बडे धोके है!
देवयानी सोनार
संसाररुपी रथ चालविण्यासाठी पती-पत्नी दोघांचाही वाटा महत्वाचा असतो. संसाराला हातभार लागावा म्हणून अनेक महिला पतीला साथ देत खासगी नोकरी करीत असतात.कॉलेजीयन मुलीही घरच्या जबाबदारीमुळे वा उज्ज्वल करीअरसाठी नोकरी करतात. पण याठिकाणीही ती सुरक्षित आणि निर्भय वातावरणात नोकरी करु शकेलच, अशी परिस्थिती नसते. अर्थात अपवादही आहेतच.पण काही ठिकाणी महिलेच्या असहायता, आणि परिस्थितीचा गैरफायदा घेणारे महाभाग असतातच.
खासगी नोकरीच्या ठिकाणी महिलेवर अत्याचाराच्या अनेक घटना घडल्याचे उदाहरणे आहेत. शासकीय नोकरीच्या ठिकाणी महिलांच्या बाबतीत काही प्रसंग उदभवल्यास विशाखा समिती कार्यरत असते. त्यामुळे येथे पुरुषी अत्याचाराला बळी पडलेल्या महिलेला किमान विशाखा समितीकडे न्याय तरी मागता येतो. खासगी नोकरीच्या ठिकाणी अन्याय झाला तर पोलीस ठाण्याचीच पायरी चढावी लागते. मात्र, बदनामीच्या भीतीने गप्प बसावे लागते. नुकतेच मुंबई नाका येथील इंशुरन्स कंपनीतील वरिष्ठ अधिकार्याने अत्याचार केला.त्यानंतर संबधित पिडितेची बदनामी करीत कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देत मारहाण केली.
दुसर्या घटनेत हॉटेल मधील सेल्स् मॅनेजर,जनरल मॅनेजरने पीडितेसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत मद्यसेवन करण्यास जबरदस्ती केली. तिसर्या व्यक्तीने दमदाटी करीत अश्लिल इशारे करीत नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली.
मुली शिक्षण,नोकरी निमित्ताने घराबाहेर पडतात. घरातून बाहेर पडून पुन्हा घरी येईपर्यंत पालकांना चिंता असते. क्लास,महाविद्यालयात,नोकरीच्या ठिकाणी मुली महिलांची सुरक्षा गरजेची आहे. वाढत्या अत्याचाराच्या, विनयभंगाच्या घटनांमुळे पुन्हा महिला सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे.
लिव्ह इन मध्ये राहणार्या स्त्रिया,शाळा महाविद्यालय,नोकरदार,गृहिणी,तसेच घरकाम ते उच्च पदस्थ महिलांच्या सुरक्षा वार्यावर असल्याचे चित्र आहे.लिव्ह इन मध्ये राहणार्या असो वा गृहिणी घरगुती हिंसाचाराच्या बळी पडण्यासोबत नोकरीच्या ठिकाणीही विनयभंग,शारिरीक अत्याचाराच्या बळी पडतात. या प्रकरणांमुळे महिला खरोखरच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न निर्माण होतो.
नाशिकही मुंबई पुण्यासारखे विस्तारत आहे. अनेक तरुण-तरुणी नोकरी व्यवसायानिमित्त शहरात येत आहेत. शासकिय किंवा खासगी अस्थापनांत काम करणार्या तरुणी, महिलांचा कामानिमित्ताने पुरूष सहकार्याशी संबध येत असतो. एकत्र काम करीत असतांना वरिष्ठांच्या सुचनेचे पालन करणे सहकार्यांकडून अपेक्षित असते.
वरिष्ठांनी जाणूनबुजून काम करणार्या महिला सहकारीला चुकीची वागणूक दिली किंवा हेतूपुरस्सर अनैतिक गोष्टींची मागणी केली तर अशी महिला पोलिसात,विशाखा समितीकडे तक्रार दाखल करू शकते. परंतु आपले नाव बदनाम इोईल या भितीने मुली महिला तक्रार करण्यास पुढे येण्याचे टाळतात. प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांचा वाढता सहभाग भूषणावह आहे.परंतु मेल डॉमेनेटींग अशा मानसिकतेतील समाज आजही स्त्रीला उपभोग्य वस्तु, कनिष्ठ पातळीवर असल्याचे मानतात.
मुलांप्रमाणे मुलीही उच्च शिक्षण घेत आहेत.चांगल्या पॅकेजेसच्या नोकर्या मिळवून उच्च पदावर काम करीत आहेत.अनेक स्त्रिया घरी कमावते कोणी नसल्याने लवकर जबाबदारी पडल्यामुळे मिळेल ती नोकरी केली जाते.तर अनेक महिला वाढत्या महागाईत संसाराला हातभार म्हणून नोकरीस पसंती देतात.घरकामगार ते उच्च पदस्थ अधिकारी पदावर काम करणार्या अनेक मुली महिलांना पुरूषी वर्चस्वाचे बळी पडण्याच्या घटना घडल्या आहेत.
सर्व गोष्टीचा विचार करून मुली, महिला तक्रार करण्यास धजावत नाही.या गोष्टीचा ङ्गायदा घेऊन पुरूषी मानसिकतेची धिटाई अजून वाढते.
आता महिला दिन येऊ घातला आहे.महिला दिनी स्त्रियांचे विविध रुपांचे, कर्तृत्वाचे गोडवे गायले जातील.एक सशक्त स्त्री अबल नसून सबला आहे.मुलीपासून जन्मदेत्या आईपर्यत विविध रुपे आपल्या जीवनात किती महत्वाचे आहे याबद्दल स्त्री शक्तीचा गौरव केला जाईल. पण हे सर्व एक दिवसापुरतेच मर्यादित राहते.त्यानंतर काय समाजाची मानसिकता ज्या दिवशी बदलेल तो दिवस खरा महिला दिन म्हणून साजरा व्हावा. तिचा नेहमीच सन्मान होणे काळाची गरज आहे.