कृष्णाने व्रजमंडळात गायी चारताना स्वतःची आणि सवंगड्यांच्या शिदोर्या एकत्र करून खाद्यपदार्थांचा काला केला आणि सर्वांसह ग्रहण केला. या कथेला अनुसरून पुढे श्रीकृष्ण जयंतीच्या दुसर्या दिवशी काला करण्याची आणि दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली. कालपरत्वे या प्रथेचे व्यावसायीकरण झाले आणि ठिकठिकाणी लाखांची बक्षिसे मिळवून देणार्या हंड्या बांधल्या जाऊ लागल्या. आता नवरात्रीप्रमाणे दहीहंडी उत्सवही राजकारणी आणि धनदांडग्यांची मक्तेदारी झाली आहे. त्यामुळे उत्सवाचे रूपांतर आता इव्हेंट्समध्ये होऊ लागले आहे.
जो अधिक रकमेची बक्षिसे लावेल त्याच्या दहीहंडीला मोठ्या प्रमाणात गर्दी तर दिसतेच. शिवाय वृत्तवाहिन्या, लोकल केबल नेटवर्कवाले अशा ठिकाणी पहाटेपासून दबा धरून बसलेली पाहायला मिळतात. अशा अधिकाधिक इव्हेंटच्या ठिकाणी जाऊन थरावर थर लावायचे, सलामी द्यायची आणि तेवढ्या थरांसाठी ठरवण्यात आलेली रक्कम घेऊन पुढच्या दहीहंडीच्या ठिकाणी जायचे. केवळ याचसाठी मुंबई ठाण्यातील तरुणांची अनेक पथके एकेक महिना आधीपासून थर उभारण्याचा कसून सराव करताना पाहायला मिळतात. लोकांनी अधिक गर्दी करावी यासाठी या इव्हेंट्सच्या ठिकाणी सेलिब्रिटीजनाही अतिथी म्हणून बोलावले जाते. त्यांच्याकडून नृत्य करवून घेतले जाते, चित्रपटातील संवाद म्हणण्यास सांगितले जाते. काही तरुण मंडळी तर खास या सेलिब्रिटी मंडळींना पाहण्यासाठी गर्दी करतात.
गोविंदा पथक येतात, मनोरे रचतात, मोठे साहस करून अगदी वरच्या थराला पोहोचलेली किशोरवयीन मुले जमलेल्या जमावाला अभिवादन करतात. मात्र, खास सेलिब्रिटींना पाहण्यासाठी आलेल्या मंडळींचे या गोविंदा पथकांकडे लक्षही नसते. वृत्तवाहिन्या, केबल नेटवर्क यांचे कॅमेरेसुद्धा केवळ सेलिब्रिटींभोवतीच घुटमळत असतात. थर लावण्यासाठी येणार्या तरुणांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी डीजेची विशेष व्यवस्था केलेली असते, पाण्याचे फवारे मारण्यासाठी पाण्याच्या टँकरची या
ठिकाणी रांग लागलेली पाहायला मिळते.
दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्यासाठी राज्य सरकारच्या पुढाकारातून मागील काही वर्षांपासून मुंबईत प्रो-कबड्डीच्या धर्तीवर प्रो-दहीहंडीचे आयोजन केले जात आहे. अर्थात, याठिकाणी दहीहंडीच नसल्याने दहीहंडीच्या नावावर ती मानवी मनोर्यांची स्पर्धाच असले असेच म्हणावे लागेल. दहीहंडी उत्सवाच्या दिवशीही पुन्हा हेच चित्र पाहायला मिळते. ज्या ठिकाणी दहीहंडीचा इव्हेंट बनवला जातो त्या ठिकाणी दहीहंडी केवळ नावाला उभी केलेली असते. अधिकाधिक थर लावा आणि तेवढ्या थरांसाठी नियोजित केलेली रक्कम घेऊन जा, हा एकच कार्यक्रम याठिकाणी राबवला जातो. त्यामुळे याला उत्सव म्हणावे की साहसी खेळाची प्रात्यक्षिके हाही एक प्रश्नच आहे. राज्य सरकारने गोविंदा पथकांना लाखो रुपयांचे विमाकवच देऊन या मनोर्याच्या स्पर्धेला जणू प्रोत्साहनच देत असते. आज सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत. त्यामुळे दहीहंडीही यातून सुटलेली नाही. मुंबईत महिला गोविंदा पथकांची संख्याही वर्षागणिक वाढू लागली आहे.
ज्या ठिकाणी महिला गोविंदा पथक हंडी फोडण्यास येतात अशा ठिकाणी बघ्यांची गर्दी जरा जास्तच झालेली पाहायला मिळते.श्रीकृष्णाने बालगोपाळांसह हंड्या फोडून लोणी खाल्ल्याचे सर्वांनाच ज्ञात आहे. मात्र, गोपिकांनी त्याकाळी असे काही केलेले नाही. त्यामुळे दहीहंडी उत्सवाकडे धार्मिक उत्सव म्हणून पाहायचे असेल, तर किमान महिलांच्या हंडीची तरी या उत्सवामध्ये गणना करू नका. श्रीकृष्णाचे सवंगडी विविध वर्णातील तर होतेच. शिवाय त्यातील अनेक जण खूपच गरीबही होते. आपल्या सवंगड्यांसह आपलीही शिदोरी एकत्र करून सारे भेद नष्ट करून एकत्र येण्याचा मोलाचा संदेश श्रीकृष्णाने गोपाळकाल्याच्या माध्यमातून दिला आहे. आज मात्र आपलीच दहीहंडी मोठी आणि अधिक बक्षिसे मिळवून देणारी कशी याचीच स्पर्धा पोस्टरबाजीच्या माध्यमातून रंगलेली पाहायला मिळते.
गणपती मंडळाप्रमाणे आता दहीहंडीचे इव्हेंट्स भरवणार्या धनदांडग्यांची संख्या वर्षागणिक वाढू लागली आहे. या इव्हेंट्ससाठी रस्ते अडवले जातात, वाहतुकीचे मार्ग बदलले जातात, ज्यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होतात ती वेगळी गोष्ट. ठाण्यातील बदलापूर येथे यंदा दहीहंडीचा सराव करताना वरच्या थरावर चढलेल्या बालकाचा सेफ्टी बेल्ट तुटल्याने सातव्या थरावरून तो खाली कोसळला. खाली उभ्या असलेल्या तरुणांनी त्याला झेलल्याने अनर्थ टळला. तरीही दरवर्षी कितीतरी गोविंदा वरच्या थरावरून कोसळून किंवा चेंगरून जखमी होतात. काही वेळा जीवालाही मुकतात. त्यामुळे सध्या गोपाळकाला उत्सवाच्या नावावर चाललेला हा सर्व प्रकार म्हणजे मनोरे रचण्याची आणि साहस दाखवण्याची जीवघेणी स्पर्धा बनू लागली आहे.
The Deadly Competition of Human Pyramids