विधवांच्या सामाजिक सन्मानाचा महिला धोरणात अंतर्भाव करणार

– ॲड. यशोमती ठाकूर
समाजातील विधवा महिलांना त्यांच्या पतीच्या निधनानंतर अपमानास्पद वागणूक दिली जाते. मुख्य म्हणजे तिच्या शरीरावर असलेले सौभाग्य लेणे म्हणजे बांगड्या मंगळसूत्र आणि कपाळावरील कुंकू काढून घेतले जाते, या अपमानास्पद अनिष्ट प्रथे विरोधात हेरवाडच्या ग्रामपंचायतीने केलेला ठराव हा स्तुत्य आहे. हा ठराव राज्याच्या महिला धोरणात कसा अंतर्भाव करता येईल आणि राज्यातील सर्व विधवा महिलांना कशी सन्मानजनक वागणूक मिळेल, यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री ठाकूर यांनी दिली. हेरवाडच्या ग्रामपंचायत सदस्यांनी ॲड. ठाकूर यांची आज मुंबई येथे भेट घेतली या भेटीनंतर त्या बोलत होत्या.
कोल्हापूर जिल्ह्यातील सदस्यांनी अतिशय महत्त्वाचा आणि पुरोगामीत्वाचा दाखला देणारा ठराव केला आहे. ग्रामसभेने ठराव करून गावातील विधवा महिलांना यापुढे सन्मानाची वागणूक मिळण्यासाठी त्यांच्या अंगावरील मंगळसूत्र बांगड्या आणि कपाळावरील कुंकू न पुसण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे. या निर्णयाचे महाराष्ट्र राज्यात विविध स्तरावर कौतुक आणि स्वागत होत आहे. या निर्णयाचे रूपांतर कायद्यात करता येईल का? अशी विनंती करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांनी आज राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळेही आवर्जून उपस्थित होत्या. यावेळी बोलताना एडवोकेट ठाकूर म्हणाल्या की, “हा अतिशय चांगला निर्णय असून तो राज्यभर कसा अमलात आणता येईल, यासाठी लवकरच येणाऱ्या राज्याच्या महिला धोरणात त्याचा अंतर्भाव केल्यास सर्वांच्या अंगवळणी पडेल आणि त्याचा खूप चांगला परिणाम दिसेल. त्यामुळे येणाऱ्या महिला धोरणात त्याचा कसा अंतर्भाव करता येईल, यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन ॲड. ठाकूर यांनी यावेळी दिले.
हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *