सोशल मीडिया, बेतालपणा आणि सायबर गुन्हा

कोणीतरी एक व्यक्ती अचानक येते, सोशल मीडियावर काहीतरी, कोणाबद्दल तरी लिहिते आणि प्रचंड वादंग सुरु होतो. मुळात हे का घडते? सोशल मीडिया फुकट आहे म्हणून ? कि कायद्याचा वचक नाही म्हणून ? कि आपण जे करतोय तो गुन्हा ठरू शकतो, याबाबत अजिबातच नसलेले ज्ञान?
उत्तर काहीही असो, सोशल मीडिया वर कोणीही कोणाही विषयी (अगदी कोणाही विषयी) आक्षेपार्ह लिहू, बोलू, टाकू शकत नाही. कोणाला शिवीगाळ करणे, व्यंगावर किंवा आजारावर बोलणे, अश्लीलता पसरवणे, चुकीची माहिती देणे, इत्यादी हे गुन्हा ठरू शकतात. मग ते नाव घेऊन असून किंवा फक्त बोलण्याचा रोख त्या व्यक्तीकडे असो. गुन्हा तो गुन्हाच. आणि ते सिद्ध करायला फार वेळ लागत नाही.
सोशल मीडिया वापरताना काळजी घेतली पाहिजे. मग तो सामान्य माणूस असो, नेता असो किंवा अभिनेता असो. कायदा सर्वांना समान आहे. त्यातल्या त्यात माहिती तंत्रज्ञान कायदे हे समानता दर्शवण्यासाठीच बनले आहेत. फक्त प्रत्येकवेळी तितक्याच ताकदीने कारवाई झाली पाहिजे.
खऱ्या आयुष्यात एखाद्याबद्दल कितीही मतभेत असतील, तरी त्या बद्दल सोशल मीडियावर अर्वाच्य आणि असंस्कृत भाषेत गरळ ओकणे हे चूकच आहे, आणि तो गुन्हाही आहे. पण, त्या पोस्टला पोस्ट करणाऱ्यापेक्षा इतर लोकच जास्त व्हायरल करतात, हे ही अत्यंत चुकीचे आहे.
मुख्य मीडियामध्ये अशा गोष्टी दाखवताना “ब्लर” करायच्या असतात, असा एक साधा नियम आहे. असो. सर्वांनी काहीही पोस्ट करताना अथवा बोलताना तारतम्य बाळगणे गरजेचे आहे.
अनावधानाने पोस्ट करणे आणि नंतर ती काढून टाकणे, किंवा त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणे, हा आपण एक “अपघात” किंवा चूक समजू शकतो. पण जाणीवपूर्वक आणि नीट विचार करून एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून “सायबर बुलिंग” करणे, हि सायबर विकृती आहे. सर्वांनीच थोडा विचार करणे गरजेचे आहे, आणि सायबर साक्षर होणे गरजेचे आहे.
– ओंकार गंधे (सायबर सुरक्षा तज्ज्ञ)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *