त्रस्त रहिवाशांची पोलिसांकडे मागणी
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
जेलरोड भागातील कॅनॉल रोडवर असलेल्या राजीव गांधीनगर आणि इंगळेनगर परिसरात गेल्या महिनाभरापासून अज्ञात समाजकंटकांकडून घरांवर दगडफेक केली जात आहे. दिवसा आणि रात्रीच्या वेळी अचानक होणार्या या दगडफेकीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये कमालीची घबराट पसरली असून, या टवाळखोरांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी आर्त मागणी त्रस्त रहिवासी करीत आहेत.
महिनाभरापासून दहशत, छोट्या-मोठ्या दगडांचा वापर
राजीव गांधीनगर आणि इंगळेनगर भागातील काही ठराविक घरांना लक्ष्य करून गेल्या महिनाभरापासून अज्ञात टोळक्याकडून दगडफेक केली जात आहे. छोटे-मोठे आणि टोकदार दगडांचा वापर करून घरांच्या पत्र्यांना लक्ष्य केले जात आहे. अचानक होणार्या या हल्ल्यांंमुळे घरात राहणेही असुरक्षित झाले असून, परिसरातील महिला आणि लहान मुलांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे.
या समाजकंटकांचा मुख्य उद्देश परिसरात दहशत माजविणे हाच असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे.
कॅनॉल रोड हा परिसरातील एक मुख्य आणि गजबजलेला रस्ता आहे. या रस्त्यावरून दिवसभर आणि रात्रीच्या वेळीही पादचारी, नोकरदार वर्ग आणि वाहनधारकांची मोठी वर्दळ असते.
तसेच, परिसरातील शालेय विद्यार्थीही याच रस्त्यावरून ये-जा करतात. अशा अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी समाजकंटकांकडून बेधडकपणे दगडफेक केली जात असल्याने, एखादा मोठा दगड रस्त्यावरून जाणार्या पादचार्याला किंवा शालेय विद्यार्थ्याला लागून गंभीर दुखापत होण्याची किंवा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कठोर उपाययोजना करण्याची गरज
या गंभीर प्रकारामुळे स्थानिक नागरिक प्रचंड मानसिक दडपणाखाली वावरत आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार्या या समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त (पेट्रोलिंग) वाढवावी, संशयितांची धरपकड करावी आणि मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून या टवाळखोरांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी तीव्र मागणी राजीव गांधीनगर आणि इंगळेनगरमधील रहिवाशांनी केली आहे. आता पोलीस प्रशासन यावर काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Take action against the gang pelting stones at houses in the Jail Road area.