स्टँडबाय ट्रान्स्फॉर्मरचा युद्धपातळीवर शोध; पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिक संतप्त
सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर शहराला पाणीपुरवठा करणार्या कडवा धरणातील पाणीयोजनेचा ट्रान्स्फॉर्मर नादुरुस्त झाल्याने गेल्या सहा दिवसांपासून शहरात पाणीबाणी निर्माण झाली आहे. त्यामुळे दारणा नदीतून राबवण्यात आलेल्या जुन्या पाणीयोजनेवरच शहराची तहान भागवण्याचा प्रयत्न नगरपालिकेकडून सुरू आहे. एमआयडीसीकडून पर्यायी व्यवस्था करण्याचे नियोजन हाती घेण्यात आले आहे. मात्र, मागणी आणि पुरवठ्यात मोठी तफावत असल्याने प्रशासनाचे प्रयत्न तोकडे ठरत आहेत.
ऐन सणासुदीत सिन्नरकरांच्या झालेल्या गैरसोयीबद्दल मुख्याधिकारी अभिजित कदम यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. शिवाय, शहराच्या वेगवेगळ्या भागात नऊ टँकरच्या माध्यमातून बुधवारी नगरपालिकेने पाणीपुरवठा सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली. कडवा पाणीपुरवठा योजनेवर दोन हजार केव्हीए क्षमतेचा ट्रान्स्फॉर्मर बसवण्यात आला आहे. औरंगाबाद येथून हा ट्रान्स्फॉर्मर विकत घेतला आहे. त्यामुळे त्याची दुरुस्ती स्थानिक स्तरावर करण्याचा प्रयत्न असफल झाला. अखेर बुधवारी (दि.15) माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, माजी नगरसेवक हर्षद देशमुख, नगरपालिकेचे अभियंता प्रशांत मेश्राम यांच्यासह कर्मचार्यांनी हा ट्रान्स्फॉर्मर उतरून घेत दुपारी 4 वाजता दुरुस्तीसाठी तो छत्रपती संभाजीनगरला दुरुस्तीसाठी रवाना करण्यात आला. हा ट्रान्स्फॉर्मर दुरुस्तीसाठी किमान आठ दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी आठवडाभर सिन्नरकरांना ऐन दिवाळी सणाच्या काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याने शहरवासीयांत संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, माजी नगरसेवक गोविंद लोखंडे, रूपेश मोठे, पांडुरंग वारुंगसे आदींनी मुख्याधिकारी अभिजित कदम यांची भेट घेतली. सिन्नर शहरातील ऐन दिवाळी सणाच्या काळात विस्कळीत झालेला पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असे इशारा वजा निवेदन दिले. एक ट्रान्स्फॉर्मर नादुरुस्त झाल्यावर नगरपालिकेने तातडीने दुसरा स्टँड बाय ट्रान्स्फॉर्मर सज्ज ठेवणे आवश्यक आहे, ही बाब आता पालिकेच्या लक्षात आली आहे. त्यामुळे दोन हजार केव्हीए स्पेसिफिकेशनचा ट्रान्स्फॉर्मर खरेदी करण्याची तयारी नगरपालिकेने सुरू केली आहे. क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आदेशानंतर स्वीय सहाय्यक शिवा वाणी, संजय डावरे यांच्याकडूनही एवढ्या क्षमतेचा ट्रान्स्फॉर्मर मिळवण्यासाठी युद्धपातळीवर शोध सुरू आहे. पुण्यात शोध घेऊनही तेवढ्या क्षमतेचा आणि स्पेसिफिकेशनचा ट्रान्स्फॉर्मर बुधवारी उशिरापर्यंत नगरपालिकेला मिळाला नव्हता. हा ट्रान्स्फॉर्मर उपलब्ध झाल्यास सिन्नरकरांची पाणीटंचाईतून मुक्तता होऊ शकते, अन्यथा जुनाच ट्रान्स्फॉर्मर दुरुस्तीची प्रतीक्षा करावी
लागणार आहे.
- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…
- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…
- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…
- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…
तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…
रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…