सर,वुई विल मिस यू.. फॉरएव्हर!
नाशिक : देवयानी सोनार
कोरोना काळात ग्रीन ज्यूस तर कधी हेल्मेटसक्ती आणि वेगवेगळ्या परवानग्या आणि इतर खात्यांतील कामकाजावर बोट ठेवण्यामुळे नेहमीच चर्चेेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांची मुंबईत बदली झाली. मात्र, त्यानंतर अनेकांना त्यांची बदली मनाला हुरहुर लावणारी ठरली. कर्तव्य कठोरतेबरोबरच पोलिसांच्या आरोग्याची काळजी वाहण्याबरोबरच दररोज जाण्या-येण्याच्या वाटेवर दिसणारी वृद्धा दिसली नाही म्हणून थेट तिचे घर गाठणारे संवेदनशील अधिकारी पांडेय यांच्या रूपाने नाशिककरांनी अनुभवले. त्यामुळेच त्यांच्या बदलीनंतर त्यांच्यासोबत काढलेले फोटो, व्हिडिओ अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत आठवणींना उजाळा दिला.
व्हॉट्सऍपवर अनेकांनी मिस यू सर, एव्हरी डे ऍट गोदावरी रिव्हर, दबंग, सिंघम सर, वी सॅल्यूट यू, ग्रेट सर, अशा भावनिक पोस्ट तसेच पोलीस आयुक्त कार्यकाळात केलेल्या कार्यांचे, घटनाक्रमांचे फोटो डीपीला ठेवत तर काहींनी फेसबुक, इन्स्टा आणि स्टेट्स ठेवत आठवणींना उजाळा दिला. नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून सतरा महिने त्यांनी धुरा सांभाळली. कार्यभार हाती घेतला त्यावेळी कोरोनाने नाशिकमध्ये मोठा कहर केलेला होता. अनेक पोलीस कर्मचारीही कोरोनाने बाधित झालेले होते. मुंबईत कारागृहात त्यांनी राबविलेल्या विविध उपक्रमांचा उपयोग त्यांनी नाशिकमध्ये कोरोना काळात केला. पोलिसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी त्यांनी बनविलेल्या ग्रीन ज्यूसचे अनेकांनी कौतुक केले. दबंग, सिंघमसारखी प्रतिमा असलेल्या पांडेय यांनी गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अनेकविध उपाय केले. भूमाफिया राज संपविण्यासाठी अनेकांवर मोक्का कारवाई करत आपल्या कर्तव्य कठोरतेचा प्रत्यय दिला. रोलेटमधील कायद्यात बदल करण्यासाठी त्यांनी विधिमंडळाकडे पत्रव्यवहार करून कायद्यात बदल करण्यास भाग पाडले. हेल्मेटसक्ती, नो हेल्मेट-नो पेट्रोल, केंद्रीय मंत्री नारायण राणेंशीच पंगा घेणे आणि विविध प्रकारच्या परवानग्या देताना त्यांनी केलेले कडक नियम त्यामुळे त्यांच्याबद्दल काही मंडळींनी नाराजी व्यक्त केली. मात्र, आपण मोजक्या लोकांना खूश करण्यासाठी नव्हे तर संपूर्ण शहराच्या नागरिकांचे हित बघतो, असे पांडेय यांचे म्हणणे होते. आपल्या कामातून छाप पाडलेल्या पांडेय यांची बदली झाल्यानंतर अनेकांनी स्टेट्स ठेवत भावना व्यक्त केल्या.
कोणतेही कार्यक्षम आणि पारदर्शी कारभार सांभाळणारे उच्च पदस्थ अधिकारी असो वा चांगल्या कामाने ओळख निर्माण करून आपली छाप सोडतात. अनेकांचे प्रिय होतात. सरकारी किंवा खासगी आस्थापनातील नियमांप्रमाणे बदली, पदोन्नती होत असते. नागरिक हिताचे निर्णय किंवा विरोधातील निर्णय घेतल्यास वरिष्ठ किंवा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. परंतु ते पद सोडताना पदोन्नतीचा आनंद असतोच, परंतु अशा व्यक्ती आपल्यापासून दुरावणार म्हणून वाईटही वाटते.
गोदावरीत स्नान करणारा अधिकारी
पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांचे गोदावरीवर विशेष प्रेम होते. दररोज पहाटे ते न चुकता गोदावरीवर स्नान करण्यासाठी जात असत. गोदावरीवर स्नान करण्यासाठी जाणारा अधिकारी आणि गोदावरीला प्रदूषणापासून मुक्त करण्यासाठी विविध उपाययोजना सुचविणारा अधिकारीही पांडेय यांच्या रूपाने नाशिककरांना पाहावयास मिळाला.