तीन हजार दुचाकी, दीड हजार चारचाकींची विक्री; 450 फ्लॅट्सचे बुकिंग
नाशिक : प्रतिनिधी
साडेतीन मुहूर्तार्ंपैकी एक असलेला अक्षयतृतीयेचा मुहूर्त साधत नाशिककरांनी सोने, वाहन, गृहोपयोगी व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करत अक्षयतृतीयेचा सण रविवारी (दि. 19) साजरा केला.
भगवान विष्णूंसह पितरांच्या पूजनासाठी या तिथीला विशेष महत्त्व असल्याने या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत करा-केळी व आंब्याची खरेदी करण्यात आली. घरोघरी पूर्वजांच्या स्मरणासाठी करा-केळीचे पूजन, आमरस व पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करत अक्षयतृतीयेचा सण साजरा करण्यात आला.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ’अक्षयतृतीये’चा उत्साह यंदा बाजारपेठेत ओसंडून वाहिला. गेल्या काही दिवसांपासून वाढत्या तापमानावर मात करत ग्राहकांनी शुभमुहूर्त साधत खरेदीचा आनंद लुटला. केवळ सोन्या-चांदीतच नव्हे, तर वाहन आणि बांधकाम क्षेत्रातही मोठी आर्थिक उलाढाल झाली आहे. तीन हजार दुचाकी, दीड हजाराहून अधिक कारची विक्री झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बांधकाम व्यावसायिकांकडे 450 नवीन फ्लॅट्सचे बुकिंग झाले आहे.
अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर नवीन वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. सोन्याचे दर प्रतितोळा दीड लाखापर्यंत गेला आहे. तरीही अनेकांनी शुभमूहूर्तावर सोने खरेदी करण्यासाठी 15 दिवसांपूर्वीच सोन्याचे प्री-बुकिंग करून ठेवले होते. असे असले, तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोने खरेदीकडे महिलावर्गाने पाठ फिरवल्याचे दिसले. दिवसभर सराफा दालनात ग्राहकांची तुरळक गर्दी होती; परंतु दुपारी 4 नंतर या दालनात काही अंशी गर्दीत वाढ झाल्याचे दिसून आले. तरुणाईने लाइटवेट दागिने व चोख सोने खरेदीला पसंती दिली, असे सराफ व्यावसायिकांनी सांगितले. परंपरेनुसार चांदीच्या लक्ष्मी-गणेश मूर्ती, ताट-वाटी अनेकांनी खरेदी केले.
आखाती देशांमधील युद्धाचा रियल इस्टेट क्षेत्रावर मोठा परिणाम झाला. पुढील काही दिवसांत घरांच्या किमती वाढतील. त्यामुळे अनेकांनी अक्षयतृतीयेचा मुहूर्त साधत फ्लॅटचे बुकिंग केले. नरेडको सदस्यांकडे 450 फ्लॅट्सचे बुकिंग झाले. – सुनील गवादे, माजी अध्यक्ष, नरेडको
गेल्या काही दिवसांत सोन्याचे दर वाढले आहेत. या दरवाढीचा बर्यापैकी परिणाम दिसला, परंतु अनेकांनी दरवाढीला पर्याय म्हणून जास्त वजनाचे दागिने खरेदी न करता शुभमुहूर्त साधत लाइटवेट दागिने खरेदी केले. – गिरीश नवसे, अध्यक्ष, सराफ असोसिएशन
शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांचा वाहन खरेदीला उत्तम प्रतिसाद मिळाला. यंदा व्यावसायिक वाहनांना मागणी कमी आहे. इलेक्ट्रिक वाहनांना अधिक मागणी असल्याचे चित्र होते. – शिवजी पांडे, भाविन व्हील्स, सेल्स मॅनेजर
रात्री उशिरापर्यंत ताबा घेण्यासाठी लगबग
दरवषीर्र्प्रमाणे यंदाही वाहन कंपन्यांकडून स्पॉट लोन ऑफर्सवर भरघोस सूट जाहीर करण्यात आली. या ऑफर्सचा लाभ घेत अनेकांनी नवीन वाहन घरी घेऊन जाण्यासाठी दोन महिने आधीच आपल्या आवडत्या वाहनाचे प्री-बुकिंग करून ठेवले होते. सकाळपासूनच ग्राहक शोरूममध्ये कुटुंबासह वाहनाचा ताबा घेण्यासाठी दाखल झाले. ग्राहकांना वाहनाचा ताबा देण्यासाठी रात्री उशिरापर्यंत विक्री प्रतिनिधींची शोरूममध्ये लगबग सुरू होती.
रियल इस्टेटमध्येही तेजी
केवळ सोने आणि वाहनेच नाही, तर तीव्र उन्हाळ्यामुळे एसी, कूलर व फ्रीजच्या विक्रीतही मोठी वाढ झाली. नाशिक असोसिएशन ऑफ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संस्थेच्या अनेक गृहनिर्माण प्रकल्पांत 450 फ्लॅट्सचे बुकिंग पार पडले.
फ्लॅट्सचे बुकिंग वाढले
आखाती देशांत सुरू असलेल्या युद्धामुळे सिमेंट, स्टील यांसारख्या मटेरियलचे दर वाढले आहेत. परिणामी घरांच्या किमतीत दरवाढ अपेक्षित आहे. तूर्तास नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकांकडे जुन्या दराने खरेदी मटेरियल उपलब्ध असल्याने शहरात अजून दरवाढ झालेली नाही. आगामी काळात घरांच्या किमती वाढणार असल्याने उद्या नाही, तर आजच फ्लॅट बुकिंग करून ठेवू, या भावनेतून अनेकांनी अक्षयतृतीयेचा मुहूर्त साधत फ्लॅटचे बुकिंग पार पाडले.
इलेक्ट्रॉनिक्सगॅॅझेट खरेदीसाठी गर्दी
इलेक्ट्रॉनिक्स गॅॅझेट खरेदी करण्यासाठी नाशिककरांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र बाजारपेेठेत दिसत होते. मोबाइल, टीव्ही, एलसीडी, वॉशिंग मशिन, फ्रीज, लॅपटॉप यांसारखे इलेक्टॉनिक्स गॅझेटची खरेदी करण्यासाठी नाशिककरांची गर्दी झाल्याचे चित्र होते.
अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर ’मयूर अलंकार’च्या
चारही शोरूममध्ये ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या महत्त्वाच्या अक्षयतृतीयेच्या दिवशी रविवारी (दि. 19) सोने खरेदीसाठी ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 24 कॅरेट चोख सोन्याचे नाणे व वेढणी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा जास्त कल होता. त्याचबरोबर गुंतवणुकीच्या, तसेच सध्या सुरू असलेल्या लग्नसराईच्या दृष्टीने ’मयूर अलंकार’च्या सराफ बाजार, गंगापूररोड, तसेच काठे गल्ली या चारही शोरूममध्ये श्रीमंत पेशवाई नेकलेस, तुर्की, लाइटवेट, दागिन्यांच्या कलेक्शनला ग्राहकांनी चांगलीच पसंती दिली. सोन्याचा दर सध्या स्थिर असल्याने खरेदीचा उत्साह दिसला. त्याचबरोबर चांदीच्या दरात भविष्यात वाढ होण्याच्या दृष्टीने चांदी खरेदीदेखील मोठ्या प्रमाणात झाली.
The purchase of ‘Akshay’ has shaken the market