जानेवारीच्या विक्रमी उच्चांकावरून 61 टक्क्यांची घसरण; 1980 व 2011 मधील उच्चांकही मागे
मुंबई : प्रतिनिधी
विक्रमी तेजीने गुंतवणूकदारांना भुरळ घालणार्या चांदीच्या बाजारात आता मोठी पडझड झाली आहे. जानेवारी 2026 मध्ये प्रति औंस सुमारे 122 डॉलरचा विक्रम करणारी चांदी बुधवारी (दि. 18) आंतरराष्ट्रीय बाजारात 45.79 डॉलरपर्यंत घसरली. म्हणजेच अवघ्या दहा महिन्यांत शिखरावरून तब्बल 61 टक्क्यांची घसरण झाली आहे. विशेष म्हणजे, चांदीचे भाव आता 1980 आणि 2011 मधील ऐतिहासिक उच्चांकांपेक्षाही खाली आले आहेत. त्यामुळे चांदीच्या बाजारातील या मोठ्या उलथापालथीने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले आहे.
भारतातही चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. बुधवारी मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) डिसेंबर वायद्याचा भाव 1 लाख 63 हजार 830 रुपये प्रतिकिलोपर्यंत खाली आला. जानेवारीतील 4 लाख 20 हजार 48 रुपयांच्या विक्रमी उच्चांकाच्या तुलनेत चांदी तब्बल 2 लाख 56 हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. म्हणजेच देशांतर्गत वायदे बाजारातही सुमारे 61 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. सोन्याच्या दरातही याच काळात उच्चांकावरून सुमारे 27 टक्क्यांची घट झाली आहे.
डॉलरची मजबुती, व्याजदरवाढीची भीती
या घसरणीमागे अमेरिकन डॉलरची मजबुती, व्याजदरवाढीची शक्यता आणि गुंतवणूकदारांकडून झालेली मोठी नफावसुली ही प्रमुख कारणे आहेत. अमेरिकन सरकारी रोख्यांवर अधिक परतावा मिळत असल्याने चांदीसारख्या मौल्यवान धातूंमधील गुंतवणुकीचे आकर्षण कमी झाले आहे. त्यातच अमेरिकेची मध्यवर्ती
बँक फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढवू शकते, या शक्यतेने बाजारावर दबाव वाढला. गेल्या वर्षभरातील विक्रमी तेजीनंतर अनेक गुंतवणूकदारांनी चांदी विकून नफा पदरात पाडून घेतल्याने घसरणीला आणखी वेग आला.
दागिन्यांच्या मागणीत 22 टक्के घट?
चांदीच्या घसरणीमागे औद्योगिक मागणी कमी होण्याची शक्यताही महत्त्वाची ठरत आहे. मेटल्स फोकसच्या अंदाजानुसार, 2026 मध्ये जागतिक चांदीची मागणी पाच टक्क्यांनी घटून 1.08 अब्ज औंसवर येऊ शकते. दागिन्यांची मागणी 22 टक्क्यांनी, तर औद्योगिक मागणी तीन टक्क्यांनी घटण्याचा अंदाज आहे. सौर पॅनल निर्मितीत चांदीचा वापर कमी करण्याचे प्रयत्न सुरू असल्यानेही मागणीवर परिणाम होत आहे. विशेषतः चीनमधील सौरऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहन उद्योगातील मंदावलेली मागणी बाजारासाठी चिंतेचा विषय ठरली आहे.
पुढे काय होणार?
सध्याच्या घसरणीनंतर चांदीचे भाव आणखी खाली जाणार की पुन्हा तेजी येणार, याबाबत तज्ज्ञांमध्ये वेगवेगळी मते आहेत. काही विश्लेषकांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात 40 ते 45 डॉलर प्रति औंस हा महत्त्वाचा आधार ठरू शकतो. भारतीय वायदे बाजारात 1.55 लाख रुपयांच्या आसपास आधार मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, डॉलरची दिशा, अमेरिकेचे व्याजदर आणि औद्योगिक मागणी यावर पुढील वाटचाल अवलंबून राहील. त्यामुळे चांदी स्वस्त झाली म्हणून घाईघाईने मोठी गुंतवणूक करण्याऐवजी बाजार स्थिर होण्याची वाट पाहण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.
Silver loses its shine! Prices hit a yearly low
‘अक्वान’ चक्रीवादळाची तीव्रता वाढली मुंबई : प्रतिनिधी बंगालच्या उपसागरातील मध्य-दक्षिण आणि लगतच्या पश्चिम-मध्य भागावर निर्माण…
देशभरातील आवकेत 24 टक्के घट; किरकोळ भाव 60 रुपये किलोवर नवी दिल्ली/नाशिक : प्रतिनिधी कांद्याचे…
शायना एनसींच्या कृतीवर ठाकरे गट, काँग्रेसचा संताप; भाजपकडूनही माफीची मागणी, शिंदेंकडून मात्र पाठराखण! मुंबई :…
- सुजाता येवले फळबियांच्या शोधात वृक्षावृक्षांत धावत होती, डोळ्यात आसवे आणत होती. दुरवर गेलेल्या सहचरांना…
- अफजल पठाण कधीकाळी ज्यांच्याशिवाय दिवस सरत नव्हता, आज त्यांच्याशी बोलण्यासाठीही वेळ मागावा लागतो. एक…
पाणी हेच जीवन आहे, हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. परंतु, आज हेच जीवन संकटात…