        खोकला, शिंकेतून                             एडिस डासाच्या दंशाने

स्वाइन फ्लू हा श्वसनमार्गातून पसरणारा संसर्ग आहे. खोकताना किंवा शिंकताना बाहेर पडणारे थेंब, जवळचा संपर्क तसेच दूषित हात किंवा पृष्ठभागाच्या संपर्कातून त्याचा प्रसार होऊ शकतो. गर्दीच्या ठिकाणी लोकांमधील जवळचा संपर्क वाढत असल्याने संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे शक्यतो गर्दीची ठिकाणे टाळावीत आणि गर्दीत जाणे आवश्यक असल्यास मास्कचा वापर करावा.
– क्षितिजा राहुल गायकवाड (एम.एस्सी.-फूड सायन्स अँड न्यूट्रिशन)

गर्भवती महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच मधुमेह, हृदयरोग व फुफ्फुसाचे आजार असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. वेळेत तपासणी व उपचार न झाल्यास न्यूमोनिया आणि श्वसनप्रक्रियेत गुंतागुत होऊ शकते. फ्लू लसीकरण, वारंवार हात धुणे, गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर आणि योग्य वैद्यकीय सल्ला घेणे प्रतिबंधासाठी महत्त्वाचे आहे.
– डॉ. नीलेश वाघ, छातीविकारतज्ज्ञ

स्वाइन फ्लू आणि डेंग्यू या दोन्ही आजारांमध्ये ताप येत असला तरी त्यांची लक्षणे आणि संसर्गाचा मार्ग वेगळा आहे. स्वाइन फ्लूमध्ये खोकला, घसा खवखवणे, नाक वाहणे यांसारखी श्वसनविषयक लक्षणे दिसतात, तर डेंग्यूमध्ये तीव्र तापासोबत अंगदुखी, डोळ्यांच्या खोबणीमागे वेदना, पुरळ किंवा रक्तस्रावाची लक्षणे दिसू शकतात. तापासोबत अशी लक्षणे आढळल्यास नागरिकांनी स्वतःहून औषधोपचार न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन आवश्यक तपासण्या करून घ्याव्यात.
– डॉ. सतीश शिंपी, जिल्हा शल्यचिकित्सक

Seek treatment as soon as symptoms of swine flu appear.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *