*शंभू राजे… तुम्ही असे केले असते तर…!*
डॉ. संजय धुर्जड.*
सुदर्शन हॉस्पिटल, नाशिक.
9822457732
“देश धरम पर मिटनेवाला, शेर शिवा का छावा था… महापराक्रमी महाप्रतापी, एक ही शंभू राजा था”… अशा या शंभू राजांची आज पुण्यतिथी आहे. १६८९ सलाचा तो काळा दिवस. कल्पना केली तरी शहारे येतात, डोकं सुन्न होतं. याच दिवशी, या मातीत, न भूतो न भविष्यती अशी वेदनादायी, क्लेशदायी, कुणाच्याही काळजाला भोक पाडेल अशी, क्रूरतेलाही लाजवेल आणि दुश्मनालाही कुणी इतकी कठोर आणि शिक्षा देणार नाही, अशी महाभयंकर मृत्युदंडाची शिक्षा औरंगजेबाने छत्रपती संभाजी राजांना दिली.
त्यानंतर जे घडले त्याची औरंगजेबाने स्वप्नातही कल्पना केली नसणार. मराठे चवताळले, राजा नसतांना पुढील आठ नऊ वर्षे स्वराज्य राखत, शेवटी त्याला याच महाराष्ट्र भूमीत गाडलं, हा आपल्याला माहीत असलेला इतिहास आहे. तो बदलू शकला असता, असं मला वाटतं. त्या शेवटच्या काही दिवसांत संभाजी महाराजांनी वेगळा विचार केला असता, तर नक्कीच तेव्हाचा इतिहास आणि आजचे वर्तमान खुपच वेगळे राहिले असते, असे मला नेहमी वाटते.
१६८० मध्ये शिवाजी महाराजांच्या अकाली मृत्यू नंतर पुढील फक्त नऊ वर्षे त्यांचा कार्यकाळ. ९ वर्षांत १२० लढाया, पैकी एकही न हारलेली, सर्वच्या सर्व जिंकलेल्या. एकाच वेळी चार शाह्या, इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, सिद्धींसारख्या विदेशी घुसखोर आणि स्वराज्यातील अंतर्गत दुश्मनांना तोंड देत, स्वराज्याच्या आठी दिशांच्या सीमा शाबूत ठेवून सर्वांना एकहाती रोखून धरणे, सोपे कार्य नव्हे. सिंहाच्या जबड्यात हात घालून दात मोजणारे छत्रपती संभाजी महाराज, शेवटी छल-कपटानेच पकडले गेले आणि त्यांचा त्यात दुर्दैवी मृत्यू झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या तालमीत तयार झालेले संभाजी राजे. त्या दोघांत अनेक गोष्टींत साम्य होते, तर काहींत अगदी विरोधाभास. स्वराज्याप्रती आस्था, रायतेसाठीची तळमळ, दुश्मनांविषयीचे धोरण, आक्रमकता, गनिमी काव्यात असलेलं पारंगत्या, जीवाला जीव देणारी माणसं निर्माण करणं, शूर आणि वीर सैनिकांचा यथोचित सन्मान सत्कार करणं, शहिदांच्या कुटुंबियांचे संतावन आणि पुनर्वसन करणं, महिलांबद्दल आणि ज्येष्ठांबद्दल आदर, साधू संतांविषयी लीनता, कुलदेवतांविषयी भक्ती भाव, अशी साम्ये दोन्ही छत्रपतींमध्ये होती.
एक खूप मोठा फरक मला दोन्ही राजांमध्ये प्रकर्षाने जाणवतो. प्रतिकूल, बिकट आणि धोक्याच्या प्रसंगी दोघांच्या विचारांत आणि त्याच्या प्रतिसादात फरक होता. युद्धाचे आणि आक्रमणाचे डावपेच आखण्यात दोघेही तरबेज, परंतु, एखाद्या परिस्थितीला हाताळण्याच्या क्षमतेत फरक होता. शिवाजी राजांनी कधीही स्वतःचा किव्हा सामान्यातील सामान्य सैनिकांचा जीव धोक्यात येईल असे काही केले नाही. कुठवर रेटायचे, कुठे थांबायचे, कुठे पळ काढायचा, कुठे शब्द पाळायचे तर कुठे फिरवायचे, कुठे धाडस करायचे आणि कुठे सावध रहावे, कुठे शरणागती तर कुठे तह करायचा, कुठे आत्मसन्मान बाळगायचा आणि कुठे सोडायचा, कुठे अधिकार दर्शवायचा तर कुठे तो द्यायचा, कुठे तो मराठी बाणा काढायचा आणि कुठे म्यान करायचा… याचा परफेक्ट बॅलन्स शिवाजी महाराजांनी साधला.
प्रत्येक लढाईत, प्रत्येक कठीण प्रसंगी, प्रत्येक जय आणि पराजयात त्यांनी स्वतःची बलस्थाने आणि कमजोरी ओळखली. कुठे संधी आहे आणि कुठे धोका, हे जाणून घेत युद्ध केले. (याला हल्लीच्या मॅनेजमेंटच्या भाषेत SWOT अँनलिसिस म्हणतात). इथे संभाजी महाराज थोडे कमी पडत, असे मला वाटते. शिवाजी महाराजांचे निर्णय आणि त्यांची नीती तर्कांवर आधारित असे, तर संभाजी महाराजांची नीती आणि निर्णय तर्कांपेक्षा भावनेवर अधिक आधारलेले होते.
पुरंदराची लढाई हरणार, राजे जयसिंगच्या इतक्या विशाल सैन्यापुढे आपली वाताहत होणार, आपले अनेक शुरविर सरदार आणि सैनिक मारले जाणार हे ओळखून महाराजांनी जयसिंघाशी संधी, तह करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या सांगण्यानुसार ते आग्र्यालाही गेले. तिथे अपमान झाला, तो सहन झाला नाही. परंतु, नंतर लक्षात आले की आपण स्वराज्यपासून हजारो मैल दूर आहोत, इथे आपला बचाव करण्यासाठी कुणीही नाही. इथे आपल्या जीवाला धोका आहे, म्हणून वेळेत सावध होऊन योजना आखली.
वाऱ्यालाही पत्ता लागला नाही, की कडेकोट बंदोबस्तातुन सर्वच्या सर्व सहाशे लोक सुखरूप स्वराज्यात परत कसे आले. हे गूढ आजही कुणाला उमगले नाही, फक्त त्या राजाला आणि त्यांच्या मनाला माहीत. तिथे काही गडबड केली असती, किव्हा गडबड झाली असती, तर किमान शिवाजी महाराज आणि शंभू राजे हे दोन जीव तर नक्कीच गेले असते. तिथून ते वाचले, म्हणून स्वराज्याचा डाव पुढे चालू राहिला. असाच काही विचार संभाजी राजांनी त्यांना अटक झाल्यानंतर केला असता तर… ?
तर काय झाले असते ? याचा विचार केला तर, असे वाटते की कदाचित संभाजी महाराजांनी दोन पावले मागे सरत, जीव वाचवला असता, तर पुढे खूप काही वेगळे घडू शकले असते. ठीक आहे, मुघलिया सलतनत मान्य करत धर्मांतर करण्याचा निर्णय घेणे जिव्हारी लागणारे होते, हे मान्य आहे. परंतु, काहीतरी कारणं काढून वेळकाढुपणाचे धोरण स्वीकारले असते, योग्य संधीच्या प्रतीक्षेत राहून वेळ आल्यावर प्रतिहल्ला किव्हा पळ काढला असता तर किमान जीव तरी वाचला असतं. पुढे भविष्यात काहीही घडू शकले असते.
कदाचित शंभू राजे काही काळ असते, तर मुघलशाहीच नव्हे तर कुठलीच शाही, इंग्रज, फ्रेंच, डच, आफ्रिकी यांपैकी एकही परकीय नसल या भारत भूमीवर शिल्लक राहिली नसती. आक्रमक वृत्ती मुळे १२० लढाया जिंकल्या जरून, पण जीवाशी आलेली लढाई हारले, हे सत्य पचनी पडत नाही. वयाच्या ३२व्या वर्षी मृत्यूला कवटाळले. ९ वर्षांचा शासन काळ आणखी १५ – २० वर्षे वाढला असता तरी चमत्कार झाला असता. हे हिंदू राष्ट्र तेव्हाच बनले असते, फक्त थोडं शांत डोक्याने विचार केला असता तर.
हिंदू धर्माच्या रक्षणाकरिता काही काळ दुसरा धर्म स्वीकारला असता तर ? त्या बाक्या प्रसंगी शिवाजी राजांसारखं SWOT अँनलिसिस केलं असतं तर ? स्वराज्याच्या हितासाठी दोन पावले मागे सरून अनुकूल परिस्थिती आल्यानंतर झडप घातली असती तर ? भावनांना आवर घालत तर्कांवर आधारीत निर्णय घेतला असता तर ? तर आज तुम्ही आणि मी, महाराष्ट्रच काय तर आपला भारत देश काहीतरी वेगळाच दिसला असता… नाही का ?
*