श्रद्धा माणसाला आधार देते. सकारात्मकता निर्माण करते आणि नैतिकतेकडे नेते. पण अंधश्रद्धा विचारशक्ती संपवते. मनात भीती निर्माण करते आणि नैतिकतेकडे घेऊन जाते. एपस्टिन प्रकरणाने देशाच्या राजकारणात एकीकडे खळबळ उडवून दिली असताना, नाशिकमध्ये कॅप्टन अशोक खरात प्रकरण हे महाराष्ट्राचे एपस्टिनच आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. लोकांना तत्त्वज्ञानाचे डोस पाजण्याचे काम संविधानिक पदावर बसलेल्या रूपाली चाकणकर यांनी केले. मात्र, दुसर्याला उपदेश करताना आपण किती खोल पाण्यात आहोत, याचाच त्यांना विसर पडला. अन् एका ज्योतिषाच्या नादाला लागून स्वत:चेच ग्रह फिरवून घेतले. महाराष्ट्र ही छत्रपती शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर यांची भूमी आहे. पुरोगामी महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम आजवर अनेक महापुरुषांनी केले. पण, दुर्दैवाने या महापुरुषांच्या विचारांवर वाटचाल करण्याऐवजी आपला समाज आजही बाबा, बुवांच्या मागे लागतोय. सारासार विवेक बाजूला सारून कुणीतरी सांगतोय म्हणून विश्वास ठेवून बाबाच्या डोक्यावर माथा टेकवत आहोत. आपण ज्यांच्या पायावर डोके टेकवतोय ते पाय पवित्र आहे का? याचा विवेक अंधश्रद्धेमुळे हरवून बसलेला समाज आज उदयास आला आहे.
नको नको रे ज्योतिषा
माझ्या दारी नको येऊ
माझे दैव मला कळे
माझा हात नको पाहू..
म्हणे नशिबाचे नऊ ग्रह
तळहाताच्या रेघोट्या
बापा नको मारू थापा
अशा उगा खर्या खोट्या
अशा शब्दांत थोर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी समाजातील भोंदूगिरीवर प्रहार केला आहे. शाळेत न गेलेल्या एका कवयित्रीला हे कळाले, पण उच्च शिक्षित समाजाला न कळल्यामुळे आजही बाबा आणि बुवाबाजीचे स्तोम माजलेले दिसून येते. कॅप्टन अशोक खरात हे केवळ हिमनगाचे एक टोक आहे. आजही समाजात कितीतरी खरात बाबासारखे अनेक तथाकथित भोंदू समाजात उजळमाथ्याने फिरून लोकांच्या असहायतेचा गैरफायदा घेतच आहेत.
तथाकथित भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कृत्याची ‘कॅप्टन फाइल’ ओपन झाली आणि त्यामुळे अनेकांचे ग्रह फिरले. कालपर्यंत जो बाबा दुसर्याचे भविष्य सांगत होता, त्याचे स्वत:चेच भविष्य आज अंधःकारमय झाले आहे. विशेष म्हणजे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा असलेल्या रूपाली चाकणकर यांनी या भोंदूबाबाला गुरू मानले होते. एकीकडे त्या बाबाचे पाय धुतानाचे व्हिडिओ आणि दुसरीकडे त्यांचेच मुलींनी सासरी जाताना संविधान वाचावे, असा सल्ला देणारे व्हिडिओ व्हायरल होत होते. त्यामुळे लोकांना उपदेशाचे डोस पाजताना आपण किती पाण्यात आहोत, याचा विचारच रूपाली चाकणकर यांनी केला नाही. त्यामुळे त्यांचे ग्रह फिरले आणि त्याची परिणती म्हणून त्यांना अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले.
‘मुलगी शिकली, प्रगती झाली’ असे आपण एकीकडे म्हणतो. पण असे असतानाही कॅप्टन अशोक खरातकडे जाणार्या महिला कशा बळी पडल्या? असा प्रश्न निर्माण होतो. विशेष म्हणजे, जे काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ते किळस आणणारे आहेत. शिकलेल्या महिला अशा बाबा-बुवांच्या नादी लागतातच कशा? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
महिला आयोग हे महिलांच्या हक्कांचे संरक्षण, अत्याचाराच्या तक्रारींची दखल आणि न्याय मिळवून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे व्यासपीठ आहे; परंतु महिला आयोगाच्या अध्यक्षांवरच असे आरोप होत असतील तर सामान्य महिलांनी न्यायासाठी कुठे जावे, हा मोठा प्रश्न निर्माण होतो.
खरातविरुद्ध एका 35 वर्षीय महिलेने केलेल्या तक्रारीनंतर नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांनी त्याला अटक केली. विवाहित महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप खरातवर आहे. ही पीडित महिला कौटुंबिक समस्या सोडविण्यासाठी ज्योतिष आणि अंकशास्त्राच्या बहाण्याने त्याच्या संपर्कात आल्याचे समोर आले आहे.
एका संवैधानिक पदावर असलेल्या रूपाली चाकणकर यांनी अशा बाबा-बुवाच्या नादी लागून गुरुस्थानी असल्याचे सांगत त्यांचे पाय धुणे, डोक्यावर छत्री धरणे आदी प्रकार करणे हे पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारेच होते. महिला आयोगाच्या अध्यक्षांनीच अशा बुवा-बाबाशी सलगी केली असेल तर महिलांनी कोणाकडे दाद मागायची? देवावरची श्रद्धा वेगळी, पण देव आणि तुमच्यामध्ये अशा बुवा-बाबाची दलाली करताना तो बुवा-बाबा तुमच्या भावनांसह शरीराशी खेळतो याचेे महिलांना भान नसावे, याचे वाईट वाटते. मग मुलीच्या शिक्षणाचा उपयोग काय, असे वाटल्याशिवाय राहत नाही.
सुषमा अंधारे यांनी नुकताच एक व्हिडिओ व्हायरल केला असून, त्यात चाकणकरबाई काही दिवसांपूर्वी ज्ञान पाजळत होत्या की, आम्ही महिलांना पोथ्या-पुराणात अडकवून ठेवले आहे. पालकांनी मुलींच्या हाती संविधान दिले पाहिजे वगैरे. पण राज्य महिला आयोगाच्या संवैधानिक पदावर असूनही बुवा-बाबाच्या नादी लागून पाद्यपूजा अन् इतर धार्मिक कार्यक्रमांत सहभागी होत अंधश्रद्धेला खतपाणीच घालण्याचे काम चाकणकर यांनी केले. एवढ्यावरच त्या थांबल्या नाही तर एका कार्यक्रमादरम्यान, त्यांनी खरातला थेट विठ्ठलाची उपमा दिल्याने तेव्हा वारकरी संप्रदाय देखील संतापला होता.
बुवाबाजी, त्यातून लैंगिक अत्याचार, ब्लॅकमेलिंग, खंडणी हे प्रकार नवीन नाहीत. तरीही सामान्य लोक यातून धडा घेण्याचे सोडून पुन्हा ये रे माझ्या मागल्या करीत अशा बुवा-बाबांशी जवळीक साधून भविष्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. अमुक खडा रत्न, पूजाविधी केल्यास तुम्हाला होणार्या त्रासापासून सुटका होईल किंवा अमुक पूजा केल्याने प्राण वाचतील वगैरे अशा थोतांड कथांना भुलून कित्येकांनी आपले सर्वस्व (?) पणाला लावले असावे. मुळात जगात अशी कोणतीच विद्या नाही. की भविष्यात काय होईल, हे कळू शकेल. तरीही लोक अशा भोंदूच्या आहारी जातातच.
राज्यातील महिलांच्या हक्काचे संरक्षण, तक्रारींची दखल आणि महिला सक्षमीकरणासाठी काम करणेे, घरगुती हिंसा, छळ, अत्याचार, कामाच्या ठिकाणी छेडछाड, अशा तक्रारी सोडविणे. गंभीर प्रकरणात स्वतः चौकशी करणे हे खरे तर राज्य महिला आयोगाचे काम आहे. पण येथे कुंपणानेच शेत खाल्ले त्यामुळे दाद मागायची कुणाकडे? शिवाय चाकणकर यांचाच या कॅप्टनशी घरोबा असल्याने या कॅप्टनविरुद्ध तक्रार करण्याची कोण्या महिलेची हिंमत तरी कशी होणार? महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणाचा भांडाफोड वर्षभरापूर्वी केला होता. त्या पत्रकारालाही चाकणकरांनी धमकावल्याचे समोर आले आहे. यावरून आपल्या पदाचा दुरुपयोग केला, हे स्पष्ट होते. आरोपी व्यक्तीला राजकीय पाठबळ असेल तर न्याय मिळण्याची प्रक्रिया आणखी कठीण होते.
आज खरात प्रकरणामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पीडित महिलांना न्याय मिळेल का? आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, खरातच्या एवढ्या सर्व लीला उघड होऊनही समाज अंधश्रद्धेतून बाहेर पडेल का? या प्रश्नांंची उत्तरे येणारा काळच देईल. मात्र, एक गोष्ट निश्चित, अंधश्रद्धा आणि सत्तेचे संगनमत जर असेच चालू राहिले तर समाजातील दुर्बल घटकांचे शोषण
थांबणार नाही.
महिलांनी जागरूक व्हावे
भारतात बुवाबाजी, अंधश्रद्धा आणि त्यातून होणारे शोषण हे नवीन नाही. लैंगिक अत्याचार, ब्लॅकमेलिंग, आर्थिक फसवणूक यांसारख्या अनेक घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. तरीही समाज त्यातून धडा घेताना दिसत नाही. लोक अजूनही भविष्य जाणून घेण्याच्या, समस्या सोडविण्याच्या नावाखाली अशा लोकांच्या जाळ्यात अडकतात. जेव्हा व्यवस्था, शिक्षण आणि सामाजिक आधार कमी पडतो, तेव्हा लोक अशा मार्गांकडे वळतात. या पाश्वर्र्भूमीवर समाजाने आणि विशेषतः महिलांनी अधिक जागरूक होणे गरजेचे आहे. शिक्षणाचा खरा उपयोग म्हणजे विवेक निर्माण होणे. अंधश्रद्धेला बळी पडणे नव्हे. पालकांनी मुलींना केवळ शिक्षणच नव्हे, तर विचार करण्याची क्षमता दिली पाहिजे.
Tell people about Brahmanism..!
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…