सभापती जगताप : केवळ दोन व्यापार्यांच्या मुद्द्यावरून प्रतिमा मलिन
लासलगाव : वार्ताहर
लासलगाव मर्चंट असोसिएशनच्या सभासदत्वाच्या मुद्द्यावरून अलीकडे नवीन आणि जुन्या व्यापार्यांमध्ये निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीच्या कामकाजाविषयी चुकीच्या, एकांगी आणि दिशाभूल करणार्या बातम्या प्रसिद्ध केल्या जात आहेत. अशा प्रकारे बाजार समितीची बदनामी तात्काळ थांबवावी, असे स्पष्ट आवाहन बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर (डी. के.) जगताप आणि उपसभापती संदीप दरेकर यांनी पत्रकार परिषदेत केले.
सभापती जगताप म्हणाले की, 1 एप्रिल 1947 रोजी स्थापन झालेली लासलगाव बाजार समिती ही आशिया खंडातील कांद्याची महत्त्वाची बाजारपेठ आहे. येथे पारदर्शक लिलाव पद्धत, चोख वजनमाप आणि 24 तासांच्या आत रोख किंवा ऑनलाइन देयके देण्याची विश्वासार्ह व्यवस्था आहे. यामुळेच नाशिकसह अहिल्यानगर, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि नंदुरबार जिल्ह्यांतील शेतकरी आपला शेतीमाल मोठ्या विश्वासाने येथे विक्रीसाठी आणतात. समितीमध्ये केवळ कांदाच नव्हे तर भुसार, तेलबिया, टोमॅटो, द्राक्षे आणि भाजीपाल्याचीही मोठी उलाढाल होते. 13 एप्रिलला काही नवीन परवानाधारक व्यापार्यांनी पूर्वसूचना न देता थेट लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतल्याने जुन्या व्यापार्यांनी लिलावावर बहिष्कार टाकला होता. यामुळे काही काळ तणाव निर्माण होऊन शेतकर्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. त्यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि शेतकर्यांचे नुकसान टाळण्यासाठी बाजार समितीने तात्पुरता
निर्णय घेतला.
यामध्ये कोणत्याही नवीन व्यापार्याला विरोध करण्याचा हेतू नव्हता. उलट, स्पर्धा वाढून शेतकर्यांच्या मालाला अधिक दर मिळावा, हीच बाजार समितीची कायमची भूमिका राहिली आहे. प्रसारमाध्यमांतून नवीन व्यापार्यांमुळे शेतकर्यांना जास्त दर मिळत असल्याचे दावे केले जात आहेत; परंतु ते वस्तुस्थितीला धरून नाहीत. त्या दिवशी नवीन व्यापार्यांकडील सोयाबीनचा सरासरी दर 4,973 रुपये होता, तर जुन्या व्यापार्यांकडील सोयाबीनचा सरासरी दर 5,392 रुपये
इतका होता.
उच्चांकी 5,800 रुपये दर दोन्ही गटांतील व्यापार्यांनी दिला होता. त्यामुळे अशा बातम्या तथ्यहीन असून, माध्यमांनी कोणताही पडताळणी न करता वृत्त प्रसिद्ध करू नये. बाजार समितीची प्रतिमा मलिन केल्यास शेतकर्यांमध्ये विनाकारण संभ्रम निर्माण होतो, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. यावेळी सचिव नरेंद्र वाढवणे, प्रकाश कुमावत, बाजार समिती सदस्य प्रवीण कदम आदी उपस्थित होते.
खासगी पर्यायांच्या तुलनेत बाजार समित्यांमध्ये चोख वजनमाप आणि वेळेत पेमेंटची सुरक्षित हमी मिळते. जाणीवपूर्वक बदनामी करून खासगीकरणाला खतपाणी घालणार्या प्रवृत्तींमुळे शेतकर्यांचेच नुकसान होणार आहे. त्यांना आळा घालणे आवश्यक आहे.
-संदीप दरेकर, उपसभापती, लासलगाव बाजार समिती
Stop defaming Lasalgaon Market Committee