– विजया अवचार
प्रत्येक मुलाच्या डोळ्यांत एक स्वप्न असते-शिकण्याचे, घडण्याचे आणि आयुष्यात स्वावलंबी होण्याचे. काही विद्यार्थ्यांचा हा प्रवास सहज असतो, तर काहींसाठी प्रत्येक पाऊल संघर्षमय असते. मात्र, शिक्षणाचा समान अधिकार प्रत्येक बालकाचा असून, कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत समग्र शिक्षा अभियानांतर्गत समावेशित शिक्षण दिव्यांग मुलांसाठी हा महत्त्वपूर्ण उपक्रम देशभर राबविण्यात येत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त सहकार्याने महाराष्ट्रातही या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होत असून, विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
या समावेशक विचारांचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील ओझर टाउनशिप येथील जिल्हा परिषद शाळा. केवळ शिक्षण देणारी संस्था नसून, प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवणारी, त्याच्या स्वप्नांना नवी दिशा देणारी आणि आत्मविश्वास निर्माण करणारी समावेशक शिक्षणसंस्था म्हणून ओळख निर्माण करत आहे. शाळेत विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच समान संधी उपलब्ध करून दिली जाते. त्यांना वेगळे न मानता त्यांच्या वैयक्तिक क्षमतांची ओळख करून त्यानुसार शैक्षणिक नियोजन केले जाते. प्रत्येक विद्यार्थ्याचे निरीक्षण करून त्याचा वैयक्तिक शैक्षणिक आराखडा तयार केला जातो. त्यानुसार फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, उपचारात्मक अध्यापन, मानसशास्त्रीय समुपदेशन, दैनंदिन जीवन कौशल्य प्रशिक्षण, व्यवसायपूर्व कौशल्य विकास तसेच पालक व शिक्षक मार्गदर्शन अशा विविध सेवा पूर्णतः मोफत उपलब्ध करून दिल्या जातात.
विद्यार्थ्यांचे अर्ली आयडेंटिफिकेशन (लवकर निदान) आणि अर्ली इंटरव्हेन्शन (शीघ्र हस्तक्षेप) यावर विशेष भर दिला जातो. विद्यार्थ्यांच्या गरजा वेळेत ओळखून योग्य उपचार, आवश्यक थेरपी आणि शैक्षणिक सहाय्य उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांच्या शारीरिक, बौद्धिक, भाषिक, सामाजिक व भावनिक विकासाला चालना मिळत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीची सातत्याने नोंद ठेवून त्यानुसार पुढील नियोजन केले जाते.
शाळेमध्ये नियमित वैद्यकीय तपासणी शिबिरे आयोजित केली जातात. आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांना यूडीआयडी कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. तसेच चष्मे, श्रवणयंत्र, व्हीलचेअर, ट्रायसायकल, कुबड्या, स्प्लिंट, एमआर किट आणि इतर सहाय्यक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक सुलभ व परिणामकारक बनत आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत पात्र विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष शिक्षक सातत्याने प्रयत्नशील आहेत. मदतनीस भत्ता, प्रवास भत्ता, प्रोत्साहन भत्ता तसेच अंध व अंशतः अंध विद्यार्थ्यांसाठी वाचनिक भत्ता यांसारख्या योजनांचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, मार्गदर्शन आणि पाठपुरावा नियमितपणे केला जातो. त्यामुळे पालकांवरील आर्थिक भार कमी होण्यास मदत होत असून विद्यार्थ्यांचा शाळेतील नियमित सहभाग वाढत आहे.
समावेशित शिक्षणाचा पाया केवळ वर्गातील अध्यापनावर आधारित नसून पालक, शिक्षक, आरोग्य विभाग आणि समाज यांच्या समन्वयावरही आधारित आहे. यासाठी विशेष शिक्षकांकडून पालक समुपदेशन, गृहभेटी, शिक्षक मार्गदर्शन, जनजागृती उपक्रम, शाळास्तरीय
सर्वेक्षण, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सातत्यपूर्ण मूल्यमापन आणि आवश्यक त्या शासकीय सेवांशी समन्वय अशी अनेक जबाबदार्या प्रभावीपणे पार पाडल्या जात आहेत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपक्रमांसोबतच क्रीडा, सांस्कृतिक, कला आणि सामाजिक उपक्रमांमध्येही सहभागी करून घेतले जाते. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढत असून संवाद कौशल्य, नेतृत्वगुण, सामाजिक सहभाग आणि स्वावलंबनाची भावना अधिक दृढ होत आहे. ओझर टाउनशिप येथील जिल्हा परिषद शाळेत समावेशित शिक्षण म्हणजे केवळ वर्गात शिकविण्याची प्रक्रिया नसून प्रत्येक विद्यार्थ्याला सन्मानाने जगण्याची प्रेरणा देणारी जीवनशिक्षणाची चळवळ ठरत आहे. येथे विशेष गरजा असलेले विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांसोबत शिकतात, खेळतात, संवाद साधतात आणि आत्मविश्वासाने स्वतःचे भविष्य घडवतात. या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विलास साळी यांचे मार्गदर्शन व प्रेरणा तसेच केंद्र समन्वयक श्रीमती अनिता अहिरे यांचे सहकार्य लाभत आहे. मुख्याध्यापक दिलीप नरसिंगे यांच्या नेतृत्वाखाली विशेष शिक्षिका श्रीमती विजया प्रल्हाद अवचार आणि शाळेतील सर्व शिक्षकवृंद तसेच तालुका प्रमुख मुकेश जगताप यांच्या समन्वयाने कार्य करून विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत.
विशेष शिक्षकांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, सामाजिक, भावनिक आणि कार्यात्मक कौशल्य विकसित होत असून अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडताना दिसत आहे. समावेशित शिक्षणाचा हा उपक्रम केवळ एका शाळेपुरता मर्यादित नसून समाजाला समानता, संवेदनशीलता आणि सर्वसमावेशकतेचा संदेश देणारा आदर्श ठरत आहे. प्रत्येक दिव्यांग विद्यार्थ्याला त्याच्या क्षमतेनुसार संधी, योग्य मार्गदर्शन आणि आवश्यक सहाय्य मिळाल्यास तोही समाजाचा सक्षम, स्वाभिमानी आणि आत्मनिर्भर नागरिक बनू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणून ओझर टाऊनशिप येथील जिल्हा परिषद शाळेकडे आज प्रेरणादायी नजरेने पाहिले जात आहे.
A New Direction for the Holistic Development of Persons with Disabilities through Inclusive Education