त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर येथे मंदिरापासून जवळच असलेल्या उपजिल्हा रुग्णालयासमोर भरदुपारी दोन वाहने जळून खाक झाली. शुकवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि उपजिल्हा रुग्णालयासमोर एक वाहनाने पेट घेतला. त्यामधील प्रवासी बाहेर पडले तोपर्यंत वाहनाला लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केले होते. त्या ठिकाणी बाजूला उभ्या असलेल्या दुसर्या वाहनाने पेट घेतला. त्यानंतर नगर परिषदेचे अग्निशमन वाहन तेथे बोलावले. मात्र, तोपर्यंत दोन वाहने जळून खाक झाली होती. वाहनांच्या इंधनाच्या टाकीचा स्फोट झाला असता तर जवळच असलेले उपजिल्हा रुग्णालय, त्र्यंबकेश्वर मंदिरात 200 रुपये पेड दर्शनासाठी रांगेत उभे असलेले भाविकांना हानी पोहचली असती. या परिसरात असलेली अवैध पार्कीग बंद करावी म्हणून नागरिक सातत्याने मागणी करत असतात. मात्र, त्याकडे पोलीस अथवा नगर परिषद गांभीर्याने लक्ष देत नाहीत. अशा प्रकारची आपत्तीजन्य घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असेल, असा सवाल आता उपस्थित होत आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारी पार्किंग करण्यात येणार्या वाहनांनी येथे येणार्या जाणार्या अत्यवस्थ रुग्णांच्या जिवाशी खेळ होत असतो. त्यात वाहनाच्या इंधनाच्या टाकीचा स्फोट झाला तर उपचार घेणारे रुग्ण नाहक बळी पडतील, याचे गांभीर्य कोणालाही नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
The thrill of burning cars in Trimbakeshwar