नाशिक

रस्त्याअभावी उगावच्या विद्यार्थी, शेतकर्‍यांचे हाल

संताप : शेतीची कामे ठप्प; कांदा सडतोय, रुग्णांना उपचार मिळेना

निफाड : तालुका प्रतिनिधी
येथून जवळच असलेल्या उगाव येथील रेल्वेलगतच्या शेतकर्‍यांना गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे. शेतात जाण्यासाठी योग्य रस्ता नसल्याने ट्रॅक्टर शेतापर्यंत पोहोचत नाही, विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत, तर वृद्ध व आजारी व्यक्तींना उपचारासाठी बाहेर नेणेही कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची शेतीची अनेक कामे ठप्प झाली असून, प्रशासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
रेल्वेमार्गाच्या पलीकडे अथवा लगत असलेल्या शेतकर्‍यांना शेतीसाठी ये-जा करण्यासाठी योग्य रस्ता उपलब्ध नसल्याने मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. रस्ता नसल्यामुळे ट्रॅक्टर, शेतीची अवजारे तसेच इतर वाहने शेतात नेता येत नाहीत. परिणामी, शेतीची मशागत, पेरणी, फवारणी, काढणी आणि शेतीमालाची वाहतूक यावर मोठा परिणाम होत आहे. विशेषतः सध्या कांद्याच्या हंगामात रस्त्याअभावी शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. शेतात तयार झालेला कांदा वेळेवर बाजारात नेता येत नसल्याने तो सडून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेजारील डांबरी रस्त्यालगत असलेले काही शेतकरी रस्ता देण्यास तयार नसल्याने प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.
रस्त्याअभावी केवळ शेतीच नव्हे तर दैनंदिन जीवनही प्रभावित झाले आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत असून, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना उपचारासाठी दवाखान्यात नेणेही कठीण होत आहे. काही रुग्ण उपचाराअभावी घरातच पडून राहण्याची वेळ आल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे. महसूल विभागाकडून प्रत्येक शेतकर्‍याला रस्ता उपलब्ध करून देण्याबाबत घोषणा करण्यात आली आहे.
मात्र, गावपातळीवर प्रत्यक्षात या घोषणेची अंमलबजावणी होत नसल्याची शेतकर्‍यांची तक्रार आहे. कायदेशीर रस्त्याच्या मागणीसाठी प्रक्रिया सुरू केल्यानंतरही अनेक वर्षे निर्णयाची प्रतीक्षा करावी लागत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.सरकारी काम आणि बारा वर्षे थांब अशी अवस्था आमची झाली असून, प्रशासनाने शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, अशी भावना शेतकर्‍यांनी व्यक्त केली. या प्रश्नावर खासदार भास्कर भगरे, खासदार शोभा बच्छाव, आमदार दिलीप बनकर, मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून निफाड तालुक्यातील तसेच नाशिक जिल्ह्यातील रेल्वेलगतच्या शेतकर्‍यांचा रस्त्याचा प्रश्न सोडवावा. शासनाने प्रत्येक शेतकर्‍याला रस्ता उपलब्ध करून देण्याची घोषणा केली असेल तर त्याची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

शेतांचे विभाजन

रेल्वेमार्गामुळे शेतकर्‍यांच्या शेतांचे विभाजन झाले असून, ये-जा करण्याचे मार्ग बंद किंवा अडचणीचे झाल्याने शेतकर्‍यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. निफाड तालुक्यासह नाशिक जिल्ह्यात आणि राज्यातील रेल्वेलगतच्या अनेक शेतकर्‍यांना अशाच समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने हा प्रश्न केवळ एका गावापुरता मर्यादित नसून, व्यापक स्वरूपाचा आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारने समन्वय साधून शेतकर्‍यांना कायमस्वरूपी रस्ते उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

रस्त्याअभावी शेती, शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन जीवनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने आमच्या जीवन-मरणाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून तातडीने कायमस्वरूपी रस्त्याची व्यवस्था करावी, अन्यथा शासनाकडे स्वेच्छेने मरणाची परवानगी मागण्याची वेळ शेतकर्‍यांवर येऊ नये.
– दत्तात्रय सुडके, त्रस्त शेतकरी

Students and farmers in Ugawa suffer due to lack of roads

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मातीशी नातं आणि शिक्षणाची वाट

Relationship with the soil and the path to education

19 hours ago

जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…

19 hours ago