मुकणेसह एसटीपीची कामे पावसाळ्यातही सुरूच ठेवा

महापालिकेच्या मक्तेदार संस्थाना नोटीसा

नाशिक : प्रतिनिधी
शहरात महापालिकेच्या पाणीपुरवठ्यांंतर्गत चारशे कोटींंची मुकणे पाणीयोजना, साडेतीनशे कोटींची अमृत योजना यांसह मलनिस्सारणकडून सतराशे कोटींच्या सांडपाणी प्रकल्पाचे काम सुरू आहे. दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीचा अवधी पाहता ही कामे वेळेत उरकावीत याकरिता मनपा वरील प्रकल्पाचे काम घेणार्‍या मक्तेदार संस्थांना पावसाळ्यातही कामे सुरू ठेवण्याकरिता नोटिसा बजावणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या द़ृष्टीने थेट विल्होळी येथून साधुग्राममध्ये जलवाहिनी आणली जाणार आहे. सिंहस्थात येणार्‍या कोट्यवधी भाविकांना 24 तास पाणी उपलब्ध करून देण्यासाठी या जलवाहिनीचे काम सुरू आहे. सिंहस्थासाठी अवघा एक वर्षाचा अवधी असून, त्यापूर्वी म्हणजे मार्च 2027 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आव्हान मनपासमोर आहे.
दरम्यान, या प्रकल्पाचे काम करणार्‍या संस्थेने पावसाळ्यातही काम सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. गोदावरी कायमची प्रदूषणमुक्त करण्यासाठी सतराशे कोटी खर्चून सांडपाणी प्रकल्प (एसटीपी)चे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पाचे कामदेखील पावसाळ्यात न थांबवता सुरूच ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
सांंडपाणी प्रकल्प शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर ड्रेनेजचे काम केले जात असून, त्यासाठी अमृतचा निधी या कामांकरिता वळवण्यात आला आहे. ही कामेदेखील मार्च 2027 पर्यंत होण्याकरिता पावसाळ्यात न थांबता ती सुरूच ठेवणे आवश्यक आहे. सिंहस्थ कामाची मुदत मार्च 2027 पर्यंत संपुष्टात येत आहे. यात रस्ते, मुकणे योजना, ड्रेनेज, एसटीपी आदी महत्त्वाची कामे आहेत. पावसाळ्यात ही कामे बंद ठेवल्यास पुढील वर्षाच्या मार्चपयर्ंत ही कामे होणे अशक्य आहे. त्यामुळेच आता महापालिका प्रशासनाने पावसाळ्यातदेखील कामे सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

वरील कामे पावसाळ्यात सुरू ठेवण्याबाबत संबंधितांना नोटिसा देण्यात येत आहेत. सध्या पाऊस नसल्याने कामे बंद न ठेवता ती सुरू ठेवावीत, तसेच कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी सदर कामे पावसाळ्यात न थांबवता ती सुरूच ठेवण्याच्या सूचना मक्तेदारांना देण्यात आल्या आहेत.
– रवींद्र धारणकर, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग, मनपा

Continue STP works, including at Mukne, even during the monsoon.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *