– राजेश शिरभाते
आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रसासनाचा कारभार हाती घेतल्याबरोबर अन्नातील भेसळीवर जोरदार प्रहार सुरु केला आहे. अर्थात, ते एक प्रामाणिक अधिकारी असल्यामुळे ते कोणाच्या व्यवहारात न येता या कारवाया करू शकतात. ते जिथे जातात तिथे त्यांच्या कामाच्या पद्धतीने गाजतात. आज अशा प्रकारच्या प्रामाणिक अधिकार्यांची देशाला गरज आहे. हे म्हणताना जे अशा प्रकारचे अधिकारी नाहीत त्यांची काहीच गरज नाही, हेही अधोरेखित होते. तुकाराम मुंढे यांच्या वारंवार बदल्या होत असतात. त्यामुळे त्यांच्या बदल्या करणारे प्रामाणिक नाहीत, हेही अधोरेखित होते. अन्न आणि औषध प्रशासनामध्ये त्यांनी थेट रामदेवबाबा यांच्या व्यवसायावरही धाडी टाकल्या आहेत. त्यामुळे या पदावर ते अधिक काळ राहतील असे वाटत नाही. तरीही ते जे काम करत आहेत, त्याबद्दल सर्वसामान्य नागरिकांच्या मनात आदराची भावना आहे. जनसामान्याच्या मनात अशा प्रकारचा आदर फार कमी लोकांना प्राप्त होतो. अन्यथा आम्ही निवडून आलो हे वारंवार सांगणार्यांच्या बद्दल हा आदर कुठेही दिसत नाही.
तुकाराम मुंढे हे नेहमी असे म्हणतात की, मी वेगळे काही करत नाही. मला जे अधिकार आहेत. जे काम माझ्याकडून अपेक्षित आहे, ते घटनेमध्ये आधीच लिहून ठेवण्यात आले आहे. टी. एन. शेषन हे जेव्हा देशाचे निवडणूक आयुक्त होते तेव्हा तेही असेच म्हणत असत. मी निवडणुका कशा घ्यायच्या हे घटनेमध्ये आधीच लिहिलेले आहे. मी केवळ त्याचे पालन करत असतो. याचा अर्थ इतर जे लोक अशा प्रकारच्या मोठ्या पदावर बसतात ते एकतर सर्वसामान्यांच्या भल्याचे काम करत नाहीत किंवा मग संविधानात त्यांच्याकडून ज्या कामाची अपेक्षा करण्यात आलेली आहे, ती पूर्ण करत नाहीत.
तुकाराम मुंढे यांच्या निमित्ताने अन्नातील भेसळीचा मुद्दा पुन्हा एकदा वर आलेला आहे. अन्नात भेसळ केल्याशिवाय त्यातून हवा तितका फायदा उचलता येत नाही, हे अनेक व्यापारी म्हणतात आणि तसे करतात. हे या राज्यातील लोक नाहीत. ते बाहेरच्या राज्यातून आपल्या राज्यात केवळ पैसे कमावण्यासाठी आलेले आहेत. त्यांना इथल्या लोकांच्या आरोग्याशी किंवा जगण्या-मरण्याशी काहीही घेणे-देणे नाही. त्यांना केवळ खाद्यपदार्थांचा व्यापार करायचा आहे. अशा पद्धतीने केवळ धंदा करणार्यांवर वचक बसवण्यासाठी संविधानाने काही यंत्रणा आणि संस्था तयार केल्या होत्या. कालांतराने शासनाच्या वतीने या लोकांवर वचक ठेवणारेच त्यांना सामील झाले व त्यांनीही आपला धंदा सुरू केला.
प्रशासनामध्ये मोठी शक्ती असते. ते कायद्यांची योग्य अंमलबजावणी करून सर्वसामान्यांचे भले करू शकतात. समाजाची एक सेवा करू शकतात. संविधानाने सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी आणले आणि त्यांच्या मागण्यांनुसार कायदेशीर अंमलबजावणी करायला अधिकारी वर्ग आहे. या सार्यांच्या कायदेशीर कामगिरीकडे पाहण्यासाठी न्यायपालिकेचा चौथा स्तंभ आहे. या ठिकाणी मोठ्या पदावर बसणारी व्यक्तीची पात्रता अधिक कठीण परीक्षेमधून सिद्ध करून घेतलेली असते. त्यानंतर त्यांना मिळणारे वेतन व इतर सेवासुविधा या अशा प्रकारच्या असतात की, त्यांना पैशांसाठी भ्रष्ट होण्याची काहीही गरज राहणार नाही आणि ते आपले काम पूर्ण प्रामाणिकपणे करतील. ही संरचना ब्रिटिशांची होती. ती आपण पुढे अंगीकारली. मूठभर ब्रिटिश अधिकार्यांनी त्या काळात आपल्या इतक्या मोठ्या देशावर काम केले, ते त्यांच्या ब्रिटन सरकार व त्यांच्या मातृभूमीच्या प्रति असलेल्या प्रामाणिकपणाबद्दल. इतिहासाच्या पुस्तकांमध्ये एखाद्या संस्थानिकाने एखाद्या ब्रिटिश अधिकार्याला लाच दिली आणि आपल्या पदरी ठेवून घेतले, असे एखादेही उदाहरण आठवत नाही.
तुकाराम मुंढे हे आपल्या देशाचे अशाच प्रकारचे अधिकारी आहेत. त्यांच्याप्रमाणे इतरही काही अनेक अधिकारी आहेत. आपल्या जागेवर बसून सामान्यांच्या बाजूने न्याय देणारे व त्यांचे भले करणारे अनेक अधिकारी आपल्या देशात असल्याने या देशाचा गाडा अद्याप सुरळीत चालला आहे. त्यांची संख्या जसजशी वाढेल तसतशी या देशाची अधिकाधिक प्रगती होत जाईल. अनेक वेळा आपल्या सेवानिवृत्तीनंतर काही सरकारी लाभ किंवा खासदारकी वगैरे मिळावी यासाठी अनेक मोठे अधिकारी एका कोणाच्या तरी बाजूने झुकतात. तशी उदाहरणेही आहेत. मात्र, तुकाराम मुंढे यांच्यासारखे काही अधिकारी कोणाही पुढे झुकत नाहीत. त्यांनी जे काम सुरू ठेवले आहे, त्याबद्दल त्यांना सर्वसामान्यांचे आशीर्वाद मिळतील, मात्र त्यांना सरकारकडून पुरेसे बळ मिळावे, हीच अपेक्षा आहे.
बाजारातील अन्नाची भेसळ, बेकायदेशीर औषध निर्मिती, कोणत्याही उत्पादनाबद्दल व त्याच्या परिणामांविषयी करण्यात आलेले अतिरंजित दावे हा मोठा प्रश्न आहे. या प्रश्नावर काही वेळा न्यायालयानेही ताशेरे ओढलेले आहेत. तरीही कोणाच्या तरी आशीर्वादाने हे प्रकार सर्रास सुरू असतात. हा नागरिकांच्या जीवाशी करण्यात आलेला खेळ असतो. कधी कधी त्यामध्ये इतक्या मोठ्या स्तरावरील व्यक्ती गुंतलेली असते की, सर्वसाधारण अधिकारी त्यांच्यावर कारवाई करण्यास धजत नाही. अशा लोकांवर कारवाई करण्यासाठी तुकाराम मुंढेंसारखे काळीज असावे लागते. केवळ वल्गना आणि नुसत्यात घोषणा काय कोणीही देईल. मात्र, अशा प्रकारची ठोस कारवाई विरळाच असते. तुकाराम मुंढे यांनी ती केली आहे. सध्या तरी शासनाने त्यांची काही काळासाठी बदली केलेली नाही. यथावकाश ती होईल तोपर्यंत तरी प्रशासनाच्या शक्तीच्या या अविष्काराचा आनंद घ्यावा. यातून काही जण जर शिकले व भेसळ न करण्याची सद्विवेक बुद्धी जागृत झालीच तर त्याचा फायदा होईलच.
The Power of Administration
‘लाडकी बहीण’ला धक्का नाही : मुख्यमंत्री फडणवीस मुंबई : प्रतिनिधी राज्यात दुष्काळाचे सावट आणि तिजोरीवरचा…
मुंबई : प्रतिनिधी टेलिकॉम क्षेत्रात सध्या तगडी स्पर्धा सुरू असताना सरकारी कंपनी ’बीएसएनएल’ने पुन्हा एकदा…
सप्तशृंगगडावर कर्तव्यावर असताना काळाचा घाला सप्तशृंगगड : प्रतिनिधी श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर सुरू असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवात भाविकांच्या…
जुहूतील पुष्पा पार्क येथे वर्दळीत थरार, अभिनेता सुरक्षित मुंबई : प्रतिनिधी बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता टायगर…
विजयादशमी अर्थात, दसर्याला मोठ्या प्रमाणावर झेंडूच्या फुलांना मागणी असल्याने सध्या सर्वत्र झेंडूच्या मळ्यांत तोडणी सुरू…
दि. 18 ते 24 ऑक्टोबर 2026 मेष : अनपेक्षित लाभ या आठवड्यात चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत.…