जिल्हाधिकार्यांचे अष्टलक्ष्मी कंपनीला निर्देश
नाशिक : प्रतिनिधी
शेतकरी, कामगार आणि बँकेची कोट्यवधींची देणी थकवून नाशिक सहकारी साखर कारखाना (नासाका) चालविणार्या अष्टलक्ष्मी शुगर इथेनॉल अॅण्ड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या कारभाराला अखेर जिल्हा प्रशासनाने लगाम घालण्याची तयारी केली आहे. थकीत देणी भागविण्याबाबत येत्या तीन ते चार दिवसांत ठोस आर्थिक नियोजन सादर करा; अन्यथा कंपनीसह संचालकांच्या वैयक्तिक मालमत्तांवरही जप्तीची कारवाई करून महसूल वसुली प्रमाणपत्राद्वारे (आरआरसी) वसुली करण्याचा थेट इशारा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गुरुवारी (दि.17) दिला.
नासाकाच्या थकीत देणी आणि आगामी गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आणि खा. राजाभाऊ वाजे यांनी सभासदांसमवेत घेतलेल्या बैठकीत अष्टलक्ष्मी कंपनीच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. विशेष म्हणजे, कंपनीचे प्रमुख प्रसाद धावटे स्वत: बैठकीला उपस्थित न राहता केवळ वकिलांना पाठविल्याने प्रशासनाने तीव्र असंतोष व्यक्त केला. आता केवळ आश्वासने नव्हे, तर प्रत्यक्ष देणी कधी आणि कशी भागविणार, याचा स्पष्ट आराखडा शनिवारपर्यंत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.गेल्या गळीत हंगामातील सुमारे 900 शेतकर्यांना अद्याप तब्बल 3 कोटी 90 लाख रुपयांची ऊस बिले मिळालेली नाहीत. दुसरीकडे कारखान्यात काम करणार्या कर्मचार्यांचे तब्बल पाच महिन्यांचे वेतन रखडले असून, त्याची रक्कम सुमारे 1 कोटी 50 लाख रुपये आहे. त्यामुळे शेतकरी आणि कामगार या दोन्ही घटकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. दरम्यान, कंपनीच्या सर्व बँक खात्यांची सविस्तर माहिती, आर्थिक व्यवहार आणि उपलब्ध निधीचा तपशील तातडीने सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत. कंपनीकडे उपलब्ध असलेला निधी, झालेल्या विक्रीतून मिळालेली रक्कम आणि थकीत देणी यांचा ताळमेळ तपासण्याच्या दृष्टीने ही माहिती महत्त्वाची ठरणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी विशेष लेखापरीक्षक संतोष वाकचौरे, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, जिल्हा बँक मुख्य कार्य. अधिकारी अरविंद शिंदे, व्यवस्थापक मिलिंद देवकुटे, अवसायक प्रदीप आव्हाड, कामगार उपआयुक्त विकास माळी, पुण्याचे प्रसाद घावटे यांच्या वतीने अॅड. इशम देशपांडे उपस्थित होते. नासाका शेतकी अधिकारी विनोद ढगे, कार्यालयीन अधीक्षक सुधाकर गोडसे, श्रीकांत गोडसे, तानाजी गायधनी, बाबूराव मोजाड, जगन्नाथ आगळे, शिवाजी गायधनी, अनिल गायधनी, कैलास टिळे, अशोक गायधनी, अशोक टिळे, नामदेव गायधनी, सुनील गायधनी, शिवाजी म्हस्के, नारायण मुठाळ, महादू गायधनी, विलास गायधनी, मोतीराम जाधव उपस्थित होते.
Submit a financial plan regarding ‘NASAKA’s’ outstanding dues.