लोकशाहीविरोधी कृत्यांना ब्रेक!

जागतिक दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस विशेष

एन. के. कुमार

दहशतवादाचा फटका जगातील अनेक देशांना बसत आहे. त्यामुळे हा प्रश्‍न कोणत्याही एका देशाचा नाही. दहशतवाद जगात सर्वत्र वेगाने पसरत आहे. त्यामुळे जागतिक शांततेला धोका निर्माण झाला आहे. मे 1991 मध्ये कॉंग्रेस पक्षाच्या प्रचारादरम्यान तामिळनाडू राज्यातील श्रीपेरंबुदूर येथे सभेला संबोधित करत असताना दहशतवाद्यांनी भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या घडवून आणली. या घटनेचे औचित्य साधून 21 मे हा दिवस दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिवस म्हणून पाळला जातो. याच दिवशी त्यांची पुण्यतिथी असते. हाच दिवस दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिवस म्हणून संपूर्ण देशात व जगातही पाळला जातो. या देशाचे सर्वांत तरुण पंतप्रधान म्हणून त्यांनी सन 1984 ते सन 1989पर्यंत काम पाहिले. संपूर्ण जगात शांतता प्रस्थापित व्हावी व अहिंसेचा संदेश सर्वत्र पोहोचावा तसेच देशासाठी दहशतवाद विरोधात लढणार्‍या हजारो सैनिकांच्या बलिदानाचा सन्मान करणे, भावी पिढीला मूलगामी प्रभावापासून वाचविणे, त्यांच्या मनामध्ये देशाच्या प्रगतीसाठी, संरक्षणासाठी जागरूकता निर्माण करणे, हे देखील या दिवसाचे उद्देश आहे. या मानवनिर्मित उपद्रवी कृत्यांची जॉन क्रेटम यांनी अशी व्याख्या केली- आपल्या राजकीय मागण्या जबरदस्तीने मान्य करून घेण्यासाठी विशिष्ट समूहात आत्यंतिक भीती निर्माण करण्याच्या हेतूने एखादी व्यक्ती किंवा गट यांनी प्रस्थापित सत्तेच्या बाजूने किंवा विरोधात चालविलेला हिंसाचार किंवा निर्माण केलेला धाक म्हणजे दहशतवाद होय.

आज सर्व जगच दहशतीच्या छायेखाली सापडलेले असून, कोणत्या ठिकाणी कधी हल्ला होईल? याची सततची टांगती तलवार प्रत्येकाच्या डोक्यावर लटकत असते. कोणता मनुष्य आज सुरक्षित आहे, हे खात्रीपूर्वक सांगणे कठीण झालेले आहे. मुंबई, दिल्लीसारख्या मोठ्या शहरांतील माणूस सकाळी घराबाहेर पडला तर संध्याकाळी तो सुखरूप घरी परतेल का? याची खात्री देता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. भारतातील दहशतवादाचा विचार केला तर अनेक वेळा दहशतवादी हल्ले झालेले आहेत. मग तो मुंबई लोकल ट्रेनमधील साखळी बॉम्ब हल्ला असेल, सीएसटी रेल्वेस्टेशनवर तसेच हॉटेल ताज, हॉटेल ओबेरॉय येथील हल्ला असेल. या देशाचा मानबिंदू म्हणून ज्याकडे आदराने पाहिले जाते; त्या पवित्र संसदेवर देखील अतिरेक्यांनी हल्ला केला. तसेच उरी वा पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या गाड्यांच्या ताफ्यावर झालेला हल्ला असेल, असे वर्षानुवर्षे दहशतवादी प्रवृत्ती हल्ले करत आहे. जम्मू-काश्मीर येथे नियमित असे हल्ले होत आहेत. त्यामुळे हजारो निरपराध नागरिक, कर्तव्यावरील भारतीय सैनिक पोलीस दल यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

विशेषतः दहशतवादाचे स्वरूप असे असू शकते- संघटित, नियोजित व हिंसात्मक कृती करणे, राजकीय हेतूने प्रेरित होणे, बळजबरी व धमक्या देण्यासाठी शस्त्रांचा वापर करणे, लक्ष्य हे निवडक आणि निश्चित असणे, लोकशाहीविरोधी कृत्य घडविणे, मानवीहक्कांचा भंग करणे. याच गोष्टी स्थानिक ते वैश्‍विक स्वरूप धारण करू शकतात. यास कारणीभूत काही ढोबळ कारणे अशी : 1) आंतरराष्ट्रीय कारणे- राजनैतिक मार्गाने उद्दिष्टे साध्य होत नाहीत म्हणून शत्रू राष्ट्रावर मात करण्यासाठी दहशतवाद अंगीकारला जातो. मूलतत्त्ववादी व धार्मिक कट्टरवादी हे दहशत निर्माण करून आपल्या उद्दिष्टांचा व धार्मिक तत्त्वांचा अंगीकार करू इच्छितात. छोट्या राष्ट्रांना बड्या राष्ट्रांबरोबर युद्ध करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने दहशतवादाचा मार्ग त्यांना फायदेशीर वाटतो. लष्करी सामर्थ्य वाढविण्यापेक्षा दहशतवादास पाठिंबा देणे सोपे असते. उदाहरणार्थ- पाकिस्तानचा काश्मीरमध्ये चालू असलेला सरकार पुरस्कृत दहशतवाद. वाढते नागरीकीकरण व शहरीकरण यामुळे होणारा त्रास. 2) सामाजिक कारणे- बेकारी, सामाजिक असुरक्षिततेची भावना, सुसंवादाचा अभाव, दुसर्‍याबद्दल संकुचित वृत्ती व स्पर्धात्मक भावना ठेवणे. 3) आर्थिक कारणे- दारिद्य्र, लुटारू वृत्ती व पैशाची हाव, अमली पदार्थाची तस्करी, आर्थिक विषमता तसेच विकासातील विषमता, काळा पैसा आदी. 4) राजकीय कारणे- सत्ताकांक्षा, शासनाची उदासीन प्रवॄत्ती व फुटीरवादी चळवळीस प्रोत्साहन, सरकारकडून अपेक्षाभंग, राजकीय बजबजपुरी इत्यादी. 5) तांत्रिक कारणे- अत्याधुनिक शस्त्रे व साधने यांची सहज उपलब्धता, आधुनिक दळणवळण सुविधा व प्रगत संदेशवहन सहज शक्य होणे आदी. 6) इतर कारणे- लोकशाही व्यवस्थेचा अभाव, असहिष्णुता, धार्मिक व वंशिक विद्वेष इत्यादी सांगता येतील.

या व अशा उपद्वापामुळे मानवास भोगावे लागणारे दुष्परिणाम असे- दहशतवादामुळे सामाजिक तसेच राष्ट्राच्या सुरक्षिततेची भावना धोक्यात येते. संरक्षणावरील खर्च वाढून राष्ट्राच्या विकासाची गती मंद होते. दहशतवादी कारवायांमुळे राष्ट्राच्या संपत्तीचे अतोनात नुकसान होते. राष्ट्राच्या विकासाकडे दुर्लक्ष होते. दहशतवादाची शिकार झालेल्या बांधवांची कुटुंबेच्या कुटुंबे उद्ध्वस्त होतात. अनेक लोकांना प्राण गमवावे लागतात. एकूणच राष्ट्राची व शेवटी जागतिक सुरक्षितता भंग पावते. आजच्या स्थितीला संपूर्ण जगात ज्या-ज्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, त्यापैकी सर्वांत मोठी व अवघड समस्या म्हणजे दहशतवाद व हिंसाचार आहे. या दहशतवादामुळेच संपूर्ण जगाची शांतता भंग पावली आहे. फार मोठ्या प्रमाणावर सामाजिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्येने देशाची फार मोठी आर्थिक हानी केलेली आहे. दहशतवाद व हिंसाचार याचे मूळ हे धार्मिक महत्त्वाकांक्षेत आहे. आपला धर्म हा सर्वांत श्रेष्ठ आहे. त्या धर्माचा प्रचार व प्रसार व्हावा, हा यामागील सर्वांत मोठा हेतू आहे. त्यासाठी अत्यंत विषारी आणि विखारी प्रचार मोठ्या प्रमाणावर केला जातो, म्हणून दहशतवाद निर्माण करणारी देशभर पसरलेली केंद्रे संपवणे व धर्मांधतेला प्रोत्साहन देणार्‍या संस्था, संघटनांची दुकाने बंद करणे आवश्यक आहे. झटपट श्रीमंती, वजनदारपणा, अधिकार व सत्ता हस्तगत लोलुपता याही गोष्टींना हाणून पाडणे आवश्यक राहील. यासाठी जनतेने जागरूक राहून वागले पाहिजे. जागतिक दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिन सप्ताहनिमित्ताने सर्वांना दक्षतावर्धक हार्दिक शुभेच्छा!!

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *