संपादकीय

चमकते चेहरे, खचलेली मनं !

– दीपंकर मुंबईकर

सकाळचा अलार्म वाजतो… लोकल पकडण्याची घाई, ट्रॅफिकची कटकट, ऑफिसचे न संपणारे टार्गेट्स आणि रात्री उशिरापर्यंत मोबाइलच्या स्क्रीनवर स्क्रोल होत राहणारे रील्स! हे वरवर पाहता एखाद्या सामान्य नोकरदार किंवा व्यावसायिकाचे नियमित वेळापत्रक वाटू शकते. पण, या चकचकीत आणि वेगवान शहरी लाइफस्टाइलच्या मागे एक अत्यंत भयानक सत्य दडलेले आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका खळबळजनक राष्ट्रीय सर्वेक्षणाने (“द इंडिया हेल्थ कोशंट 2026“) देशातील विचारवंतांना आणि समाजधुरिणांना हादरवून सोडले आहे. या अहवालानुसार, भारतातील तब्बल 82 टक्के शहरी नागरिक सध्या तीव्र मानसिक तणावाखाली वावरत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या तणावाचे सर्वांत मोठे आणि मुख्य कारण पैसा आणि आर्थिक उद्दिष्टे हे असल्याचे समोर आले आहे. वरून सुदृढ आणि संपन्न दिसणारा शहरी भारत आतून किती पोकळ आणि अस्वस्थ झाला आहे, हेच या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

या सर्वेक्षणातील सर्वांत मोठा विरोधाभास असा की, केवळ 1 टक्के शहरी भारतीयांनी स्वतःचे आरोग्य खराब असल्याचे म्हटले आहे; म्हणजेच बाकीच्यांना आपण निरोगी आहोत असे वाटते. पण प्रत्यक्षात मात्र 82 टक्के लोक तणावाच्या छायेत आहेत आणि त्यातील 14 टक्के लोकांचा तणाव तर त्यांच्या नियंत्रणाबाहेर गेला आहे. यातही सर्वांत जास्त फटका तरुण पिढीला बसला आहे. ज्या 25 ते 34 वयोगटातील तरुणाईला आपण देशाचे भविष्य आणि सर्वांत ऊर्जावान पिढी मानतो, तीच पिढी आज सर्वांत जास्त मानसिक दबावाखाली आहे. 24 तास कनेक्टेड राहण्याच्या नादात ही पिढी
स्वतःच्या मनापासून पूर्णपणे डिस्कनेक्ट झाली आहे. मेट्रो शहरांमधील (मुंबई, दिल्ली, बेंगळुरू) कॉर्पोरेट संस्कृती, नोकरीची असुरक्षितता आणि सोशल मीडियावरील आभासी जगाशी स्वतःची केलेली तुलना यामुळे हा तणाव अधिकच गहिरा झाला आहे. जागतिक मानसिक आरोग्य क्रमवारीत भारताचा लागलेला 60 वा क्रमांक ही आपली खरी आंतरराष्ट्रीय स्थिती
दर्शवतो.
थोडक्यात विचार करायचा तर, बँक बॅलन्स वाढवण्याच्या नादात आपण लाइफ बॅलन्स तर गमावून बसलो नाही ना? हा प्रश्न प्रत्येक शहरी नागरिकाने स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे. शरीरासोबतच मनाचे आरोग्य राखणे, पैशाच्या मागे धावताना थोडा वेळ स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी काढणे आणि गरज पडल्यास संकोच न बाळगता मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणे हाच या आधुनिक शहरी साथीच्या आजारावरील खरा उपाय आहे.

बदलती मानसिकता, पण मदतीची भीती
एक सकारात्मक बदल म्हणजे, आजची तरुण पिढी शारीरिक आरोग्याइतकेच किंवा त्याहून अधिक मानसिक आरोग्याला (मेंटल हेल्थ) महत्त्व देऊ लागली आहे. 25 ते 34 वयोगटातील 54 टक्के तरुणांच्या मते मानसिक स्वास्थ्य हीच त्यांची प्राथमिकता आहे. परंतु, विचार बदलले तरी वर्तनात बदल झालेला नाही. समाजात अजूनही मानसिक आजारांकडे किंवा मानसोपचारतज्ज्ञांकडे जाण्याकडे एका वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहिले जाते. “मी मानसोपचारतज्ज्ञांकडे गेलो तर लोक मला वेडा म्हणतील का?” ही भीती आजही शहरी सुशिक्षितांमध्ये कायम आहे. म्हणूनच, केवळ 40 टक्के लोक मानसिक तणावाच्या वेळी उघडपणे मदत मागण्यास तयार होतात. महिला याबाबतीत पुरुषांपेक्षा अधिक जागरूक आणि व्यक्त होणार्‍या आहेत (44%), तर पुरुष (39%) आजही आपल्या भावना मनातच दाबून ठेवणे पसंत करतात, जे पुढे जाऊन हृदयविकार किंवा नैराश्यासारख्या मोठ्या संकटांना आमंत्रण देते.

पैसा की मानसिक शांतता?

“पैशाने सुख विकत घेता येत नाही,” ही जुनी म्हण आजच्या शहरीसंदर्भात तंतोतंत खरी ठरताना दिसत आहे.
सर्वेक्षणात 41 टक्के लोकांनी स्पष्ट केले आहे की, अविरतपणे आर्थिक उद्दिष्टे (फायनान्शिअल गोल्स) गाठण्याच्या शर्यतीमुळे त्यांच्या डोक्यावर प्रचंड ताण निर्माण होत आहे. ईएमआय, घरांचे वाढते भाडे, मुलांचे महागडे शिक्षण आणि तथाकथित लक्झरी लाइफ टिकवून ठेवण्याचा अट्टहास यांमुळे माणसाचे जगणेच यांत्रिक झाले आहे. तणावाचे हे मूक आक्रमण माणसाला आतून हळूहळू पोखरत जाते. याचे परिणाम रोजच्या जगण्यात सहज दिसतात. 63 टक्के लोकांमध्ये कामाची प्रेरणा (मोटिव्हेशन) संपत चालली आहे, 58 टक्के लोक भावनिकदृष्ट्या कमालीचे संवेदनशील किंवा चिडचिडे झाले आहेत, तर 46 टक्के लोकांची झोप पूर्णपणे उडाली आहे. दुःखद गोष्ट अशी की, सुकामेवा खाणे, जिम लावणे किंवा महागडे सप्लिमेंट्स घेणे यालाच लोक आरोग्य समजतात, पण त्यासाठी लागणारा पैसा कमवताना मनाची जी शांतता भंग पावते, त्याकडे कोणाचेच लक्ष नाही.

Shining faces, broken hearts!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

लाल कांद्याच्या दरात 400 रुपयांची घसरण

लासलगाव : वार्ताहर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवार (दि. 19) आणि शुक्रवार (दि. 20)…

22 hours ago

सगुण-निर्गुण एकचि पांडुरंग!

कार्तिकी एकादशी जिला प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठनी एकादशी असेही म्हटले जाते. या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनासाठी…

22 hours ago

थेट विरोध

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरूच आहे. शरद पवारांच्या आजारपणात विलीनीकरणाची चर्चा…

22 hours ago

ड्रेनेज, पाणीपुरवठ्याच्या 370 कोटींच्या खर्चाला मंजुरी

सिंहस्थासाठी साधुग्राममध्ये पंधराशे एकरमध्ये काम होणार नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील साधुग्राममध्ये विविध…

22 hours ago

इलेक्ट्रिक बससाठी स्वतंत्र पासची आवश्यकता नाही

अतिरिक्त भाडेही नाही; सिटीलिंकची माहिती नाशिक : प्रतिनिधी केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत नाशिकसाठी 50 इलेक्ट्रिक बसेस…

22 hours ago

स्वीकृतच्या दहा नगरसेवकांची अखेर नियुक्ती

महासभेत घोषणा; दुसरी जागा ठाकरे गटाने मिळवलीच नाशिक : प्रतिनिधी संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेल्या…

23 hours ago