श्रावणी शुक्रवार

– योगिनी पैठणकर

श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या, दिव्याची अमावस्या, पोळा, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन अशा सणांची रेलचेल असते.
श्रावण महिन्यात देवाजवळ जिवतीचा कागद लावला की समजायचं आता व्रतवैकल्य, उपास ,आराधना सुरू झाली.. लहानपणापासून आजीला हातात तांदूळ
(अक्षता) घेऊन… ऐका श्रीगणेशा तुमची कहाणी, आटपाट नगर होतं, असं सोमवार ते शुक्रवार कहाण्या ऐकून ऐकून पाठ व्हायच्या. दीप अमावस्येला सर्व दिवे, समया, निरांजनी घासूनपुसून लख्ख करायच्या व दिव्यांचा नैवेद्य दाखवायचा! जिवतीला आघाडा, दूर्वा वाहून शुक्रवारची सवाष्ण जेवायला बोलवायची. तिला फुटाणे, दूध, नैवेद्य देउन ओटी भरायची. हल्ली नागनरसोबाचे चित्र मिळते.पूर्वी मातीचे नाग करत असत. त्यासाठी छोट्या गावात गारुडी नाग पकडून आणत. पण मग प्राण्यांना पकडू नये म्हणून स्त्रिया वारुळावर जातात. कित्येक आपल्या जुन्या गाण्यांत त्यांचा उल्लेख आहे.. श्रावणात बुध -बृहस्पतीची ही पूजा करतात.. माझं लेकरू कुठे असेल तिथे नीट राहू दे.. मुलाबाळांच्या सुखासाठी ती पूजा करतात! असा हा श्रावण महिना म्हणजे उत्सवाचा धनी चैतन्याचा उत्साहाचा सण!
काल जिवतीचा कागद भिंतीवर लावला नि नकळत मन मागे गेलं. तेव्हा काही यूट्यूब, स्टेटस, मोबाइलवर ठेवण्याचे दिवस नव्हते.
माहेरी व सासरी देवदैवांची आवडच. श्रावणात तर सणांची मेजवानीच. लग्नाआधी सोमवारी शाळेला निम्मी सुटी
मिळायची व महिन्यात अर्धे दिवस सुटी मिळते म्हणून आवडायचा. नंतर लग्न झाल्यावर सोमवारी कपालेश्वराची पालखी जायची. चारनंतर सासरे येत व स्वयंपाकाची लगबग चालायची. आघाडा, दूर्वा तोडून मी माळ करत असे. रोज नवीन पदार्थांची चंगळ असे.
शिरा, खीर-पुरी, शुक्रवारची पूजा, मंगळागौर, रक्षाबंधन… हे सारं करायचं. मुरलीधराला, कपालेश्वराला जायचं. उपवास सोडायचे, मंगळागौर, नागपंचमी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, कृष्ण जयंती, पोळा! सगळ्या सख्या एकत्र एकत्र येऊन जमायच्या. आताही शाळेत हळदी-कुंकू होते. एक सण- उत्सव, आनंद मातृत्वाचा, बहीणभावाचा, नवीन नवरीचा, मांगल्याचा, उत्साहाचा, सृष्टीचा सृजनाचा, नानाविध रंगांनी नटण्याचा, असंख्य महिलावर्गाचा आवडीचा हा सण! रोजच्या दिवसभराच्या कष्टातून, कामातून तेच तेचपणातून बदल करणार्‍या सगळ्यांचा हा आवडता ऋतू. इतक्या श्रावणाच्या कविता ऐकल्यात ,पाठ केल्यात…
आता हल्ली यूट्यूबवर हे लागतात. आम्ही स्वतः लिहून त्या पाठवतो. पण दरवर्षीचा श्रावण वेगळाच रूप घेऊन येतो व यात उत्साह, आनंद, वेशभूषा, धार्मिकता, वैकल्य, उपासतापास यात बदल होत आहे. पण यावर्षी त्या जिवती मातेला प्रार्थना करताना आपल्या लेकरांचे, प्राणिसृष्टीचे सर्वांचे संरक्षण करताना सुरक्षित कर, भयमुक्त कर हीच एक प्रार्थना मनातून खरोखर निघते…

Shravani Friday

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *