मुलाला चौकशीनंतर सोडले, पत्नी फरारच
सिडको : प्रतिनिधी
भोंदूूबाबा अशोक खरात याला बुधवारी (दि. 1) न्यायालयात हजर केल्यानंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्याची नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. मात्र, कारागृहातील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच विशेष तपास पथकाने (एसआयटी) त्याला दुसर्या गुन्ह्यात पुन्हा दुपारी ताब्यात घेतले. आज, गुरुवारी (दि. 2) पुन्हा जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
दरम्यान, खरातची पत्नी अजून फरारच असून, खरातचा मुलगा हर्षवर्धन याला मंगळवारी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, काल त्याला चौकशी करून सोडून देण्यात आले.
राज्यात गाजत असलेल्या या प्रकरणात पोलीस कोठडी संपल्यानंतर खरातला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी एका लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात न्यायालयाने त्यालान्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली. मात्र, त्याच्याविरोधातील इतर गुन्ह्यांच्या तपासासाठी एसआयटीने न्यायालयाकडे अर्ज केला होता. न्यायालयाने अर्ज मंजूर केल्यानंतर एसआयटीने कारागृहातूनच त्याला ताब्यात घेतले. यामुळे एका गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी असतानाही सध्या तो एसआयटीच्या ताब्यात आहे. दरम्यान, तपासात त्याने सुमारे 1500 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता उभी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जमीन खरेदी करून पैसे न देणे तसेच सावकारीच्या माध्यमातून फसवणूक केल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. त्याच्याविरोधातील गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकरणात त्याचा मुलगा हर्षवर्धन खरात यालाही जमीन व सावकारी व्यवहारांशी संबंधित गुन्ह्यात ताब्यात घेतले होते. मात्र, त्याची चौकशी करून त्याला सोडून देण्यात आले.
खरातची पत्नी फरार
भोंदू अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात हिच्याविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अटक होण्यापूर्वीच ती फरार झाली. पोलिस तिचा शोध घेत असून, तिच्या मागावर दोन पथके पाठविण्यात आलेले असल्याचे समजते.
Judicial custody in the morning; Kharat back in SIT custody in the afternoon