महाराष्ट्र

सुरांची ‘आशा’ मावळली

ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड

मुंबई : तब्बल आठ दशकांहून अधिक काळ भारतीय रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणार्‍या जादुई आवाजाच्या स्वरसमाज्ञी आशा भोसले यांचे हृदयविकाराने रविवारी (दि. 12) निधन झाले. त्या 93 वर्षांच्या होत्या. प्रकृती बिघडल्याने त्यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयात शनिवारी (दि. 11) रात्री दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच काल सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुरांचा तारा निखळल्याने बॉलिवूडसह संपूर्ण संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. मराठी, हिंदीच नव्हे, तर वीस भाषांमध्ये बारा हजारांहून अधिक एकाहून एक सुरेल गाणी गाण्याचा विक्रम करणार्‍या आशाताईंच्या निधनाने एका सुरेलपर्वाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कारकिर्दीबद्दल पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण, दादासाहेब फाळके यांसारख्या अवॉर्डने त्यांना गौरविण्यात आले होते. आज, सोमवारी (दि. 13) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

आशा भोसले यांना प्रकृती अस्वास्थामुळे तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आशा भोसले यांची नात जनाई भोसले हिने सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्या आजीच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती. तिने सांगितले की, माझ्या आजीला चेस्ट इंफेक्शन आणि खूपच अशक्तपणा आला आहे. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. कृपया, आमच्या प्रायव्हसीचा आदर राखा. तिच्यावर उपचार सुरू आहेत. ती लवकरच बरी होईल. मात्र, काल (दि. 12) सकाळी त्यांचे प्राणज्योत मालवली.
आशाताईंची कारकीर्द
मंगेशकर घराण्यात जन्मलेल्या आशा भोसले, भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वांत बहुगुणी आणि दिग्गज पार्श्वगायिकांपैकी एक. त्यांनी आपल्या कारकिर्दीत हजारो गाणी गायली असून, हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, तामीळ, तेलुगू अशा अनेक भाषांमध्ये आपला आवाज दिला आहे. 1950 च्या दशकात त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली आणि हळूहळू आपल्या वेगळ्या शैलीमुळे त्यांनी स्वतःचे खास स्थान निर्माण केले. त्यांनी क्लासिकलपासून कॅबरे, पॉप, गझल आणि रोमँटिक गाण्यांपर्यंत प्रत्येक प्रकारात आपली छाप पाडली. ’पिया तू अब तो आजा’, ’दम मारो दम’, ’इन आँखों की मस्ती’ यांसारखी त्यांची गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक राष्ट्रीय पुरस्कार आणि पद्मविभूषणसारखे सन्मान मिळवले होते. त्यांच्या आवाजाची जादू आणि संगीत क्षेत्रातील योगदानामुळे त्या भारतीय संगीतविश्वातील एक अजरामर व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जात.
आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले यांनी माध्यमांसमोर येत आईच्या निधनाची बातमी दिली. ते म्हणाले की, माझी आई आशा भोसले यांचे निधन झाले आहे. सोमवारी दुपारी चारला शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांचे पार्थिव राहत्या घरी ठेवण्यात येणार आहे. आवाजाने कोट्यवधी हृदयांना
स्पर्श : केंद्रीय मंत्री अमित शहा
आशाताईंनी केवळ आपल्या मधुर आवाजाने आणि अद्वितीय प्रतिभेने वेगळी ओळख निर्माण केली नाही, तर आपल्या सुरांनी भारतीय संगीत अधिक समृद्ध केले। कोणत्याही प्रकारच्या संगीताशी जुळवून घेण्याची त्यांची विलक्षण क्षमता प्रत्येकाच्या मनाला भुरळ घालत असे. आपल्या आवाजाने कोट्यवधी हृदयांना स्पर्श करणार्‍या आशाजींनी हिंदी, मराठी, बांग्ला, तमिळ, गुजराती अशा अनेक भाषांमध्ये तसेच लोकगीतांमध्येही आपली अमिट छाप सोडली.
सचिनची भावनिक पोस्ट
आशा भोसलेंच्या निधनानंतर सचिननं लिहिलं, भारतासाठी आणि जगभरातील संगीतप्रेमींसाठी आजचा दिवस अत्यंत दुःखद आहे. आमच्यासाठी आशाताई म्हणजे कुटुंबाचाच एक भाग होत्या. आज आपण अनुभवत असलेल्या या दुःखासाठी शब्दही अपुरे वाटत आहेत. एका क्षणी मन अगदी शांत होतं आणि दुसर्‍याच क्षणी त्यांनी आपल्याला दिलेल्या असंख्य सुरेल गाण्यांच्या आठवणींत ते हरवून जातं. जणू काळही काही क्षणांसाठी थांबून गेला आहे, असं वाटतं. पण त्यांच्या अमर गीतांमधून त्या कायम आपल्या सोबत राहतील. सचिन अखेरीस आशाताईंचे आभार मानत म्हणाला, धन्यवाद ताई, आमचं आयुष्य तुमच्या प्रेमळपणाने, आणि अविस्मरणीय संगीतानं भरून टाकल्याबद्दल. आशाताई, तुमची खूप आठवण येईल.
त्यांच्या स्वरांनी अनेक पिढ्यांना
आनंद दिला : उद्धव ठाकरे
आशा भोसले यांच्या निधनाची बातमी ऐकून अत्यंत दु:ख झालं. भारतीय संगीत विश्वातील एक अमर आवाज आज शांत झाला. त्यांच्या स्वरांनी अनेक पिढ्यांना आनंद दिला, भावनांना स्पर्श केला. त्या एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व होत्या. लता दीदी यांच्यानंतर त्या संगीत क्षेत्रातील एका महान पर्वाच्या स्तंभाप्रमाणं उभ्या होत्या. भारतीय संगीत क्षेत्रातील हा स्तंभ कोसळला. त्यांचं गाणं हेच त्यांचं अमरत्व राहील. त्यांच्या स्मृतीला विनम्र श्रद्धांजली.

मंगेशकर घराण्यातील तारा निखळला : मुख्यमंत्री
तीन वर्षांपूर्वी धडाक्यात नव्वदी साजरी करणार्‍या
ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने मंगेशकर घराण्यातील
लतादीदींनंतर आणखी एक तारा निखळला आहे. सुरांची सुंदर बाग आज उजाड झाली, अशी शोकभावनादेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्यावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत आज (सोमवारी) दुपारी 4 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सध्या त्यांचे पार्थिव ब्रीच कँडी रुग्णालयात आहे. या रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

 

The ‘hope’ of the songs has faded.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

बोल्डनेस आणि ’ती’

इतकेच नव्हे, तर मद्याच्या धुंदीत पोलिसांच्याच अंगचटीला जाणार्‍या या तरुणींनी नंतर त्यांच्यावरच अतिप्रसंगाचा गुन्हा दाखल…

13 hours ago

एकच धर्म-निसर्ग धर्म

सुख, शांतता, समाधान जिथे मिळते त्याला धर्म म्हणतात. धारण केला जातो तो म्हणजे धर्म. भारतीय…

13 hours ago

स्वतःसाठी थोडं जगा..!

स्त्रीने तिचा स्वाभिमान जपायला हवा...आणि तुम्हाला स्वतःचा अभिमानही वाटला पाहिजे...स्त्री ही अशी शक्ती आहे.संपूर्ण जगाला…

13 hours ago

गुन्हेगारीकडे नेणारे यशाचे शॉर्टकट्स

यशाची नशा आणि दिखावा मनुष्याला न्यायालयाची पायरी चढायला भाग पाडतात. हे लोभाचे चक्र आहे, ज्यामुळे…

13 hours ago

परिवर्तनाकडे नेणारी कलाकृती- निळी सावळी नव्हाळी

आयुष्यातील उलाघाली, स्थित्यंतरे, जगण्याची विविध व्यवधाने अनुभवत असताना कवी नेहमी त्याच्या कवितेमधून डोकावत असतो. किंबहुना…

13 hours ago

मनाचा निचरा आणि विचारांची शुद्धता

या जगात आपण अनेक गोष्टी शिकतो अनुभवतो कमावतो, पण तरीही मनात एक पोकळी राहते. मनुष्य…

13 hours ago