रस्ते, पूल, जॉगिंग ट्रॅकच्या कामांना गती द्या

मनपा आयुक्तांचे बांधकाम विभागाला आदेश

नाशिक : प्रतिनिधी
शहरात प्राधान्यक्रमाने करावयाच्या रस्त्यांच्या कामांची यादी तयार करून त्यांची निविदा तत्काळ काढावी. याशिवाय, प्रस्तावित पुलाचे काम महत्त्वाचे असून, जॉगिंग ट्रॅकच्या कामांना गती द्यावी, असे आदेश मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी बांधकाम विभागाला दिले.
मनपा मुख्यालयात झालेल्या बैठकीत आयुक्त खत्री यांनी बांधकाम विभागाचा आढावा घेतला. त्यांनी कामांबाबत आदेश दिले. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते, पूल मार्गी लावण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. शहरात सव्वाशे कोटींचे पूल सिंहस्थापूर्वी उभारले जाणार आहेत. नुकतीच त्या कामासाठीची निविदा बांधकाम विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली. पुलांच्या कामांना 17 ते 18 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्याद़ृष्टीने सिंहस्थपूर्वीच पूल व रस्ते कामे करण्याच्या सूचना आयुक्तांंनी दिल्या आहेत.
दरम्यान, आरोग्य विभागाने सर्व रुग्णालये व आरोग्य केंद्रांत पुरेसा औषधांचा साठा उपलब्ध ठेवावा. 24 तास अत्यावश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध राहील, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. आरोग्यवर्धिनी केंद्रे पूर्णक्षमतेने सुरू करण्यासाठी संबंधित विभाग व विभागीय अधिकार्‍यांनी वेळोवेळी समक्ष पाहणी करावी. शहराच्या विविध विभागांतील मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी दुसर्‍या टप्प्यातील मिळकतींचा लिलाव करण्याच्या सूचना कर विभागाला दिल्या.

गणेशोत्सवात विभागीय अधिकार्‍यांवर जबाबदारी

गणेशोत्सवाच्या काळात सहाही विभागांतील अधिकार्‍यांनी त्यांच्या भागात दररोज पाहणी दौरा करून तेथील स्वच्छता, अतिक्रमणे, पथदीप व इतर व्यवस्थेचा आढावा घ्यावा. नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाहीच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.

अग्निशमनला 24 तास सतर्कतेच्या सूचना

आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्यांच्याकडील साधने सुस्थितीत असल्याची खात्री करावी. संपूर्ण यंत्रणा 24 तास कार्यान्वित राहील याबाबतचे नियोजन अग्निशमन दलाने करावे, अशा सूचना आयुक्त खत्री यांनी दिल्या.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *