बड्या नेत्यांच्या तोफा धडाडणार

महापालिका निवडणुकीच्या प्रचारात येणार रंगत

नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्वर्र्भूमीवर महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. पुढील पाच दिवस विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या जाहीर सभा, रोड शोद्वारे नाशिकचे राजकीय मैदान गाजणार आहे. त्यामुळे आता या सभांच्या माध्यमातून नाशिककरांवर आश्वासनांची खैरात होईल. सर्वच पक्षांकडून जाहीर सभांचे नियोजन करण्यात येत आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात सभांचे नियोजन करण्यात येत आहे. या सभांसाठी मैदानांचे बुकिंग करण्यात आले आहे.
महापालिकेच्या 122 जागांसाठी 700 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. 13 जानेवारीपर्यंत प्रचाराची मुदत आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार आणि नेते जोरदारपणे प्रचाराला लागले आहेत. नाशिकमध्ये भाजप स्वबळावर निवडणूक मैदानात उतरला असून, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट युती एकत्रित निवडणूक लढवत आहे. शिवेसना उबाठा, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेेस शरदचंद्र पवार गट, काँग्रेस महाविकास आघाडी असली, तरी 38 ठिकाणी मविआत मैत्रीपूर्ण लढत होत आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांनी प्रचारात उडी घेतली आहे. पुढील पाच दिवस प्रचारसभांचा धुरळा उडणार आहे.

भाजपकडून मुख्यमंत्री मैदानात

भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.नाशिकमध्ये येत्या रविवारी (दि. 11) फडणवीस यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 4 वाजता ठक्कर डोमसमोरील मैदान किंवा गोदाघाटावरील यशवंतराव महाराज पटांगणाचा विचार सभेसाठी केला जात आहे. गेल्या निवडणुकीत फडणवीसांची अनंत कान्हेरे मैदानावरील प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यातील सभा निर्णायकी ठरली होती. याच मैदानातून त्यांनी ’नाशिक दत्तक’ची घोषणा केली होती. त्यामुळे आता फडणवीस नाशिककरांना काय आश्वासन देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षाकडून विभागनिहाय मंत्र्यांच्या सभेचेही आयोजन सुरू आहे.

एकनाथ शिंदे शनिवारी नाशकात

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा शनिवारी (दि.10 जानेवारी) सायंकाळी सहा वाजता अनंत कान्हेरे मैदान येथे होणार आहे. नाशिकमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकत्रित निवडणूक लढत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीसाठी प्रयत्न केले जात आहेत.

 

ठाकरे बंधूंची एकत्रित सभा

शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या बंधूंची एकत्रित सभा शुक्रवारी (दि.9) आयोजित करण्यात आली आहे. नाशिक हा शिवसेना व मनसेचा गड राहिला आहे. त्यामुळे हे बंधू नाशिकच्या विकासासाठी काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे लाव रे तो व्हिडीओ करणार का, याकडेे लक्ष लागले आहे.

भाजपचे मंत्रीही नाशकात

 

 

मंत्री पंकजा मुंडे, मंत्री जयकुमार रावल यांच्याही सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. अन्य स्टार प्रचारकही नाशिकचे मैदान गाजवणार आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून खासदार सुप्रिया सुळे व आमदार रोहित पवार यांच्या प्रचारसभेचे नियोजन केले जात आहे.

The guns of great leaders will be fired.

 

The guns of great leaders will be fired.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *