तीन वर्षांपासून प्रलंबित असलेली जिल्हा उद्योग मित्रची बैठक त्वरित घ्या

आयमाचे डीआयसी महाव्यवस्थापकांना निवेदन
नाशिक- उद्योजकांचे ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेली जिल्हा उद्योग मित्र (झुम)ची बैठक त्वरेने घेण्यात यावी या मागणीचे निवेदन अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन(आयमा)चे अध्यक्ष निखील पांचाळ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळातर्फे जिल्हा उद्योग केंद्राचे  महाव्यवस्थापक संदीप पाटील यांना देण्यात आले.
उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आयमा ही संघटना प्रयत्न करते हे आपणास ज्ञात असेलच.या संघटनेचे 2500हून अधिक सदस्य आहेत.या उद्योजकांचे अनेक मूलभूत प्रश्न आहेत.विविध समस्यांही आहेत.त्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत होणारी   झुम(जिल्हा उधोग मित्र) महत्वाची भूमिका बजावत असते.कारण या बैठकीस सर्व यंत्रणांचे अधिकारी आवर्जून उपस्थित राहतात आणि उद्योजकांच्या प्रश्नांची तातडीने उकल होण्यास मदत होते.परंतु गेल्या तीन वर्षांत ही बैठक न झाल्याने उद्योजक संभ्रमात आहेत.औद्योगिक वसाहतीतील सुरक्षा व्यवस्था,पथदीप, नालेसफाई,पाण्याची कमतरता आदी प्रश्नांनी उद्योजक हैराण असून त्याबाबत तातडीने मार्ग काढण्यास झुम बैठक तातडीने घेण्यात यावी अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.या बैठकीबाबत आधीही दोन निवेदने देण्यात आल्याची आठवणही पांचाळ यांनी निवेदनात करून दिली आहे.
संदीप पाटील यांना भेटलेल्या शिष्टमंडळात उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे,सरचिटणीस ललित बूब, चिटणीस गोविंद झा,योगिता आहेर,कोषाध्यक्ष राजेंद्र कोठावदे यांचाही समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *