नाशिक

लाखो भाविकांच्या साक्षीने कीर्तिध्वज फडकला

सप्तशृंगगडावर 36 तास सलग दर्शनरांगा

सप्तशृंगगड : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर चैत्र यात्रेनिमित्त भाविकांची अभूतपूर्व गर्दी उसळली आहे. गेल्या तब्बल 36 ते 48 तासांपासून दर्शनासाठी सलग रांगा लागल्या आहेत. लाखो भाविकांनी आई सप्तशृंगीचे दर्शन घेतले असून, बुधवारी मध्यरात्री देवीच्या शिखरावर पारंपरिक पद्धतीने भगव्या रंगाचा कीर्तिध्वज डौलात फडकविण्यात आला. या भव्य सोहळ्याने संपूर्ण गड भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला. शेकडो मैलांचा प्रवास, तळपते ऊन आणि शारीरिक कष्टांची पर्वा न करता भाविक भगवतीच्या दर्शनासाठी मोठ्या श्रद्धेने गडावर दाखल झाले. मंदिर परिसर, चढण पायर्‍या तसेच संपूर्ण गावातील विविध भागात दर्शनासाठी लांबच लांब बार्‍या लागल्या होत्या. उत्तर महाराष्ट्र तसेच खान्देश भागातून भाविक अनवाणी गडावर पोहोचल्याचे दिसले.

अलंकारांची मिरवणूक
बुधवारी सकाळी 7.30 वाजता देवीचे अलंकार विश्वस्त संस्थेच्या कार्यालयातून ढोल-ताशांच्या गजरात मंदिराकडे मिरवणुकीद्वारे नेण्यात आले. यावेळी वातावरण भक्तिमय झाले होते. श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त अ‍ॅड. ललित निकम यांनी सपत्नीक श्री भगवतीची पंचामृत महापूजा केली. चैत्र यात्रेच्या कालावधीत काकड आरती, महानैवेद्य आरती, पंचामृत महापूजा आणि सांजआरती असे विविध धार्मिक विधी नियमितपणे सुरू असून, दररोज हजारो ते लाखो भाविकांची उपस्थिती नोंदवली जात आहे.
गर्दीचा वाढता ताण लक्षात घेता पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. गर्दी नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना राबविण्यात येत आहेत. नाशिक ग्रामीण पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक, स्वयंसेवक तसेच विविध संस्थांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सेवेत कार्यरत आहेत. आपत्कालीन परिस्थितीसाठी धर्मार्थ रुग्णालय, मराठा विद्या प्रसारक समाज, गुरुकृपा हॉस्पिटल (दिंडोरी), तसेच आरोग्य पथके व अ‍ॅम्ब्युलन्स सेवा 24 तास सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. विश्व मानव रोहानी केंद्राच्या वतीने मोफत महाप्रसाद व भोजन व्यवस्था सुरू आहे. चैत्रोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण सप्तशृंगगड भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला असून, लाखो भाविकांच्या उपस्थितीत सर्व धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडत आहेत. यंदाही विक्रमी गर्दीमुळे सप्तशृंगगडावरील चैत्र यात्रा ऐतिहासिक ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, नानाजी भामरे, प्रशांत निकम, मंदिर सहविभागप्रमुख विश्वनाथ बर्डे, सुनील कासार, सुरक्षा अधिकारी यशवंत देशमुख यांच्यासह नारद आहिरे, मुरलीधर गायकवाड, मुरलीधर गावित, श्याम पवार, विजय भवरे, डॉ. नीलेश साठे, अरुण गांगुर्डे, उपसरपंच संदीप बेनके, ग्रामसेवक संजय देवरे, गिरधर गवळी, गणेश बर्डे, शांताराम सदगीर, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष प्रसाद दळवी उपस्थित होते.

अवघड शिखरावर धाडसी चढाई; मध्यरात्री ध्वजारोहण

सायंकाळी श्री भगवती मंदिरात दर्शन घेऊन गवळी पाटील मध्यरात्री शिखरावर चढाई करतात. समुद्रसपाटीपासून सुमारे 4659 फूट उंचीवर असलेल्या या शिखरावर जाण्यासाठी कोणताही निश्चित मार्ग नसतानाही ही परंपरा वर्षानुवर्षे अखंड सुरू आहे. सुमारे 13 मीटर लांबीचा भगवा ध्वज, त्याच मापाची काठी तसेच 30 ते 35 किलो वजनाचे पूजा साहित्य घेऊन गवळी शिखर गाठतात. शिखरावर जुना ध्वज उतरवून नव्या ध्वजाचे विधिवत पूजन करून ध्वजारोहण करण्यात करतात. हा अद्भुत आणि धाडसी सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक गडावर उपस्थित होते.

जयघोषाने गड दुमदुमला
दुपारी 3.30 वाजता श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या मुख्य कार्यालयातून कीर्तिध्वजाची विधिवत पूजा करून पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली. ट्रस्टच्या अध्यक्षा तथा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती कल्पना के. पाटील, तहसीलदार रोहिदास वारुळे,विश्वस्त मंडळातील प्रतिनिधी अ‍ॅड. ललित निकम, मनज्योत पाटील, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, पोलिस उपअधीक्षक वासुदेव देसले, पोलिस निरीक्षक खगेन्द्र टेंभेकर, पोलिस पाटील शशिकांत बेनके, ध्वजाचे मानकरी सोमनाथ गवळी, कृष्ण गवळी, प्रकाश गवळी, रमेश गवळी, विष्णू गवळी, युवराज गवळी, वामन गवळी, एकनाथ गवळी, काशिनाथ गवळी, गवळी परिवार यांच्यासह पोलीस व प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि “सप्तशृंगी माता की जय”, “परशुराम बाला की जय”, “मार्कंडेय महाराज की जय” अशा जयघोषात ही मिरवणूक पहिल्या पायरीपर्यंत नेण्यात आली. लाखो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.

The Kirti flag was hoisted in the presence of lakhs of devotees.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

खिशात नाही आणा…

खिशात नसताना पैशांचा गजर कशाला, दिखाव्याच्या दुनियेत खोटा हा साज कशाला आई-वडिलांच्या कष्टांवर उभारलेला हा…

3 hours ago

गुन्हेगारीच्या छायेत हरवणारा समाज…

खरंतर समाजात वावरताना वारंवार जाणवणार्‍या या वास्तवामुळेच हा विषय मांडावासा वाटला. कारण तो मांडणं ही…

3 hours ago

स्वमग्नता

अगं आई तो बघ! मावशींचा मुलगा कसे करतो आहे. तो जरा वेडा आहे का? हात…

3 hours ago

शेतीमातीची माणसं…

शेतीची माणसं म्हणजे काळ्या आईची लेकरं.. या काळ्या मातीशी त्यांची नाळ घट्ट जुळलेली असते. या…

3 hours ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात ऑनलाइन रोलेटचा सुळसुळाट

सिडको : दिलीपराज सोनार नाशिक शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या…

3 hours ago

वावी परिसराचा दुष्काळ हटणार

कोकाटेंच्या पुढाकाराने 1500 हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली सिन्नर : प्रतिनिधी भौगोलिक विषमतेमुळे कायम अवर्षणप्रवण म्हणून…

3 hours ago