तीन कर्मचारी निलंबित, पीआय भरत जाधव यांची उचलबांगडी
सिन्नर : प्रतिनिधी
माळेगाव औद्योगिक वसाहतीतील 14 वर्षीय मुलीच्या आत्महत्या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यास झालेल्या दिरंगाईची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक धोंडोपंत स्वामी यांनी मुसळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील संबंधित अधिकारी व कर्मचार्यांवर कठोर कारवाई केली आहे. या कारवाईत तीन जणांना निलंबित करण्यात आले असून, प्रभारी पोलीस निरीक्षकांचीही तातडीने बदली करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
माळेगाव औद्योगिक वसाहतीतील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ झाल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणी भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी शुक्रवारी (दि.3) विधानसभेत आवाज उठवत दोषींवर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक धोंडोपंत स्वामी यांनी चौकशीचे आदेश देत संबंधित अधिकार्यांची जबाबदारी निश्चित केली.
चौकशीत माळेगाव बीटचे पोलीस कर्मचारी अमोल गुंजाळ व जयेश खाडे तसेच त्या दिवसाचे ठाणे अंमलदार प्रशांत वाघ यांची भूमिका आढळून आल्याने त्यांना निलंबित करण्यात आले. गुन्हा नोंदविण्यात झालेल्या दिरंगाईबाबत त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.
याशिवाय, तत्कालीन प्रभारी पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक सुनील सुरेश बडगुजर यांनी मुसळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे.
या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली असून, कर्तव्यातील हलगर्जीपणा आणि दिरंगाई सहन केली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश वरिष्ठांकडून देण्यात आल्याचे मानले जात आहे.
मुख्य आरोपी उत्तर प्रदेशातून ताब्यात
माळेगाव येथील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेल्या मुख्य संशयित आरोपीला मुसळगाव एमआयडीसी पोलिसांनी उत्तर प्रदेशातून ताब्यात घेतले आहे. उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यात शनिवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. उपनिरीक्षक नितीन सप्तर्षी, पोलीस हवालदार समाधान बोराडे आणि उमेश खालकर यांच्या पथकाने आरोपीचा माग काढत उत्तर प्रदेश गाठले होते. पथकाने मेहताब शमशाद खान याला शोधून काढत
ताब्यात घेतले.
Action taken against police in minor girl’s suicide case.