तडजोड म्हणजे स्वतःला मिटवून टाकणे नव्हे. तडजोड म्हणजे दोन व्यक्तींनी एकमेकांचा सन्मान राखत मधला मार्ग शोधणे. त्यात दोघांचाही सहभाग असतो, दोघांच्या भावनांना किंमत असते. पण जेव्हा प्रत्येक वेळी एकाच व्यक्तीने माघार घ्यायची, एकाच व्यक्तीने चूक नसतानाही माफी मागायची, स्वतःच्या इच्छा, स्वप्ने आणि आनंद बाजूला ठेवायचा आणि तरीही समोरच्याच्या अपेक्षा संपायच्या नाहीत, तेव्हा ती तडजोड राहत नाही; तो स्वतःच्या अस्तित्वाचा त्याग बनतो.
आपल्या समाजात विशेषतः नाती टिकवण्याच्या नावाखाली सहन करण्याला मोठेपण मानले जाते. थोडं सहन कर…नातं आहे, एवढं तर चालतंच, लोक काय म्हणतील? अशा वाक्यांनी अनेक माणसे आपल्या मनात दडलेल्या वेदनांना गप्प बसवतात. नाते तुटू नये म्हणून वर्षानुवर्षे अपमान सहन केला जातो, मन मारले जाते आणि स्वतःच्या भावना दाबल्या जातात. बाहेरून सगळं सुरळीत दिसत असतं, पण आतून एखादी व्यक्ती रोज थोडी थोडी तुटत असते.
प्रेमाच्या नात्यात मतभेद असणे स्वाभाविक आहे, पण सतत अपमान होणे स्वाभाविक नाही. राग येणे मानवी आहे, पण भीती निर्माण करणे प्रेम नाही. काळजी घेणे सुंदर आहे, पण समोरच्या व्यक्तीने काय घालावे, कोणाशी बोलावे, कुठे जावे, कोणाला भेटावे यावर सतत नियंत्रण ठेवणे ही काळजी नसून व्यक्तिस्वातंत्र्यावर घातलेली मर्यादा आहे. एखाद्या व्यक्तीला सतत कमी लेखणे, टोमणे मारणे, सार्वजनिक ठिकाणी अपमानित करणे, तिच्या निर्णयांची किंमत न ठेवणे किंवा प्रत्येक चुकीसाठी तिलाच दोषी ठरवणे, या गोष्टी हळूहळू नात्यातील प्रेम संपवून मनात भीती निर्माण करतात. सगळ्यात वेदनादायक गोष्ट म्हणजे अनेकदा त्रास सहन करणारी व्यक्ती स्वतःलाच दोष देऊ लागते. कदाचित माझीच चूक असेल, मीच थोडं जास्त सहन करायला हवं..माझ्यामुळे नातं तुटू नये..असा विचार करत ती स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करत राहते. पण कोणतेही नाते एका व्यक्तीच्या सततच्या सहनशीलतेवर टिकत असेल, तर ते नाते मजबूत नसतेते एका व्यक्तीच्या त्यागावर उभे असते. आपण अनेकदा ’लोक काय म्हणतील?’ या प्रश्नाला ’मी काय सहन करते आहे?’ या प्रश्नापेक्षा अधिक महत्त्व देतो. नातं तुटल्यावर समाज काही दिवस बोलतो आणि नंतर आपापल्या आयुष्यात व्यस्त होतो, पण त्या नात्यात राहणार्या व्यक्तीला मात्र त्या वेदना रोज जगाव्या लागतात. त्यामुळे समाजाच्या भीतीने स्वतःच्या आयुष्याशी अन्याय करणे कितपत योग्य आहे, याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. स्वतःचा आत्मसन्मान जपणे म्हणजे स्वार्थी होणे नव्हे. स्वतःवर प्रेम करणे म्हणजे दुसर्याचा अनादर करणेही नव्हे. उलट ज्याला स्वतःच्या सन्मानाची जाणीव असते, तोच दुसर्याच्या सन्मानाची किंमत समजू शकतो. नात्यात आपली सीमा स्पष्टपणे सांगणे, चुकीच्या वागणुकीला विरोध करणे, आपल्या भावनांना महत्त्व देणे आणि आवश्यक असेल तर मदत घेणे हा स्वार्थ नसून स्वतःच्या अस्तित्वाची जपणूक आहे. नातं टिकवण्यासाठी कधी झुकावं, कधी शांत राहावं, कधी माफ करावं आणि कधी स्वतःच्या अहंकाराला बाजूला ठेवावं हे नक्कीच शिकायला हवं. पण त्याचबरोबर कुठे थांबायचं हेही कळायला हवं. कारण प्रत्येक वेळी आपणच झुकत राहिलो तर समोरच्याला आपली किंमत कधी कळणार? प्रत्येक वेळी आपणच माफी मागत राहिलो तर समोरचा स्वतःची चूक कधी स्वीकारणार? आणि प्रत्येक वेळी आपणच स्वतःला बदलत राहिलो तर एक दिवस आरशात दिसणारी व्यक्तीही आपल्याला ओळखीची वाटणार नाही. खरंतर सुंदर नातं ते नसतं ज्यात कधीच मतभेद होत नाहीत…सुंदर नातं ते असतं ज्यात मतभेद असतानाही एकमेकांचा सन्मान कायम राहतो. जिथे मन मोकळं करून बोलता येतं, चूक मान्य करता येते, माफी मागता येते, समोरच्याला त्याच्या इच्छेप्रमाणे जगण्याचा अधिकार दिला जातो आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे जिथे प्रेमासोबत सुरक्षिततेची भावनाही असते, तेच नातं खर्या अर्थाने जपण्यासारखं असतं.
शेवटी प्रश्न नातं टिकवण्याचा नाही, तर नातं टिकवताना आपण स्वतःला किती जपतोय, याचा आहे. कारण नातं तुटलं तर कदाचित पुन्हा एखादं नातं जोडता येईल, पण स्वतःवरचा विश्वास तुटला, आत्मसन्मान हरवला आणि स्वतःची ओळखच हरवली, तर स्वतःला पुन्हा शोधण्याचा प्रवास खूप कठीण असतो.
म्हणून नात्यांसाठी तडजोड करा, समजून घ्या, माफ करा, कधीकधी
स्वतःपेक्षा समोरच्याला प्राधान्यही द्या… पण स्वतःच्या आत्मसन्मानाची किंमत देऊन कोणतेही नाते जपू नका. कारण आयुष्यातील प्रत्येक नाते महत्त्वाचे आहे, पण त्या सगळ्या नात्यांमध्ये स्वतःशी असलेले नाते सर्वांत महत्त्वाचे आहे.
नातं जपताना स्वतःला हरवू नका. कारण स्वतःला जपणं हीच कोणत्याही निरोगी नात्याची पहिली अट आहे.
Don’t lose yourself while nurturing a relationship!