उत्तीर्णतेचा टक्का वाढण्याची शक्यता
नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या टीईटी अर्थात, शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.3) जाहीर होणार आहे. चार लाखांहून अधिक परीक्षार्थींचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे 23 नोव्हेंबर 2025 ला राज्यभरात एक हजार 420 परीक्षा केंद्रांवर टीईटी परीक्षा घेण्यात आली होती. राज्यभरातून चार लाख 75 हजार उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. त्यानंतर अंतिम निकाल कधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे. परिणामी यंदा टीईटी प्रविष्ट होणार्या उमेदवारांची संख्यादेखील वाढली असल्याने निकालाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, परीक्षा मंडळाने परीक्षेनंतर 16 जानेवारीला उत्तरसूची जाहीर करून उमेदवारांच्या लॉगीनमध्ये अंतरिम निकाल उपलब्ध करून दिला होता. त्यानंतर गुणांची पडताळणी आणि निकालावर आक्षेप नोंदविण्यासाठी 21 जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर आता आज (दि. 3) अंतिम निकाल जाहीर होणार आहे. प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न चुकल्यामुळे प्रश्नाचे गुण वजा करून निकाल जाहीर केला जाईल.
250 अनुत्तीर्ण उमेदवारांचे काय?
परीक्षेच्या दिवशी सीडीओ-मेरी परीक्षा केंद्रात इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना मराठी माध्यमाचा पेपर देण्यात आला होता. उमेदवारांनी ही चूक निदर्शनास आणून देत इंग्रजी माध्यमाचा पेपर देण्याची मागणी करूनही मराठी माध्यमाचाच पेपर सोडवण्यास सांगण्यात आले. त्यामुळे उत्तरसूची निकालात हे 250 उमेदवार अनुत्तीर्ण झाले आहेत. त्यानंतर उमेदवारांनी आंदोलन करीत उत्तीर्ण करण्याची मागणी केली. या आंदोलनानंतर परीक्षा मंडळाने अनुत्तीर्ण उमेदवाराना संपर्क साधून घडलेला प्रकार जाणून घेतला आहे. त्यामुळे या उमेदवारांबाबत परीक्षा मंडळाने काय निर्णय घेतला, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
TET results to be announced today