योजनेला निधीची टंचाई
मुंबई :
राज्यात लाडकी बहिण योजनेमुळे अनेक प्रकारच्या योजनांसाठी निधीच उरत नसल्याने एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळात सुरू केलेली ’आनंदाचा शिधा’ यंदा दिवाळीत नागरिकांना मिळणे अवघड दिसून येत आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आनंदाचा शिधा योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून सणाच्या दिवशी 1 कोटी 63 लाख लोकांना लाभ मिळत होता. या आनंदाच्या शिधाच्या माध्यमातून रेशन कार्ड धारकांना एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो चना डाळ आणि एक लिटर पामतेल मिळत होते. परंतु, राज्याच्या आर्थिक चणचणीमुळे या योजनेसाठी निधीच नसल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे अतिवृष्टी आणि पूरस्थितीने राज्यात प्रचंड मोठे नुकसान झाले असताना शेतकरी तसेच गरिबांची दिवाळी फराळाविनाच जाईल, असे चित्र असल्याचे म्हटले जात आहे.
योजना कायमची बंद होण्याची चिन्हे
राज्यातील गोरगरिबांना सणासुदीचे दिवस आनंदाने साजरे करता यावेत, यासाठी महायुती सरकारने तीन वर्षांपूर्वी ’आनंदाचा शिधा’ योजना सुरू केली होती. परंतु, राज्याच्या सध्याच्या आर्थिक चणचणीमुळे ही योजना आता कागदावरच राहिल्याचे पाहायला मिळत आहे. दिवाळीलाही नागरिकांना हा आनंदाचा शिधा मिळणार नसल्याचे म्हटले जात असून, ही योजना कायमचीच बंद केली जाण्याची चिन्हे असल्याचे सूत्रांकडून समजते.