सोने-चांदी दरात मोठी घसरण

दोन दिवसांत सोने 3-4 हजार, तर चांदी 20-30 हजारांनी उतरली

असे आहेत दर
सोने :   (24 कॅरेट) 1,48,500 रु. (प्रति 10 गॅम)

सोने :  (22 कॅरेट) 1,36,000 रु. (प्रति 10 गॅम)

चांदी : 2,00,000 रु. (प्रतिकिलो)

नाशिक : प्रतिनिधी
सोने व चांदी दरात गेल्या दोन-तीन दिवसांत घसरण झाली आहे. सराफ बाजारात शुक्रवारी (दि.19) सोने (24 कॅरेट) एक लाख 48 हजार 500, तर 22 कॅरेट एक लाख 36 हजार प्रति दहा ग्रॅम होते. चांदी दोन लाख प्रतिकिलो होती.
ग्राहकांनी कमी झालेल्या दरात सध्या खरेदी केल्यास भविष्यात नक्कीच
फायदा होण्याची शक्यता आहे. युद्धबंदीची घोषणा, सोने-चांदीच्या वाढलेल्या दरात करेक्शन म्हणून दर कमी झाल्याचे शहरातील सराफ व्यावसायिकांनी सांगितले.
जानेवारीत एक लाख 85 हजारांवर सोन्याचे आणि चार लाखपार गेलेल्या चांदी दराने सराफ व्यावसायिकांसह सर्वसामान्यांना घाम फोेडला होता. सोने दोन लाखपार जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि युद्ध, इंधन दरवाढ, अस्थिर शेअर मार्केट, व्याजदर आदी सर्वच घटकांमुळे सोने-चांदी दरात वाढ झाली होती.
इराण आणि अमेरिका-इस्रायल युद्धामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सोने खरेदी करू नका, असा सल्ला नागरिकांना दिला होता. त्यामुळे सोने दरात घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, पण झाले उलटेच. दर आणखी वाढल्याचे चित्र होते. परिणामी सोने दर एक लाख 85 हजार, तर कधी एक लाख 65 हजार रुपये, असे कमी-जास्त होत राहिले. गेल्या दोन ते चार दिवसांत सोन्याचे दर तीन ते चार हजारांनी आणि चांदी 20 ते 30 हजारांनी उतरली आहे. परिणामी गुंतवणूक आणि लग्नसराईसाठी ग्राहकांनी आताच खरेदी करावी. भविष्यात दर पुन्हा दोन लाखपार जाण्याची शक्यता आहे, असे सराफ व्यावसायिकांनी सांगितले आहे.
सोन्यातील गुंतवणूक कधीही फायदेशीर ठरत असते, हे आजवरच्या इतिहासात खरे ठरले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह व्यावसायिक, श्रीमंतांचा ओढा सोन्याच्या गुंतवणुकीत असल्याने सोने दरात गेल्या आठवड्यापासून चढउतार पाहावयास मिळत आहेत.

दर वाढल्याने किरकोळ सोने-चांदी दरात करेक्शन सुरू असते. त्यामुळे सध्या दर कमी झालेले आहेत. ग्राहकांनी दर अजून कमी होण्याची वाट न पाहता गरजेचे सोने खरेदी करून ठेवावे.
– गिरीश नवसे,
अध्यक्ष, सराफ असोसिएशन, नाशिक

काल झालेल्या फेडरेल बँकेच्या बैठकीत व्याजदर वाढविण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे सोने-चांदीचे भाव काल कमी झाले; परंतु डॉलर इंडेक्समध्ये 100 च्या खाली गेल्यास पुन्हा सोन्या- चांदीत जोरदार तेजी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांनी गुंतवणूक म्हणून कायम सोन्या-चांदीची खरेदी करावी.
– योगेश दंडगव्हाळ,
खजिनदार, नाशिक सराफ असोसिएशन

Sharp drop in gold and silver prices

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *