सिंहस्थ रस्तेकामाला होणार विलंब

वृक्षतोड स्थगितीमुळे मनपाची अडचण

नाशिक : प्रतिनिधी
शहरातील वृक्षतोड प्रकरणात राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) नाशिक महापालिकेला मोठा धक्का देत वृक्षतोडीवरील स्थगिती 19 जूनपर्यंत कायम ठेवली आहे. धोकादायक झाडांची तोड करायची असली तरी त्यासाठी लवादाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. दरम्यान, यामुळे शहरात 29 ठिकाणची वृक्षतोड थांबल्याने पर्यावरणप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे. दुसरीकडे, वृक्षतोडीला परवानगी नाकारल्याने रस्तेकामाला विलंब होणार आहे.
मनपाच्या उद्यान विभागाने झाडे हटविण्यासाठी हरकती मागवल्या होत्या. त्यावेळी पर्यावरणप्रेमींसह नागरिकांनी याविरोधात मोठ्या संख्येने हरकती दाखल केल्या. हरित लवादाने याप्रकरणी मनपाला दणका देत 19 जूनपर्यंत वृक्षतोडीला स्थगिती दिली आहे. स्थगिती उठविण्यासाठी महापालिकेकडून कायदेशीर लढाई उभी करण्यात आली होती. दिल्लीहून वकिलांची टीम नियुक्त करण्यात आली होती, तर काही हस्तक्षेप अर्जही दाखल करण्यात आले होते. मनपाने संभाव्य अपघात टाळण्यासाठी वृक्षतोडीवर काही सवलत देण्याची मागणी केली होती. मात्र, लवादाने त्यास नकार देत स्पष्ट केले की, आपत्कालीन परिस्थितीतही वृक्षतोड किंवा फांद्या छाटण्यासाठी स्वतंत्र अर्ज सादर करावा लागेल. या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 जून रोजी आहे. तोपर्यंत एकाही झाडाला हात लावता येणार नाही. त्यामुळे जेथे रस्तेकाम सुरू आहे; परंतु झाडांमुळे कामात अडथळे निर्माण होत आहेत, तेथील कामे सद्यःस्थितीत थांवली आहेत.

तापमानवाढीमुळे नागरिक हैराण

शहरात काही दिवसांपासून सूर्य अक्षरशः आग ओकतोय. त्यात शहरात महापालिकेने मोठ्या संख्येने झाडे तोडल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून केला जात आहे. एवढे कमी म्हणून की काय, तपोवनात अठराशे झाडे तोडण्याचा प्रस्ताव आहे. ते प्रकरण न्यायालयात गेले आहे. यानंतर शहरात सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर रस्तेकामे केली जाणार असून, त्याकरिता पाचशेहून अधिक झाडे हटविण्याची तयारी केली. मात्र, हरित लवादाने दणका दिल्यानंतर सध्या स्थगिती आहे. पण पुढे काय होते याकडे पर्यावरणप्रेमींची लक्ष लागले आहे. दरम्यान, शहरात नागरिक उकाड्याने हैराण झाले असताना झाडेच तापमान वाढीपासून बचाव करू शकतात, अशी भावना झाल्याचे दिसते.

 

Simhastha road work will be delayed

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *