एसआयआरनंतर नगरसेवकांचे प्रांताधिकार्यांना निवेदन
येवला : प्रतिनिधी
येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक मतदारांची नांंवे नव्याने प्रसिद्ध झालेल्या यादीत नाहीत. एसआयआरनंतर जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत हा प्रकार उघड झाला आहे. दरम्यान, पात्र मतदारांची नावे पुन्हा नव्या मतदार यादीत समाविष्ट करण्यात यावीत, या मागणीचे निवेदन भाजपाचे नगरसेवक समीर समदडिया, शिवसेना नगरसेवक गणेश शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक लोणारी, प्रवीण बनकर, रिपाइंचे गुड्डू जावळे, सामाजिक कार्यकर्ते अक्षय राजपूत, समर्थ अलगट, सुनील जाधव, गणेश गायकवाड, आदींनी प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे यांना दिले.
नवीन मतदार यादीत अनेकांची नावे आलीच नसल्याने या संदर्भात पदाधिकार्यांनी प्रांताधिकारी गाढवे यांच्याबरोबर चर्चा केली. दरम्यान, प्रशासनाने फार्म 6 भरून देण्याचे आवाहन केले आहे. यानंतर पुन्हा नावे येतील, असेही सांगण्यात आले. कायमस्वरूपी स्थलांतरित झालेले मतदार, मृत मतदार, दुबार नोंदणी तसेच शोध घेऊनही संपर्क न झालेल्या मतदारांच्या नोंदी वगळण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, या प्रक्रियेत अनेक पात्र मतदारांची नावेही प्रारूप यादीतून वगळली गेल्याच्या तक्रारी पुढे आल्याने लोकप्रतिनिधी आक्रमक झाले आहेत. प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर विविध भागांतील नागरिकांनी आपली नावे यादीत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. काही प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदारसंख्या कमी झाल्याचे दिसून येत आहे. मतदारांची नावे नेमकी कोणत्या कारणामुळे वगळण्यात आली, त्याची कारणे स्पष्ट करावीत तसेच पात्र मतदारांची नावे पुन्हा यादीत समाविष्ट करावीत, मतदार यादीतील वगळलेल्या नावांची वस्तुनिष्ठ पडताळणी करून पात्र नागरिकांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवू नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
एसआयआर प्रक्रियेतून वगळलेल्या नावांमध्ये अपात्र किंवा अस्तित्वात नसलेल्या मतदारांसोबतच पात्र मतदारांची नावे चुकून वगळली गेली असल्यास त्यांची तातडीने दुरुस्ती होणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी
स्वतःचे नाव मतदार यादीत तपासून, नाव नसल्यास निर्धारित मुदतीत फॉर्म क्रमांक 6 दाखल करावा. अडचण आल्यास लोकप्रतिनिधींशी संपर्क साधावा.
– समीर समदडिया, नगरसेवक, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्षफॉर्म भरावा..!
दरम्यान, मतदार यादीतून नाव वगळल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसून, प्रारूप मतदार यादीत आपले नाव आहे किंवा नाही, याची प्रत्येकाने तपासणी करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ज्या पात्र नागरिकांचे नाव प्रारूप मतदार यादीत आढळत नाही, त्यांनी फॉर्म क्रमांक 6 भरून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यासाठी नागरिकांना सध्या एक महिन्याची मुदत उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.प्राप्त अर्जांची नियमानुसार छाननी व पडताळणी केल्यानंतर पात्र नागरिकांची नावे पुढील सुधारित मतदार यादीत समाविष्ट करण्यात येतील. त्यानंतर संबंधित मतदारांना नवीन ओळखपत्र क्रमांक देण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आल्याची माहिती यावेळी नगरसेवकांनी दिली.
The names of voters from Yeola are not in the draft list.