एका साडीची जीवनदायिनी कहाणी

साडी…भारतीय स्त्रीच्या जीवनाशी आणि संस्कृतीशी अतूट नाते सांगणारे वस्त्र. कधी ती सौंदर्याचे प्रतीक असते, कधी संस्कृतीचे, तर कधी स्त्रीच्या सन्मानाचे. मात्र, एखाद्या साडीने संकटात सापडलेल्या माणसांचे प्राण वाचविण्यासाठी आधार बनावे, ही घटना निश्चितच विलक्षण आहे.
महाभारतातील द्रौपदीचा प्रसंग भारतीयांच्या स्मरणात आजही आहे. भरसभेत द्रौपदीच्या सन्मानावर संकट आले असताना तिने श्रीकृष्णाचा धावा केला आणि तिच्या लज्जेचे रक्षण झाले, अशी प्रसिद्ध कथा आहे. त्यावेळी साडी ही स्त्रीच्या सन्मानाची ढाल ठरली.
हजारो वर्षांनंतर काळ बदलला, परिस्थिती बदलली, पण स्त्रीच्या धैर्याची ताकद मात्र कायम राहिली.
ऑगस्ट 2026 मध्ये नेपाळ-तिबेट सीमेजवळील रसुवा आणि तिमुरे परिसरात मुसळधार पाऊस, पूर आणि दरडी कोसळल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली. कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेले तामिळनाडूतील भाविक या संकटात अडकले. चिखल आणि पाण्याच्या प्रचंड लोंढ्यामुळे त्यांच्यासमोर जीवघेणी परिस्थिती निर्माण झाली.
अशा वेळी मायावरम येथील रत्नाकुमार आणि त्यांच्या पत्नी पुंगुंझली यांनी प्रसंगावधान राखले. उंच आणि निसरड्या कड्यावर अडकलेल्या भाविकांना वर चढणे अत्यंत कठीण झाले होते. तेव्हा पुंगुंझली यांनी आपली साडी सोडून तिचा पदर खाली टाकला. उपलब्ध केबल वायर आणि साडीच्या साहाय्याने एकेक भाविकाला सुरक्षितपणे वर ओढण्यात आले. एका वृद्ध महिलेलाही साडीच्या साहाय्याने वर आणण्यात आले. अशा प्रकारे 21 भाविकांच्या बचावकार्यात त्या साडीने महत्त्वाची भूमिका बजावली.
या घटनेकडे केवळ एक बचावकार्य म्हणून पाहणे पुरेसे नाही. संकटाच्या क्षणी एका स्त्रीने दाखवलेले धैर्य, प्रसंगावधान, त्याग आणि माणुसकी यामागील खरी प्रेरणा समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे.
दोन युगांतील या दोन प्रसंगांमध्ये एक विलक्षण साम्य आहे. एका प्रसंगात साडीने स्त्रीची लज्जा जपली, तर दुसर्‍या प्रसंगात त्याच साडीने संकटात सापडलेल्या जीवांना आधार दिला. काळ बदलला, साधने बदलली; परंतु स्त्रीच्या धैर्याचे सामर्थ्य आजही तितकेच प्रभावी आहे.
स्त्रीची खरी ताकद केवळ तिच्या रूपात नसते. तिची खरी शक्ती तिच्या निर्णयक्षमतेत, धैर्यात, त्यागात आणि संकटसमयी इतरांसाठी उभे राहण्याच्या वृत्तीत असते. पुंगुंझली यांनी त्या क्षणी केलेले कार्य याचेच जिवंत उदाहरण आहे.
आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाने जग कितीही पुढे गेले असले, तरी संकटाच्या क्षणी माणुसकी, प्रसंगावधान आणि दुसर्‍याला मदत करण्याची भावना यांची किंमत सर्वाधिक असते.
साडी ही भारतीय स्त्रीच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. द्रौपदीच्या कथेत ती सन्मानाचे प्रतीक ठरते, तर नेपाळच्या या घटनेत ती जीवनाचा आधार बनते.
म्हणूनच या घटनेतून एक सुंदर संदेश मिळतो-
वस्त्र तेच… काळ वेगळा… प्रसंग वेगळे… पण स्त्रीशक्ती मात्र अजरामर!
अशा नारीला मनापासून नमन-जिच्या पदराने केवळ सन्मान नाही, तर माणसांचे प्राणही जपले!

The life-sustaining story of a saree

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *