– प्रणाली देशमुख
ए ऐक ना! बघ मी काय आणलंय, पळसाच्या पानाला बांधलेला धागा उकलत त्याने अलगद मोगर्याचा गजरा बाहेर काढला. तिच्या डोळ्यात लगेच चमक आली. हम्म आज इरादा काय आहे स्वारीचा. काही नाही गं ते देवळात गेलो तिथे फुलं घेतली देवासाठी, बाजूला एक मुलगी गजरे विकत होती. नाटकाला जायचं ठरलंय ना आपलं, चल वळ जरा, मी माळतो गजरा. खिडकीतून हवेची झुळूक येत होती आणि तिच्या पांढर्याशुभ्र चंदेरी बटा गालावर अवखळ मिरवत होत्या. खोली मोगर्याच्या सुगंधाने दरवळत होती.
आठवतंय तुला पहिल्या भेटीत मी ओंजळीत तुझ्यासाठी मोगर्याची फुलं आणली होती. मोगर्याच्या सुगंधाने तुही मोहरली होती. मी वेडा विचारात पडलो नक्की, निरागस, निष्पाप, निर्मळ कोण मोगरा की तू? मग मोगर्याच्या बहाण्याने मला संधी मिळायची तुझ्याशी बोलायची. तुला माझ्याशी काहीच देणंघेणं नव्हतं.
ओंजळीत फुलं दिसली की, फुललेल्या मोगर्याला बघून नकळत तुझ्या नाजूक ओठांची पाकळी खुलायची. तू माळलेल्या गजर्याच्या मदमस्त सुगंधाने तुझा केशसंभारही दरवळायचा. तुला दिल्यावर दोन फुलं मी माझ्यासाठी जपून ठेवायचो. खिडकीशेजारी टेबलावर ठेवलेल्या फुलांच्या सुगंधाने मला तू माझ्या आसपास जाणवायची. नाजूक शुभ्र पाकळ्या अन् इवलंसं हिरवट देठ असलेल्या मोगर्याला बघून माझी जळफळाट व्हायची.
ए मोगर्या ती माझी आहे बरं का! त्याला खडसावून सांगायचो. शेवटी चार वर्षे फुलं वाहिल्यावर तू प्रसन्न झालीस. माझा मोगर्याचा अभिषेक सफल झाला होता.
माप ओलांडून तू माझ्या घरी आली. आता अंगणातल्या मोगर्यावर फक्त तुझाच अधिकार होता. झाडाच्या कुशीत निजलेल्या कळ्या पहाटे उजाडायचा आधीच अर्धवट पापण्या उघडून बघायच्या. हलकीशी वार्याची झुळूक आली की पाळण्यावर हिंदोळे घेणार्या अल्लड मुलीसारख्या झुलायच्या. केशरी फेटा बांधून आलेल्या त्या तेजोमय तपस्वीचे दर्शन झाले की कळ्या न्हाऊन माखून फुलून यायच्या. अंगणात सडा, रांगोळी घालताना त्यांची कुचबूच चालायची. अगदी वर्गात बाई नसताना जशी मुलं टवाळक्या करतात तशीच.
बघ ना! गाव सोडला इथे फ्लॅटमध्ये ना अंगण ना मोगरा. म्हणून आज मुद्दाम तुझ्यासाठी हा गजरा आणलाय. चल आटोप पटकन नाटक सुरु होईल आणि सूनबाई ऑफिसातून येईल चाबी त्या वेलकम मॅटच्या खाली ठेव….निघायचं ना!
मला माहितेय गं या मोगर्याला बघून माझाही मोगरा फुलतो, खरंय ना!
हो खरंय हो ! मी माळलेल्या मोगर्याच्या सुगंधाने एक माणूस अजूनही माझ्यावर भाळतो, खरंय ना !
ती जगाचा निरोप घेऊन दहा वर्षांआधीच गेली. नाटक बघायला जाताना ती जिना उतरताना पडली आणि नाटक तिथेच संपलं.
आणि तो मात्र तिच्या प्रत्येक वाढदिवसाला मोगर्याचा गजरा तिच्या फोटोवर वाहतो अन् लाफ्टर क्लबच्या मित्रांना एकच कथा प्रत्येक वर्षी सांगतो. कथा संपली की सगळे जोरजोरात हसायला लागतात. तोही वेडा डोळ्याऐवजी ओठांनी रडून घेतो…. कसं आहे आठवणींना शाप असतो न विसरण्याचा …
The Mogra has bloomed.