सिन्नर नगरपरिषदेतील विषय समित्यांची आज निवड

सभापतिपदावरून राजकीय हालचाली; स्थायी समितीकडेही लक्ष

सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सदस्य व सभापतिपदांची निवड आज, मंगळवारी (दि. 3) होणार आहे. यासाठी सकाळी 11 वाजता नगरपरिषद सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पीठासनाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडप्रक्रिया पार पडणार आहे. ही माहिती मुख्याधिकारी अभिजित कदम यांनी दिली.
नगरपरिषदेतील आरोग्य रक्षण व वैद्यकीय, पाणीपुरवठा व जलनिस्सारण, नियोजन व विकास, महिला व बालकल्याण, शिक्षण, सांस्कृतिक, क्रीडा आणि बांधकाम अशा सहा विषय समित्यांवर प्रत्येकी नऊ सदस्यांची निवड केली जाणार आहे.
यांपैकी एका समितीचे पदसिद्ध सभापतिपद उपनगराध्यक्षांना मिळणार असून, उर्वरित समित्यांच्या सभापतिपदासाठी नगरसेवकांमध्ये चुरस निर्माण झाली आहे.
निवड होणार्‍या सहा विषय समित्यांचे सदस्य हे स्थायी समितीचे पदसिद्ध सदस्य असतात, तर नगराध्यक्ष हे स्थायी समितीचे पदसिद्ध सभापती म्हणून काम पाहतात. स्थायी समितीत किमान दहा सदस्य आवश्यक असल्याने उर्वरित तीन जागांवर कोणाला संधी मिळणार, याबाबत सिन्नरकरांमध्ये उत्सुकता आहे.

संख्याबळावरून गणिते

तीस सदस्यांच्या सिन्नर नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे 13, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)चे 14, भाजपचे दोन, तर शिंदे गटाचा एक नगरसेवक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले जनतेतून निवडून आले आहेत. या संख्याबळाचा विचार करता आमदार माणिकराव कोकाटे आणि खासदार राजाभाऊ वाजे या दोन्ही गटांना सहाही विषय समित्यांवर साधारण समान प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजप आणि शिंदे गटालाही काही समित्यांवर सदस्यपदाची संधी मिळू शकते. मात्र, सभापतिपदांच्या वाटपात दोन्ही प्रमुख गटांमध्ये समन्वय होतो की राजकीय कुरघोडी, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sinnar Municipal Council subject committees to be elected today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *