बाबा म्हणण्याआधीच पोरकी झाली चिमुकली

तेरा दिवसांच्या लेकीला पाहण्यासाठी रजेवर आलेल्या जवानाचा अपघातात मृत्यू

सिन्नर : प्रतिनिधी
अवघ्या 13 दिवसांपूर्वी घरात चिमुकल्या लेकीचे आगमन झाले आणि आव्हाड कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला. जम्मू-काश्मीरमध्ये देशसेवा बजावणारा मुलगा आपल्या नवजात कन्येला पाहण्यासाठी 75 दिवसांच्या रजेवर गावी आला होता. मात्र, नियतीने वेगळाच डाव मांडला.
लेकीला कुशीत घेऊन तिचे बालपण पाहण्याची स्वप्ने उराशी बाळगणार्‍या जवानाचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला आणि आनंदाचे घर क्षणार्धात शोकसागरात बुडाले.
खंबाळे (ता. सिन्नर) येथील प्रविण भाऊसाहेब आव्हाड (वय 27) हे भारतीय लष्करात गेल्या आठ वर्षांपासून कार्यरत होते. जम्मू-काश्मीरमधील उधमपूर येथे ते देशसेवेचे कर्तव्य बजावत होते. कुटुंबातील एकुलते असलेल्या प्रवीण यांना 13 दिवसांपूर्वी कन्यारत्न प्राप्त झाले होते. नवजात मुलीला पाहण्यासाठी आणि कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवण्यासाठी ते रजेवर गावी आले होते.
रविवारी (दि. 14) रात्री नांदूरशिंगोटे येथून खंबाळेकडे परतत असताना नाशिक-पुणे महामार्गावरील दोडी पाटीजवळ त्यांच्या दुचाकीची दुभाजकाला जोरदार धडक बसली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सोमवारी खंबाळे येथे शासकीय इतमामात प्रवीण आव्हाड यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भारतीय लष्कराच्या जवानांनी मानवंदना दिली. यावेळी अधिकारी, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, दोडी पाटीजवळील दुभाजक हा अपघातप्रवण ठरत असून, याठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. आणखी किती जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार, असा सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केला.

The little girl was left fatherless before she could even say “Baba.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *