अग्रलेख

क्या बोलती पब्लिक?

निवडणुका लढविण्याचा आमचा विचार नाही, तर एक दबाव गट म्हणून आम्ही काम करणार आहोत, असे स्पष्टीकरण कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी दिले. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीने राष्ट्रव्यापी आंदोलन केले. शेवटी प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्वत्र शांतता निर्माण झाली. जंतर-मंतर व इतरत्र ठिकाणी झालेल्या निषेध आंदोलनातील आंदोलकांना हुडकून त्यांची धरपकड करण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली. इतकेच नव्हे, तर पंतप्रधानांविषयी सोशल मीडियावर अपशब्द वापरणार्‍या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन कारवाई सुरू करण्यात आली. एकीकडे पोलिसांची कारवाई सुरू असताना पंतप्रधान सोशल मीडियावर व्हिडिओज् अपलोड करून जेन-झेडवर, म्हणजे युवा पिढीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत होते. दुसरीकडे, कॉक्रोच जनता पार्टीची पुढची भूमिका काय, याकडे लक्ष वेधले गेले होते. विद्यार्थ्यांची धरपकड थांबवली नाही, तर पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा कॉक्रोच जनता पार्टीने दिला होता. दरम्यान, वातावरण शांत होत असताना अभिजित दीपके आणि त्यांचे सहकारी पुढील रणनीतीची आखणी करत होते. त्याचदरम्यान, अभिजित दीपके आणि त्यांचा पक्ष निवडणुका लढवणार का, यावर चर्चा होत होती. पत्रकारांनी थेट प्रश्न विचारल्यावर त्यांनी नाही, असे थेट उत्तर दिले, तर दबाव गट म्हणून काम करणार असल्याचा खुलासा केला, तेव्हा त्यांची पुढची रणनीती स्पष्ट झाली. छत्रपती संभाजीनगर येथे दीपके यांच्या निवासस्थानी कॉक्रोच जनता पार्टीच्या कोअर कमिटीची बैठक बुधवारी (4 ऑगस्ट) व गुरुवारी (5 ऑगस्ट) झाली. देशभरातील जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) पुढील महिन्यात ‘क्या बोलती पब्लिक’ हे राष्ट्रव्यापी अभियान सुरू करणार आहे, अशी माहिती अभिजित दीपके यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली. देशामध्ये शिक्षण आणि बेरोजगारी हे महत्त्वाचे मुद्दे पुढे आणून राजकीय चर्चेची दिशा बदलणे आणि एक प्रभावी दबाव गट म्हणून काम करणे, हा पक्षाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीत अभिजित दीपके यांची पक्षाचे संयोजक म्हणून, तर मुख्य प्रवक्ते सौरव दास आणि प्रवक्ते आशुतोष रंका यांची सहसंयोजक म्हणून निवड करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी एका याचिकेवरील सुनावणीत बेरोजगार तरुणांचा उल्लेख झुरळ (कॉक्रोच) असा केला, त्यावेळी नीट पेपरफुटी प्रकरण चर्चेत असताना दीपके यांनी सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टी स्थापन केली, तेव्हा त्यांना लाखो तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याच बळावर त्यांनी जमिनीवर येऊन आंदोलन करून केंद्र सरकारची कोंडी करून धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. कॉक्रोच जनता पार्टीने अल्पावधीत सरकारला झुकवले. मोठे यश मिळवल्यानंतर दीपके आणि त्यांच्या सहकार्‍यांमध्ये आत्मविश्वास दुणावला आहे. आपण एका मंत्र्याला राजीनामा द्यायला भाग पाडले तर आणखी काही बदल घडवू शकतो, हाच त्यांचा आत्मविश्वास आहे. गेल्या 10-12 वर्षांत सरकारने लोकांच्या मनात निर्माण केलेली भीती आता संपली आहे. देशातील तरुणांना त्यांचा आवाज परत मिळाला आहे. आज लोकांनी एका मंत्र्याचा राजीनामा मागितला आहे, उद्या ते इतरांच्याही राजीनाम्याची मागणी करतील, असेही दीपके यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले. त्यांनी ‘क्या बोलती पब्लिक’ या नावाने देशव्यापी अभियान सुरू करण्याची घोषणा केली. ‘क्या बोलती पब्लिक’ या अभियानादरम्यान आम्ही देशातील सध्याच्या परिस्थितीबद्दल आणि लोकांना भेडसावणार्‍या समस्यांबद्दल थेट जनतेशी संवाद साधू. आता जनतेचे म्हणणे ऐकून घेण्याची वेळ आली आहे. पूर्वी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती न करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. जेन-झेड भविष्यात देश चालवणार आहे, त्यामुळे त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय कोणताही धोरणात्मक निर्णय घेतला जाऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. देशभर हे अभियान सप्टेंबर महिन्यातच सुरू करण्यात येणार आहे. या अभियानात देशातील शिक्षणपद्धती, विद्यार्थ्यांच्या समस्या, वाढते शुल्क, खासगी कोचिंग क्लासेसचे शुल्क यावर भर दिला जाणार आहे. हे अभियान लोकांशी संपर्क साधण्यासाठी असले, तरी त्यात काही मूलभूत प्रश्न विचारले जाणार असल्याने ते केंद्र सरकारची डोकेदुखी वाढवणारे ठरणार आहे. खासगी शाळा आणि महाविद्यालयांनी वाढवलेले आवाक्याबाहेरचे शिक्षण शुल्क कमी करणे, स्पर्धा परीक्षा आणि ट्युशन्सच्या नावाखाली कोचिंग संस्थांकडून पालकांची आणि विद्यार्थ्यांची होणारी आर्थिक लूट थांबवणे, देशातील बिघडलेली शिक्षणपद्धती व परीक्षांमधील गोंधळ सुधारणे आणि तरुण, विद्यार्थी व सामान्य नागरिकांचे प्रश्न थेट प्रशासनापर्यंत पोहोचवणे, हे या मोहिमेचे उद्देश आहेत. हे अभियान शांततेच्या मार्गाने राबवले जाणार आहे. कार्यकर्ते प्रत्येक शहरात, महाविद्यालयांबाहेर आणि गावांमध्ये जाऊन विद्यार्थी व पालकांच्या तक्रारी लेखी स्वरूपात गोळा करणार आहेत. स्वातंत्र्यानंतर देशात विद्यार्थ्यांचे पहिले आंदोलन केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी झाले आणि ते यशस्वी झाले. स्वातंत्र्यानंतरचे विद्यार्थ्यांचे असे हे पहिलेच अभियान आहे. यामध्ये बेरोजगारीचाही प्रश्न उपस्थित करण्यात येणार आहे. बेरोजगारी ही एक मोठी समस्या आहे. आम्ही ती संपूर्ण देशभर एक मुद्दा बनवू, असे दीपके यांनी म्हटले आहे. आम्ही शिक्षण क्षेत्रात सुधारणा करणार आहोत. शालेय शिक्षणापासूनच शिक्षण परवडणारे राहिलेले नाही. शिक्षणाचा वापर नफा कमावण्यासाठी केला जात आहे, पण आम्हाला हे चित्र बदलायचे आहे, असेही त्यांनी नमूद केले. ‘सीजेपी’ची विचारसरणी भारतीय राज्यघटनेशी सुसंगत आहे, असे ‘सीजेपी’च्या नेत्यांनी स्पष्ट केले. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांच्या विकसित भारताच्या दृष्टिकोनानुसार सीजेपी कार्य करेल, असे दीपके म्हणाले. त्यांच्या या म्हणण्याचा अर्थ पंतप्रधानांना आव्हान देणारा आहे. सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यघटना बदलाचा मुद्दा बराच गाजला. त्यानंतर पंतप्रधान सतत राज्यघटनेचा पुरस्कार करत आले आहेत. विशेष म्हणजे, मोदी सतत नेहरूंवर टीका करत आले आहेत, मात्र नेहरूंच्या योगदानाचा उल्लेख करण्याचे त्यांनी टाळले आहे. दीपके यांनी आंबेडकर, गांधी, नेहरू यांचा विकसित भारताचा दृष्टिकोन मांडला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापासून पंतप्रधान सातत्याने विकसित भारत हा मंत्र सांगत आहेत. तोच धागा पकडून दीपके यांनी सरकारला शह देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘क्या बोलती पब्लिक’ या अभियानाकडे सरकारला बारकाईने पाहावे लागेल. जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर प्रधान यांनी राजीनामा दिला. पंतप्रधानांनी जेन-झेडशी संवाद साधून सरकारने केलेल्या उपाययोजनांची आणि कारवाईची माहिती दिली. सीजेपीच्या अभियानात जे मुद्दे उपस्थित केले जाणार आहेत, त्याकडे सरकार कोणत्या पद्धतीने पाहणार, हा प्रश्न आहे. ‘क्या बोलती पब्लिक’ या अभियानाला विरोधी पक्ष पाठिंबा देतील, याबाबत शंका नाही, मात्र जंतर-मंतरवरील आंदोलनाच्या वेळी जे घडले, ते पुन्हा घडणार नाही, याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. अभियान शांततेत होणार असले, तरी त्यात समाजकंटक घुसणार नाहीत, यासाठी पोलिसांनी समाजविरोधी घटकांवर नजर ठेवली पाहिजे. अभियान असो की आंदोलन, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याकडे लक्ष दिले गेले पाहिजे.

What is the public talking about?

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मातीशी नातं आणि शिक्षणाची वाट

Relationship with the soil and the path to education

16 hours ago

जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…

16 hours ago