कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदाघाटावरील कामांना वेग

नाशिक : माधुरी पोटपुळे
अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीकाठावरील प्राचीन व ऐतिहासिक मंदिरांचे नूतनीकरण आणि सुशोभीकरणाचे काम सध्या सुरू आहे. देश-विदेशातून लाखो भाविक कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये दाखल होणार असल्याने श्रद्धेचे केंद्र असलेल्या मंदिरांचे जतन व संवर्धन करण्यावर प्रशासनाने विशेष भर दिला आहे.
गोदावरी ही केवळ नदी नसून नाशिकच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचा आत्मा मानली जाते. रामकुंड, पंचवटी, सीतागुंफा, श्री काळाराम मंदिर, कपालेश्वर महादेव मंदिर, लक्ष्मण कुंड, नारायण मंदिर, गोपाळकृष्ण मंदिर आदी परिसरातील मंदिरांना कुंभमेळ्यादरम्यान अनन्यसाधारण महत्त्व असते. त्यामुळे या सर्व मंदिरांचे नूतनीकरण, दुरुस्ती व रंगरंगोटीचे काम सध्या वेगाने सुरू आहे. पावसामुळे झालेली गळती, भिंतींवरील तडे, मोडकळीस आलेले कळस, तसेच परिसरातील अस्वच्छता यामुळे भाविकांची गैरसोय होत होती.
कुंभमेळ्याच्या निमित्ताने या मंदिरांचे केवळ सौंदर्यीकरण न करता, त्यांचा मूळ ऐतिहासिक व स्थापत्य वारसा जपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पुरातत्त्व विभाग, महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने हे काम सुरू असून, मंदिरांच्या मूळ रचनेत बदल न करता दगडी काम, शिखरांची दुरुस्ती, सभामंडपांचे मजबुतीकरण आणि विद्युतव्यवस्था अद्ययावत केली जात आहे. कुंभमेळा हा जगातील सर्वांत मोठा धार्मिक मेळा मानला जातो. या काळात साधू-संत, आखाडे, नागा साधू, भाविक आणि पर्यटक मोठ्या संख्येने नाशिकमध्ये दाखल होतात. त्यामुळे गोदावरी काठावरील मंदिरांमध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी होते. ही गर्दी लक्षात घेता दर्शन रांगा, प्रवेश व निर्गमन मार्ग, सुरक्षाव्यवस्था आणि स्वच्छतागृहे यांचीही नव्याने आखणी करण्यात येत आहे. अनेक वर्षांपासून रखडलेली कामे आता कुंभमेळ्याच्या निमित्ताने पूर्ण होत आहेत. नदीपात्रातील गाळ काढणे, कचरा व्यवस्थापन, तसेच भाविकांकडून नदीत टाकल्या जाणार्‍या निर्माल्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येत आहे. पर्यावरण संतुलन राखत कुंभमेळा पार पडावा, हा प्रशासनाचा मुख्य उद्देश आहे. काही ठिकाणी काम सुरू असल्यामुळे भाविकांना तात्पुरत्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. मात्र, या कामांमुळे भविष्यातील सोयी-सुविधा अधिक चांगल्या मिळतील.

श्रद्धा आणि विकासाचा संगम

गोदावरी काठावरील मंदिरांचे नूतनीकरण हे केवळ बांधकाम नसून, श्रद्धा आणि विकास यांचा संगम असल्याचे चित्र सध्या नाशिकमध्ये दिसून येत आहे. कुंभमेळा यशस्वी, सुरक्षित आणि भक्तिमय वातावरणात पार पडावा, यासाठी गोदावरी काठावरील मंदिरांचे नूतनीकरण हे एक महत्त्वाचे काम मानले जात आहे. भाविकांच्या सोयीसुविधा, ऐतिहासिक वारशाचे जतन आणि शहराच्या विकासाचा समतोल राखत हे काम वेळेत पूर्ण होईल.

Work on Godaghat accelerates in the backdrop of Kumbh Mela

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *