संपादकीय

ग्रंथपालाची भूमिका

सार्वजनिक ग्रंथालय हे लोकांसाठी विद्यापीठ आहे, हे वाक्य आपण नेहमी वाचतो, बोलतो. पण त्याचा खरा अर्थ काय? विद्यापीठाची दारे सर्वांसाठी खुली नसतात. तिथे प्रवेश परीक्षा असते, भरमसाट शुल्क असते, वयाची आणि पदवीची अट असते. पण गावाच्या मध्यभागी असलेल्या एका छोट्या खोलीची दारे मात्र सर्वांसाठी सारखीच खुली असतात.
जिथे एका टेबलावर शेतकरी, विद्यार्थी, निवृत्त शिक्षक, गृहिणी आणि अधिकारी एकत्र बसून पेपर वाचतात, तेच खरे विद्यापीठ- सार्वजनिक ग्रंथालय. विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, ज्या समाजात ग्रंथालये जास्त, त्या समाजाची प्रगती जास्त. महाराष्ट्रात आज बारा हजारांहून अधिक सार्वजनिक ग्रंथालये आहेत. पण ती फक्त पुस्तके देणारी खोली राहतील की लोकांना घडवणारे विद्यापीठ बनतील, हे ठरवणारा एकच घटक म्हणजे- ग्रंथपाल.
ग्रंथपाल मार्गदर्शक
आजही अनेकांना वाटते ग्रंथपाल म्हणजे पुस्तकाची नोंद करणारा माणूस. पण ही कल्पना चुकीची आहे. खर्‍या अर्थाने ग्रंथपाल हा वाचकाचा पहिला शिक्षक असतो. ग्रंथालयात येणारा प्रत्येक वाचक वेगळा असतो. कोणी फक्त वेळ घालवायला येतो, कोणी प्रेमकथा शोधतो, कोणी स्पर्धा परीक्षेचे पुस्तक मागतो, तर कोणी आयुष्यात अपयश आल्यावर उत्तर शोधायला येतो. प्रत्येकाची भूक वेगळी आहे.जर एखादा नवीन तरुण केवळ मोबाइलवरील हलकीफुलकी पुस्तके वाचत असेल, तर त्याला थेट तत्त्वज्ञानाचे जड पुस्तक देऊ नये. त्याला आधी व. पु. काळे यांच्या कथा द्याव्यात, मग साने गुरुजींची ’श्यामची आई’ हे पुस्तक द्यावे, मग ’ययाती’सारखी कादंबरी द्यावी आणि मग थोरामोठ्यांचे चरित्र द्यावे. हा प्रवास सक्तीने नसावा.
वाचकाचा कल ओळखणे,
हीच खरी कला
चांगल्या ग्रंथपालाची कसोटी म्हणजे वाचकाचा कल ओळखणे. यासाठी तीन गोष्टी महत्त्वाच्या.
1. निरीक्षण : वाचक कोणते वर्तमानपत्र वाचतो? कोणत्या कपाटाजवळ जास्त वेळ थांबतो? हे न बोलताही ओळखणे ही कला आहे.
2. संवाद : आज काय नवीन वाचले? मागचे पुस्तक कसे वाटले? असे दोन प्रेमाचे प्रश्न विचारले की वाचक खुलतो. ग्रंथालयात आलेला माणूस हा फक्त वाचक नसतो, तो माणूस असतो. त्याला ऐकून घेणारे कोणीतरी हवे असते. तो संवादच त्याला ग्रंथालयाशी जोडतो.
3. आठवण ठेवणे : अरे, तू शेतीची पुस्तके वाचतोस ना? परवा सेंद्रिय शेतीवर एक नवीन पुस्तक आले आहे असे म्हटले की, शेतकरी वाचकाला आपलेसे वाटते. ही छोटीशी आठवणच वाचकाला कायमचे ग्रंथालयाचे बनवते.
चांगले वाचन कसे
आणि केव्हा करावे?
वाचन प्रमाणात नाही, तर गुणवत्तेत असते. त्यासाठी ग्रंथपालाने वाचनाची शिडी तयार करून द्यावी.
पहिली पायरी- आवडीचे वाचन : वाचकाला जे आवडते ते द्यावे.
दुसरी पायरी- शेजारचे वाचन : त्याच विषयातील थोडे अधिक गंभीर पुस्तक.
तिसरी पायरी- विस्ताराचे वाचन : त्या विषयाशी संबंधित इतिहास, समाजकारण.
चौथी पायरी- चिकित्सेचे वाचन : वाचलेल्यावर विचार करायला लावणारे पुस्तक.
उदाहरण द्यायचे झाले तर, छत्रपती शिवाजी महाराजांची कादंबरी वाचणार्‍या वाचकाला पुढच्या वेळी चांगले चरित्र, मग शिवकालीन प्रशासनावरील संशोधनपर ग्रंथ द्यावा. तो एका कादंबरीतून इतिहासाचा अभ्यासक बनेल.कधीकधी आई जशी मुलाला कडू औषध पाजते, कारण ते त्याच्या भल्यासाठी असते, तसेच ग्रंथपालानेही केले पाहिजे. हे पुस्तक तुला आवडणार नाही कदाचित, पण एकदा वाचून बघ असे म्हणून मुद्दामून चांगले पुस्तक दिले पाहिजे. निराश तरुणाला प्रेरणादायी पुस्तक, व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला व्यसनमुक्तीची कथा देण्याची हिंमत ग्रंथपालात असली पाहिजे. पण हे देताना सक्ती नसावी, माया आणि आग्रह असावा.
ग्रंथालयाचे विद्यापीठ
कसे होईल?
जेव्हा ग्रंथपाल मार्गदर्शक बनतो, तेव्हा ग्रंथालय आपोआप विद्यापीठ बनते. ग्रंथालयतज्ज्ञ डॉ. एस. आर. रंगनाथन म्हणाले होते, प्रत्येक पुस्तकाला त्याचा वाचक मिळालाच पाहिजे. आज ई-पुस्तके मोबाइलवर मिळतात, पण तंत्रज्ञान पुस्तक देईल, पण तू दोन दिवस आला नाहीस, बरा आहेस ना? अशी मायेची विचारपूस करू शकणार नाही. ती फक्त ग्रंथपालच करू शकतो. म्हणूनच शेवटी एकच ग्रंथालयाच्या भिंतींना भिंती म्हणत नाहीत, कारण तिथे माणसे जोडली जातात आणि ग्रंथपाल हा त्या ग्रंथालयाचा आत्मा आहे. त्याने पुस्तक देताना फक्त पुस्तक देऊ नये, तर त्यासोबत तू वाचू शकतोस, तू घडू शकतोस हा विश्वास द्यावा. हाच खरा लोकशाहीचा आणि प्रगतीचा मार्ग आहे.

The Role of the Librarian

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

श्रद्धा ते अंधश्रद्धा

(भाग 1) प्रत्येक अंधश्रद्धेशी निगडित जनमानसातल्या पुरातन काळातल्या श्रद्धा निश्चितच आहेत... आई उवाच... मांजर आडवे…

13 hours ago

चार भिंतींचा निवारा

आजकाल प्रत्येक घरात संध्याकाळी एक दृश्य अगदी सर्रास पाहायला मिळतं-कामानिमित्त बाहेर गेलेली माणसं घरी परततात,…

13 hours ago

उंबरदे येथील स्मशानभूमीच्या दुर्दशेने ग्रामस्थ आक्रमक

ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा; ‘विकासाच्या केवळ गप्पा नकोत‘ सुरगाणा : प्रतिनिधी तालुक्यातील उंबरदे गावातील स्मशानभूमीची…

14 hours ago

वंध्यत्वाकडे नव्या दृष्टिकोनातून:

ताणतणाव,जीवनशैली आणि होमिओपॅथीची भूमिका. सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत मग प्रेग्नन्सी का होत नाही? फर्टिलिटी क्लिनिकमध्ये…

14 hours ago

एन्डोस्कोपिक अल्ट्रासाउंंड

पचनसंस्थेचे अधिक अचूक निदान एन्डोस्कोपिक अल्ट्रासाउंड (ईयूएस) हे एन्डोस्कोपी आणि अल्ट्रासाउंड तंत्रज्ञानाचे संयोजन असलेले आधुनिक…

14 hours ago

लोकशाही आहे का?

भाग 2 विमानाचा पायलट निवडताना त्याच्या शिक्षणाचा आणि प्रशिक्षणाचा निकष न लावता जो इच्छुक असेल…

14 hours ago