कठोर निर्णयामुळे शिक्षणक्षेत्रात सकारात्मक बदल दिसतील: ना. दादा भुसे : सीबीएसई पॅटर्नचा एसएससी बोर्डाला धोका नाही

कठोर निर्णयामुळे शिक्षणक्षेत्रात सकारात्मक बदल दिसतील
ना. दादा भुसे : सीबीएसई पॅटर्नचा एसएससी बोर्डाला धोका नाही

 

मुलाखत : अश्विनी पांडे

राज्याच्या राजकारणात मित्तभाषी पण डॅशिंग अशी प्रतिमा असणारे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, जिल्ह्याचे भूमिपुत्र दादा भुसे यांनी राज्याचे शिक्षणमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर निर्णयांचा धडाका लावला आहे. कारभार स्वीकारल्यानंतर त्यांनी लागलीच बुके नको, बुक द्या हा उपक्रम राबवला. शिक्षणमंत्री दालनात नाही ऑन फिल्ड म्हणत सातत्याने विविध शाळांना भेट देत शाळांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा विकास व्हावा, विद्यार्थ्यांना सुविधा मिळाव्यात, यासाठी शालेय शिक्षण मंत्र्यांपासून प्रत्येक शिक्षणाधिकारी एका शाळेची जबाबदारी स्वीकारणार आहेत त्यांनी राबवलेल्या विविध उपक्रमामुळे दादा भुसे यांची ओळख उपक्रमशील शिक्षण मंत्री अशी झाली आहे. अलिकडच्याच काळात त्यांनी राज्यातील सर्व शाळांत सीबीएसई पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची शालेय पातळीवर बरीच चर्चा होत आहेत. नवीन शैक्षणिक धोरण आणि शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी नेमक्या त्यांच्या काय संकल्पना आहेत. यासंदर्भात दै. गांवकरीला शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलेल्या खास मुलाखतीत शिक्षणक्षेत्रातील नव्या बदलांना सामोरे जाताना त्यांच्या मनातील अनेक संकल्पना त्यांनी दिलखुलासपणे मांडल्या.

 

1.सीबीएसई पॅटर्नच्या अंमलबजावणीसंदर्भात मॅप काय आहे?

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी पाऊले उचलली जात आहेत. त्यात राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये इयत्ता पहिलीला ‘सीबीएसई पॅटर्न’लागू होईल. तर शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये अन्य इयत्तांचा ‘सीबीएसई’नुसार नवीन अभ्यासक्रम तयार करणे, त्यावर आधारित पाठ्यपुस्तके बालभारतीमार्फत छापणे अशी कार्यवाही होईल. या वर्षभरात शिक्षकांना नवीन अभ्यासक्रमाची माहिती देऊन त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सीबीएसई बोर्डाच्या धर्तीवर शासकीय शाळांमध्ये अभ्यासक्रम राबविणार आहे. त्याबाबत असलेले गैरसमज दूर केले जातील. शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी काही धाडसी निर्णयांची गरज आहे. यंदाच्या वर्षी पहिलीसाठी हा अभ्यासक्रम सुरू करणार असून, पुढील तीन वर्षांत बारावीपर्यंत त्याचा विस्तार शिक्षण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने करण्यात येणार आहे.

2. शिक्षण भरती प्रक्रिया कधी राबवणार?
राज्यातील शाळांमध्ये शिक्षकसंख्या कमी पडणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. शिक्षक भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शासन नेहमीच तत्पर आहे.

3. ग्रामीण भागातील अनेक शाळांत अद्यापही सुविधांचा अभाव आहे?

ग्रामीण भागातील काही शाळांमध्ये निश्चितच अपुर्‍या सोयी सुविधा आहेत. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून शासनपातळीवर नियोजन सुरू आहे. ग्रामीण भागातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिवाळी शाळेत राबवण्यात आलेला प्रयोग निश्चितच शिक्षण पद्धतीला नवी दिशा देणारा आहे. अशा पद्धतीच्या मॉडर्न शाळा ग्रामीण भागात तयार करत प्रत्येकाला उत्तम शिक्षण मिळावे यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जाणार आहेत.

 

. 4 खासगी शाळांच्या फी निश्चिती संदर्भात धोरण आखणार का?

खासगी शाळांची फी सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे, हे मान्यच करावे लागेल. येणार्‍या काळात यासंदर्भात ठोस धोरण राबविले जाईल. खासगी शाळांच्या बरोबरीच्या किंवा त्यापेक्षा चांगले शिक्षण मराठी माध्यमांच्या शाळेत मिळत आहे. महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षण चांगले आहे. या शाळांना पालकांनी प्राधान्य द्यावे.

5. पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या नावाबद्दल तुमची काय भूमिका?

यासंदर्भात योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल.

6. सीबीएसई बोर्ड पुढे करून एसएससी बोर्ड बंद करण्याचा डाव असल्याचा आरोप होतोय
सीबीएसई आले म्हणजे एसएससी स्टेट बोर्डाचे अस्तित्व संपेल असे काही नाही. विरोधकांना कोणत्याही चांगल्या निर्णयाचा विरोध करायचा असतो. सीबीएसई अभ्यासक्रमातील काही भाग आपण घेणार आहोत. आपला इतिहास आणि भूगोल आपण कायम ठेवणार आहोत.एसएससी बोर्ड बंद करण्यासाठी हा निर्णय घेतलेला नाही. आपल्या राज्यातील विद्यार्थी सक्षमपणे इतर राज्यातील विद्यार्थ्यांसोबत स्पर्धेत टिकावेत त्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

7. बदलापूर प्रकरणानंतर शाळांचा सीसीटिव्हीचा मुद्दा अजूनही जैसे थे आहे.
शाळांची सुरक्षा हा मुद्दा प्राधान्य क्रमांकावर आहे. बदलापूरला शाळेत जो प्रकार घडला तो लांच्छंनास्पद आणि माणुसकीला काळिमा फासणारा होता. बदलापूरसारखे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी शासनाकडून प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत. त्यादृष्टीने पाऊले उचलण्यात येत आहेत. येणार्‍या काळात राज्यातील प्रत्येक शाळा सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असेल.

8. कुणाल कामरा प्रकरणानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा चर्चेत आला, काय सांगाल?

घटनेने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. परंतु स्वांतत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. प्रत्येकाने आपले विचार व्यक्त करायला हवेत. विचार व्यक्त करताना त्यातून सामाजिक तेढ निर्माण होऊ नये. समाजातील एकोपा टिकून राहावा, कोणाच्याही धार्मिक भावनेला तडा जाणार नाही याची ही काळजी घेणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून तोंडाला येईल ते बोलण योग्य नाही. कुणाला कामराच्या मागे कोण आहे हे शोधले पाहिजे. सोशल मीडियावरील ट्रोलिंग हा कायमच चर्चेतील मुद्दा आहे. यावर निश्चितच निर्बंध हवेत,मात्र यासाठी शासनाच्या पातळीवर धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल.

9. सिंहस्थासाठी बैठका घेण्यात येत आहेत? मात्र निधीची अद्याप प्रतीक्षाच आहे?

सिंहस्थासाठी निधी कमी पडणार नाही . मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ही हे सांगितले आहे. सध्या आढावा बैठका सुरू आहेत. त्यातून नियोजन होत आहेत आणि लवकरच प्रत्यक्ष निधीही मिळेल .कुंभमेळा हा नाशिकसाठीच नव्हे तर महाराष्ट्रासाठी महत्वाचा असून नाशिक जिल्ह्यातील धार्मिक स्थळांचा विकास या माध्यमातून होणार असल्याने . बारकाईने नियोजन करण्यात येत आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराचा चेहरा मोहरा बदलणार आहे . ती काम दर्जेदार व्हावेत यासाठी महायुती सरकार प्रयत्नशील आहे.

10. पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार?
पालकमंत्रिपदाबाबत महायुतीतील वरिष्ठ नेते निर्णय घेतील.

11. येणार्‍या पाच वर्षासाठी शालेय शिक्षणासंदर्भात तुमची ब्लू प्रिंट काय आहे?
राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळावे, या गोष्टीला प्राधान्य आहे. आता घेण्यात आलेल्या धोरणात्मक. निर्णयाचे येणार्‍या पाच वर्षात सकारात्मक बदल दिसतील याची खात्री आहे आपल्या शिक्षण व्यवस्थेत काही गोष्टी काळानुरूप बदलणे आवश्यक आहे. त्यानुसार वाटचाल केली जाईल. यात शिक्षण तज्ञाचे वेळोवेळी मार्गदर्शन घेतले जाईल.

Bhagwat Udavant

Recent Posts

आठ वर्षाच्या बालकावर चार अल्पवयीन मुलांचा सामुहिक लैंगिक अत्याचार

अंबरनाथमध्ये आठ वर्षाच्या बालकावर चार अल्पवयीन मुलांचा सामुहिक लैंगिक अत्याचार शहापूर : साजिद शेख कुटुंबीयांसमवेत…

4 hours ago

गोणीत बांधलेल्या स्थितीत आढळला युवतीचा  मृतदेह

मोखाड्यात सहा दिवसांत दुसरा मृतदेह सापडला गोणीत बांधलेल्या स्थितीत आढळला युवतीचा  मृतदेह मोखाडा: नामदेव ठोमरे…

4 hours ago

सटाणा बाजार समितीत प्रस्थापित नेत्यांना धक्का

सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक माजी सभापती संजय सोनवणे यांचा करिष्मा मातब्बरांना लोळवत नऊ…

8 hours ago

दिल्लीत देशभरातील बांधकाम कामगारांचे धरणे आंदोलन

दिल्लीत देशभरातील बांधकाम कामगारांचे धरणे आंदोलन नाशिक जिल्हातील बांधकाम कामगारांचाही सहभाग नाशिक : प्रतिनिधी आयटक…

13 hours ago

नाशिकमध्ये या कारणामुळे घर घेणे आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर

नाशिकमध्ये घर घेणे आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर रेडीरेकनर दरात ७.३१ टक्के  वाढ नाशिक : प्रतिनिधी राज्य…

14 hours ago

हॉर्न वाजवला म्हणून चार गुंडांनी केला जीवघेणा हल्ला

हॉर्न वाजवला म्हणून चार गुंडांनी केला जीवघेणा हल्ला नाशिकमध्ये स्ट्रीट क्राईम कमी होईना सिडको:  विशेष…

3 days ago