संपादकीय

वकिली पेशा आणि नैतिक जबाबदारी

– अ‍ॅड. सुयोग शहा

न्यायव्यवस्थेचा पाया हा विश्वासावर आधारलेला असतो. पक्षकार जेव्हा एखाद्या वकिलाकडे आपली केस घेऊन येतो, तेव्हा तो केवळ कागदपत्रे सोपवत नाही, तर आपला संपूर्ण विश्वास आणि अपेक्षा त्या वकिलाच्या स्वाधीन करतो. वकील हा न्यायालयाचा एक महत्त्वाचा घटक आणि समाजाचा एक जबाबदार नागरिक असतो. परंतु, जेव्हा याच वकिली पेशाला व्यावसायिक गैरवर्तनाची आणि फसवणुकीची कीड लागते, तेव्हा संपूर्ण न्यायव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास डळमळीत होतो.
नुकतीच बारामती येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी टी. डी. इंगवले यांच्या न्यायालयाने दिलेली एक शिक्षा या विषयावर गंभीरपणे विचार करण्यास भाग पाडणारी आहे. सन 2015 मधील एका रस्ते अपघातात बाळासाहेब दत्तात्रय रणसिंग यांच्या पत्नीचे निधन झाले होते. मोटार अपघात दावा प्राधिकरणाकडे या प्रकरणी भरपाईचा दावा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात वकील बापू बाबूराव दिवेकर यांनी पक्षकाराच्या अपघाताच्या भरपाईच्या रकमेतील तब्बल 10 लाख रुपये परस्पर स्वतःच्या वैयक्तिक खात्यात वळवून पक्षकाराची फसवणूक केली. न्यायालयाने या प्रकरणात तीव्र नाराजी व्यक्त करत नमूद केले की, पक्षकाराच्या विश्वासाला दिलेला तडा हा न्यायव्यवस्थेच्या पायावरच आघात करतो. या गुन्ह्यासाठी संबंधित वकिलाला एक वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा आणि 25,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
वकिली हा केवळ उदरनिर्वाहाचा व्यवसाय नसून, ती एक सामाजिक आणि कायदेशीर सेवा आहे. वकील हे न्यायालयाचे अधिकारी असतात, त्यामुळे न्यायालयाप्रति, पक्षकाराप्रति, सहकार्‍यांप्रति आणि समाजाप्रति त्यांची विशिष्ट कर्तव्ये असतात.
पक्षकाराचा विश्वास जपणे
पक्षकाराच्या पैशांचा किंवा मालमत्तेचा कोणताही अपहार न करणे हे वकिलाचे प्राथमिक कर्तव्य आहे. पारदर्शकता ठेवणे : केसच्या सर्व टप्प्यांवर आणि आर्थिक व्यवहारांवर पूर्ण पारदर्शकता असणे आवश्यक आहे. न्यायालयाशी प्रामाणिक राहणे : न्यायालयासमोर सत्य आणि योग्य तथ्ये मांडणे ही वकिलाची नैतिक जबाबदारी आहे. गैरवर्तनाचे समाजावर आणि विधी क्षेत्रावर होणारे परिणाम एका वकिलाने केलेले गैरकृत्य संपूर्ण विधी क्षेत्रावर शिंतोडे उडवते.
समाजाचा दृष्टिकोन बदलतो : एका व्यक्तीच्या चुकीमुळे समाज संपूर्ण वकील वर्गाकडे संशयाने आणि अविश्वासाने पाहू लागतो, न्यायव्यवस्थेची प्रतिमा मलिन होते : पीडित व्यक्ती जेव्हा वकिलांकडूनच फसवली जाते, तेव्हा तिचा न्यायावरील विश्वास उडतो. प्रामाणिक वकिलांचे नुकसान होते. अहोरात्र प्रामाणिकपणे काम करणार्‍या हजारो वकिलांच्या प्रतिष्ठेला अशा घटनांमुळे धक्का पोहोचतो. बारामती न्यायालयाचा हा निर्णय अशा प्रकारे गैरवर्तन करणार्‍या आणि पक्षकारांची फसवणूक करणार्‍या प्रवृत्तींना योग्य तो धडा शिकवणारा आहे. वकिली पेशाची प्रतिष्ठा जपणे आणि समाजाचा या क्षेत्रावरील विश्वास कायम ठेवणे ही प्रत्येक वकिलाची नैतिक आणि सामाजिक जबाबदारी आहे.

नैतिक सरावाची गरज

आपण समाजाचा एक अविभाज्य भाग आहोत. जेव्हा एखादा नागरिक संकटात असतो, तेव्हा तो न्यायाच्या आशेने वकिलाकडे धाव घेतो. त्यामुळे वकिली व्यवसायात नैतिक मूल्यांचे पालन करणे अनिवार्य आहे. केवळ कायद्याचे ज्ञान असणे पुरेसे नाही, तर त्या ज्ञानाचा वापर सत्य आणि न्यायाच्या रक्षणासाठी करणे हीच खरी वकिली आहे.

 

The Legal Profession and Ethical Responsibility

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मातीशी नातं आणि शिक्षणाची वाट

Relationship with the soil and the path to education

17 hours ago

जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…

17 hours ago