– अमोल जगताप
लहानपणी गावाकडे अनुभवलेला पावसाळा आठवला म्हणजे जणू एखाद्या जादुई पुस्तकाचं एक एक पान उलगडत जातं. गावातलं आकाश ढगांनी झाकलं की सगळं गावच एका सरींच्या तालात नाचायचं. पाण्याच्या थेंबांचा खळखळ नाद, मातीचा मंद सुगंध आणि ओल्या वार्याची थंडगार झुळूक सगळं कसं मनाला भिडायचं. पाऊस पडायचा तेव्हा गाव जणू स्वप्नात हरवायचं; रानं, गल्ली, घरांचे कौलं आणि आमच्या लहानशा मनातली निरागसता सगळं कसं धुऊन निघायचं. पहिल्या सरींनी मळ्याला नवं रूप यायचं खरं; पण काही दिवसांनी तोच पाऊस खट्याळ होऊन गावाला खेळवायला लागायचा आणि आमच्या लहानशा विश्वाला एका गूढ बंधनात जखडायचा.
जुनी मोडकळीस आलेली घरं पाण्याशी लपंडाव खेळायची. उन्हाळ्यात माती-खापरांनी दुरुस्त केलेली धाबी पावसाच्या रौद्र रूपापुढे नमायची. पाण्याचे टपोरे थेंब टपटप येऊन धडकायचे. तर कधी ओघळत घरात शिरायचे. मागचं दार उघडलं की घराजवळून जाणारी चारी गढूळ पाण्याने ओसंडून वाहायची, जणू ती पावसाचं गाणं गात असायची. कितीतरी ठिकाणाहून पाणी घरात गळू लागायचं. आम्ही पोरं मग आई-काकूच्या हाताखाली मदतीला धावायचो. गळत्या पाण्याखाली ठेवायला “पातेलं ठेव, बादली आण!” अशा हाका सुरू व्हायच्या. त्या हाका कधी कधी अगदी चहाचं बघुलं ते पेल्यापर्यंत जाऊन पोहचायच्या.. घरातली भांडी जागोजागी पसरायची, पण पावसाचं पाणी मात्र नवीन जागा शोधायचं. शेवटी आजी मधात दोरी बांधून त्यावर जुनं बाडदान अडकवायची आणि त्याला एक बाजूला उतार करून त्याखाली मोठा हंडा ठेवायची. पण तो हंडाही क्षणात डबडबायचा आणि मग आम्हाला तो उपसण्याचही काम लागायचं. भिंतींवर ओलाव्याच्या खुणा उमटायच्या, शेणाने सारवलेली भुई थंडगार व्हायची आणि घरात एकच गूढ शांतता पसरायची.
जोरजोरात विजा कडाडल्या, की आजी दिनुतात्यांना सांगायची- “खुरपं चारीच्या पलीकडे टाक रं!”. त्या एवढ्याशा खुरप्याचं मला खूप अप्रूप वाटायचं. त्या लहानशा लोखंडी तुकड्याने घरावर आभाळातली वीज पडणार नाही – असं आजीचं ठाम मत होतं. मी शहरातल्या शाळेत पोरांना त्या खुरप्याची महती सांगायचो आणि त्यांच्या डोळ्यातलं कुतूहल पाहून मला तेव्हा राजासारखं वाटायचं. पण खरी भीती वाटायची ती वार्याची. कधी पाऊस कमी आणि वारा-वावटळच जास्त असायची. कितीही कवाडं पक्की लावली तरी फटीतून सूऽऽ… सूऽऽऽ… करत वारा घरात शिरायचाचं. माझ्यासह सारिका, रिंकू आणि बिच्ची आम्ही बाबांच्या जुन्या कांबळ्यात शिरायचो, जणू तो फाटका कांबळा आम्हाला वार्या-पाण्याच्या तावडीतून वाचवणार अस वाटायचं. कधी अचानक वारा घराचे कौलं उडवायचा, कधी ढापे निखळून गडबडायचे. मग घरात एकच गलका व्हायचा. धावपळ व्हायची. आम्ही कांबळ्याच्या ज्या होलातून पाहत असायचो ते होलही मुठीत घट्ट दाबून निपचित पडून रहायचो. कांबळ्यावरही पावसाचं पाणी पडल्याचं जाणवायचं. मनात धडकी भरायची. मध्येच वर्ल्यांगच्या पडवीचे एक-दोन पत्रे वारा एका झटक्यात वावरात
फेकायचा. उरलेले पत्रे वाचवण्यासाठी दिनूतात्या चर्हाटाने मेढीला बांधून खालून पक्के लावून धरायचे.. मदतीला दादा, काका, तात्याही धावायचे. पाऊस आणि वारा मग अजूनच जोरात घरावर तुटून पडायचे.. घरभर पाणी पसरायचं, चुलीच्या राखेपर्यंत ते पोहोचायचं. कुत्रीही घरात आडोशाला निपचित पडून रहायची, जणू तीही पावसाच्या कहरापुढे स्वतःहून हार मानायची.
पाऊस शांत झाला, की खरं नुकसान कळायचं. कुत्री अंगाला झटके देत पाणी झटकायची आणि घराबाहेर पडायची. मोठी माणसं शेतातलं, घरातलं नुकसान डोळ्याखालून घालून भिंतीचा आधार घेत निपचित बसायची. बाईमाणसं शिराईने पाणी बाहेर काढायला जुंपायच्या आणि आम्ही पोरं बाबांच्या कांबळ्यातून बाहेर येत पाटाला आलेला पूर पाहायला डंबाळे बाबाच्या चौकीकडे पळत सुटायचो. त्या पुराचं गूढ सौंदर्य आमच्या लहान मनाला भुरळ घालायचं. पाटाचं पात्र कुठे आहे, हे ओळखणं कठीण होऊन जायचं. कधी कधी त्या पाटात झाडं, गुरंढोरं वाहताना पाहून मन सुन्न व्हायचं, पण तरीही त्या दृश्यात काहीतरी मंत्रमुग्ध करणारं होतं.पावसाचा रट्टा सुरूच असायचा. हळूहळू घरातलं तेल-मीठ-पीठ संपायचं. गावातलं किराण्याचं दुकान पाण्याच्या डबक्यात बुडालेलं असायचं. मग घरी जे असेल थोडे तांदूळ, काही मूग त्याची खिचडी किंवा उसण काहीतरी बनायचं. त्या थंडीत, वाफाळत्या खिचडीचा घास घेताना, लहान मनाला कसली तरी उब मिळायची. पावसाचा तो खट्याळपणा साहस कथेसारखा वाटायचा. मोठी माणसं आमच्या खाण्यापिण्याची, झोपेची काळजी घ्यायची. रात्रभर कडाडत पाऊस सुरू असताना आम्ही गच्च डोळे मिटून झोपायचो, सकाळी पुन्हा खेळात रमायचो.
माणसं एखाद्या कमी गळणार्या ओट्यावर किंवा पडवीत जमायची. आम्ही पोरंही तिथे धडपडत पोहोचायचो, जणू तिथेच मग सगळं विश्व एकवटलेलं असायचं. बाबा कापडं गुंडाळून, हातपाय दाबून बसायचे. चिलमीतून तंबाखूचा धूर हवेत तरंगायचा आणि त्या धुरातून एक अनामिक उब जन्म घ्यायची. पाऊस सगळ्यांना एका छताखाली बांधायचा अन् मग गप्पांना मोकळीक मिळायची. गावातल्या रहस्यमय कथा भुतं, खून, दरोडे, पुराच्या गोष्टी सगळं कसं रंगतदार सांगितलं जायचं. भुतांच्या गप्पांनी आमच्या लहान मनाला थरकाप उडायचा, पण गुप्त कहाण्यांनी कुतूहल जागायचं. त्या गप्पांमधली नावं, ठिकाणं उघडपणे यायची आणि आम्हाला त्यातलं काही कळलं नसलं तरीही त्या शब्दांचा नाद मनाला पंख लावायचा.गावातली छोटी शाळा असो की शेजारच्या गावातलं हायस्कूल असो, सगळं ठप्प होऊन जायचं. मधून वाहणारा वहाळ तुफान उसळायचा आणि मास्तरांचं-पोरांचं येणं-जाणं अशक्य व्हायचं. पाच-दहा दिवस सगळं असंच चालायचं. ना अभ्यास, ना घरची कामं. गप्पांमधल्या गोष्टी आमच्या लहान मनात चित्रं रंगवायच्या. गावातल्या पडक्या वाड्यात मध्यरात्री पांढर्या साडीतली बाई दिसायची, असं कोणीतरी सांगायचं. मग संध्याकाळी गुरांना वैरण टाकायला जाताना आमच्या पायांना बेड्या पडायच्या. पांढर्या साडीतली बाई गव्हाणीत गाईपुढे उभी दिसायची अन् हातातला चारा टाकून आम्ही धूम ठोकायचो.त्यानंतर त्या भुतांच्या गप्पांमधली माणसं रस्त्यात भेटली, की आम्ही चोरट्या नजरेनं त्यांच्याकडे पाहायचो.. त्यांनाही भ्यायचो..पावसाने जराशी उसंत दिली, की गावातली माणसं फिरायची आणि मग वेगवेगळ्या गटातल्या गप्पांनी नवे रंग भरले जायचे.. साहेबू तात्या मळ्यातल्या पावसाचा कहर अजून रंगवून सांगायचे.. आम्हा पोरांना मात्र पाटाच्या पुराचं भारी आकर्षण असायचं. घरचे ओरडायचे, “लांब रहा, जवळ जाऊ नका.” आम्ही मात्र खंडाळे बाबाच्या चौकीत जाऊन बसायचो. तिथे तो बाबा मस्त चिलीम फुकित असायचा. तो आम्हाला जुन्या पुरांच्या आठवणी सांगायचा आणि त्या ऐकताना गावाचा भूतकाळ जणू आमच्या डोळ्यांसमोर उलगडायचा.पावसाची रम्य रूपं आम्हा पोरांना भुरळ घालायची, पण त्याचा विनाशकारी अवतार मोठ्यांना हैराण करायचा. शेतं पाण्याखाली, घरं चिंब, भिंतींवर बुरशीचं जाळं. कंटाळून आजी कोणाला तरी खुरप्यावर तापलेला कोळसा देऊन गल्लीत फालायला सांगायची. वरुणाला अग्नीचा धाक दाखवायचा. कधी कधी असं करताना पाऊस खरंच थांबायचा आणि मग आकाश उघडायचं. सूर्याचं कोवळं हसू पडायचं आणि गावातली माणसं आपापलं आयुष्य सावरायला बाहेर पडायची. त्या पावसाच्या लहानपणीच्या आठवणी आजही मनात जपलेल्या आहेत. त्या गप्पांचा नाद, त्या खुरप्याचं अप्रूप, त्या पुराचं गूढ सौंदर्य, त्या खिचडीचा सुगंध सगळं जणू कालच घडलं अस वाटतंय. त्या आठवणी आता मनाच्या कोपर्यातच उरल्या अन् पावसाच्या सरींप्रमाणे हळूहळू ओसरत गेल्या, पण त्यांचा मंद सुगंध अजूनही मनात असा रेंगाळतो राहतो एवढंच..!!!
Days of incessant rain…
सात दशकांची परंपरा कायम; रामलीला मैदानावर तयारी नाशिक रोड : विशेष प्रतिनिधी सात दशकांची परंपरा…
नाशिक : श्री कालिका माता यात्रोत्सवात लहान-मोठ्यांचे आकर्षण ठरलेले रहाटपाळणे विद्युत रोषणाईमुळे असे विलोभनीय दिसतात.…
सोशल मीडियावर लहान मुलांचे देवीरूपातील फोटोशूट व्हायरल नाशिक : देवयानी सोनार सध्या सोशल मीडियावर एक…
‘लाडकी बहीण’ला धक्का नाही : मुख्यमंत्री फडणवीस मुंबई : प्रतिनिधी राज्यात दुष्काळाचे सावट आणि तिजोरीवरचा…
मुंबई : प्रतिनिधी टेलिकॉम क्षेत्रात सध्या तगडी स्पर्धा सुरू असताना सरकारी कंपनी ’बीएसएनएल’ने पुन्हा एकदा…
सप्तशृंगगडावर कर्तव्यावर असताना काळाचा घाला सप्तशृंगगड : प्रतिनिधी श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर सुरू असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवात भाविकांच्या…