रविवार ठरला खरेदीचा वार!

♦ गणेशोत्सव साहित्याचा बाजार फुलला
♦ पावसामुळे तारांबळ, साहित्य सुरक्षित ठेवताना कसरत

नाशिक : प्रतिनिधी
गणेशोत्सवाला अवघा आठवडा शिल्लक असताना बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी उसळत आहे. काल (दि. 6) रविवारमुळे बाजारात गणेशोत्सव साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाल्यामुळे मेनरोड, कानडे मारुती लेन परिसरात कोंडी पाहावयास मिळाली. अधूनमधून येणार्‍या पावसाच्या सरींमुळे व्यावसायिकांची मोठी तारांबळ उडत होती. रस्त्याच्या कडेला दुकाने थाटलेल्या व्यावसायिकांना माल भिजू नये म्हणून तारेवरील कसरत करावी लागत होती.
शनिवारी औद्योगिक वसाहतीला सुट्टी असल्याने गणेशोत्सवाच्या तयारीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती. मात्र, पावसामुळे साहित्य विक्रीला फटका बसला.
गणेशोत्सवासाठी आवश्यक असलेले सजावटीचे साहित्य, मखर, विद्युत रोषणाई, पूजेचे साहित्य, फुलांच्या माळा, तसेच गणेशमूर्तींचे बुकिंग करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाजारात गर्दी करताना दिसून येत आहे. काल सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरू राहिल्याने अनेकांनी बाजारपेठेत जाणे टाळले होते. मात्र दुपारी उघडीप मिळाल्याने दुपारनंतर बाजारपेठेत मोठी गर्दी पाहावयास मिळाली.
पावसामुळे बाजारपेठेत खरेदी करणार्‍या नागरिकांनाही अडचणींचा सामना करावा लागला. रस्ते व दुकानांसमोरील परिसर ओला व निसरडा झाल्याने पाय घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात आणलेले कागदी सजावटीचे साहित्य, मखर, सजावटीच्या वस्तू आणि इतर साहित्य दुकानाबाहेर मांडण्यात आले होते. पाऊस सुरू झाल्यानंतर हे साहित्य भिजू नये म्हणून तातडीने आत घेणे किंवा ताडपत्रीने झाकणे भाग पडत होते. त्यामुळे ग्राहकांना वस्तू दाखविण्यातही अडचणी आल्या. काही विक्रेत्यांना दिवसभर विक्रीपेक्षा साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी अधिक कसरत करावी लागली. गणेशमूर्ती विक्रेत्यांसमोरही मूर्ती सुरक्षित ठेवण्याचे आव्हान निर्माण झाल्याचे चित्र आहे.

मंडळांच्या तयारीला पावसाचा अडथळा

गणेशोत्सवासाठी शहरातील विविध गणेश मंडळांकडून मंडप, देखावे व सजावटीची कामे सुरू आहेत. मात्र, पावसामुळे उघड्यावर सुरू असलेली कामे वारंवार थांबवावी लागत आहेत. देखाव्याचे साहित्य भिजण्याची भीती असल्याने कार्यकर्त्यांना अतिरिक्त खबरदारी घ्यावी लागत आहे. त्यामुळे तयारीचा वेगही मंदावला आहे.

गणेशमूर्ती बुकिंगवर भर

लाडक्या बाप्पाच्या आगमनापूर्वीच बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाल्याचे चित्र आहे. बाजारात विविध प्रकारच्या आकर्षक गणेशमूर्ती दाखल झाल्या आहेत. लाडका बाप्पा पसंतीवर सध्या नागरिक भर देत आहेत. त्यामुळे सहकुटुंब गणेशमूर्ती बुकिंगसाठी गर्दी पाहावयास मिळत आहे. यंदा गतवर्षापेक्षा गणेशमूर्तीच्या किमतीत वाढ झाली आहे. नावीन्यपूर्ण गणेशमूर्ती ग्राहकांचे लक्ष वेधून घेत असल्याचे चित्र आहे. याशिवाय सजावटीचे साहित्य खरेदीकडेही नागरिकांचा ओढा दिसत आहे.

 

Sunday turned out to be the day for shopping!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *