विचारधन
दररोज सकाळी 3 ते 3.30 यावेळी ब्रह्म मुहूर्तावर मला जाग येते. रातकीड्यांचे आवाज, पक्ष्यांची किलबिल, कोकिळेची कुहूकुहू यातून मला श्रीमद्भगवद्गीतेचे श्लोक ऐकू येतात. माझ्या सिडको, नवे नाशिक येथील घराच्या जवळ हाकेच्या अंतरावर दक्षिणेला एक व उत्तरेला एक अशा दोन मशिदी आहेत. या मशिदींच्या ध्वनिवर्धकातून निघणार्या ध्वनिलहरींमधून मला श्रीरामरक्षा स्तोत्राचे मंत्र ऐकू येतात. दररोजचं हे असं घडतं खरं. मला भगवद्गीतेचे श्लोक व श्रीरामरक्षा स्तोत्र म्हणायला, गुणगुणायला फार आवडतं.पूजनीय दादाजींनी गोडी लावली. स्वाध्याय केंद्रामुळे त्यात सातत्य निर्माण झालं. सतत चांगलं, मंगल, पवित्र ऐकण्याचा, वाचण्याचा, शुभ दर्शनाचा छंद लागला की, नकळत वाईट गोष्टींपासून आपलं मन मागे येतं. तिकडे जायला नकार देतं हे असं घडतं. आपलं मन काय काय करतं, कुठे कुठे धाव घेतं तटस्थपणे, साक्षीभावाने बघा, निरीक्षण करा. ही एक सुंदर उपासना आहे, साधना आहे. मनाची शक्ती अफाट आहे. मी अमरनाथ यात्रा केली, चारधाम यात्रा केली. नर्मदा परिक्रमा केली. अंदमानला जाऊन आलो. सिंगापूर, मलेशिया, थायलंडला जाऊन आलो. महाराष्ट्र दर्शन केलं. कर्दळीवन परिक्रमा केली. पू. दादाजींमुळे भक्तिफेरीच्या निमित्ताने भारताच्या कानाकोपर्यात फिरतोय. हे सगळं डोळ्यांनी पाहिलं,
अंतःकरणाने अनुभवलं, अंतर्मनाने आत्मसात केलं, मनाच्या आकाशात साठलं. या आकाशात काय काय साठलंय? मनाच्या आकाशाला मर्यादा नाही. मला वाटलं तेव्हा मी मनाद्वारे या सर्व ठिकाणी शरीराने न जाता पुन्हा पुन्हा मनसोक्त संचार करून आनंद घेतो. 1986 साली अलाहाबादला तीर्थराज मिलनला त्रिवेणी संगमावर 18 दिवस जे पाहिलं, ऐकलं, अनुभवलं ते आता या क्षणी घरात बसून मी आठवतो. कुठे तीर्थराज प्रयाग आणि कुठे श्रीक्षेत्र नाशिक. श्रीक्षेत्र पंढरपूरला खूप वेळा गेलो. आता जेव्हा आठवण येते तेव्हा देह मंदिरात क्षेत्र पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, गाभारा, गाभार्यातील मूर्ती, चंद्रभागा नदी, मंदिरातील भजन, कीर्तनाचे आवाज सगळं जसंच्या तसं साकार होतं. श्रीक्षेत्र शेगाव एवढं नुसतं नाव उच्चारलं तरी श्री गजानन महाराज संस्थानचे साक्षात दर्शन घडते. कर्दळीवन परिक्रमा करताना एकच दिवस गुहेत मुक्काम केला. पण तो प्रसंग जसाच्या तसा अंतरंगात जपला जातो, हवा तेव्हा आठवतो. मुंबईच्या श्रीमद्भगवद्गीता पाठशाळा, माधवबागेत, ठाण्याच्या तत्त्वज्ञान विद्यापीठात, सिन्नर भावसौरभच्या ऋषीकृषी विद्यापीठात अंतर्मनाने मी केव्हाही जातो. दर्शनाचा आनंद घेतो. ईश्वराने या देह मंदिरात आनंदाच्या किती किती योजनांची तरतूद करून ठेवलीय, आपण लाभार्थी बनलं पाहिजे.
आता रविवारीही भरता येणार वीजबिल
सन 1981 च्या मे महिन्यात श्रीक्षेत्र नाशिकच्या हायस्कूल ग्राउंडवर वयस्थ संचलनाचा भव्यदिव्य कार्यक्रम झाला. त्यानंतर आर.पी. विद्यालय पंचवटी येथे पू. दादांनी गीताप्रवचनांचा तीन दिवस मनबुद्धीवर अभिषेक केला. हे सर्व जसंच्या तसं आठवतंय. गिरगाव चौपाटी मुंबईचा 1990 चा पहिला मनुष्य गौरवदिन तेे अद्भुत व अविस्मरणीय दर्शन आजही अंतरंगात जसंच्या तसं साकारतं.
-सावळीराम तिदमे
हे ही वाचा :