‘अल-कायदा’चा धोका

अमेरिकेच्या इतिहासात सप्टेंबर महिना 2001 च्या दहशतवादी हल्ल्यामुळे कायम स्मरणात राहणारा आहे, तर इजिप्त व सीरियाने 1973 साली केलेल्या हल्ल्यामुळे ऑक्टोबर महिना इस्राईलच्या स्मरणात राहणारा आहे. यंदाचा सप्टेंबर संपून ऑक्टोबर उजाडण्याची वेळ आलेली असतानाच पश्चिम आशियातील फ्लायदुबई कंपनीच्या एफझेड 1073 या विमानाचे अपहरण करून घातपात घडवण्याचा प्रयत्न झाला. भारतीय वंशाचे वैमानिक (पायलट) स्मित मच्छार यांनी मोठ्या धैर्याने हा प्रयत्न उधळून लावल्यामुळे विमानातील 174 जणांचे प्राण वाचले. त्यात सुमारे 150 इस्रायली होते. मच्छार यांचे जगभर कौतुक होत आहे. त्यांच्यावर हल्ला करणारा सहवैमानिक (को-पायलट) हमाम अल-हम्मामी याचा इराणशी संबंध आहे का, याचा शोध सुरू असताना त्याचे अल-कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे समोर आले. दि. 30 सप्टेंबर 2026 रोजी दुबईहून इस्राईलमधील तेल अवीवकडे निघालेल्या विमानात कॅप्टन मच्छार यांना अत्यंत थरारक प्रसंगाचा सामना करावा लागला. ओमानचा नागरिक असलेल्या सहवैमानिकाने कॉकपिटमध्येच त्यांच्यावर कुर्‍हाडीने प्राणघातक हल्ला करून विमान पाडण्याचा किंवा अपहरण करण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी होऊनही मच्छार यांनी प्रसंगावधान राखून विमानातील सर्वांचे प्राण वाचवले. उड्डाणानंतर सुरुवातीला परिस्थिती सामान्य होती, पण काही वेळाने सहवैमानिकाने नमाज पठण करायचे असल्याचे सांगितले. मच्छार यांनी त्याच्या धार्मिक भावनेचा आदर करत समोर पाहणे सुरू ठेवले. मात्र, अवघ्या काही मिनिटांतच त्याने हल्ला केला. त्यानंतर विमानाचे नियंत्रण स्वतःकडे घेऊन तो विमान वेगाने खाली नेऊ लागला. इस्रायली अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार विमान एका मिनिटात सुमारे 33,000 फुटांवरून 17,000 फुटांपर्यंत खाली आले. प्रवासी ओरडत होते, तर कॅप्टन मच्छार गंभीर जखमी होऊन पडलेले होते आणि त्यांची दृष्टीही अंधुक झाली होती. तरीही स्वतःला सावरत त्यांनी शेवटचा प्रयत्न म्हणून कॉकपिटचा दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच बाहेर असलेले प्रवासी, ऑफ-ड्यूटी वैमानिक, डॉक्टर व प्लंबर कॉकपिटमध्ये घुसले व त्यांनी सहवैमानिकावर कब्जा मिळवला. त्यानंतर सुटीवरील वैमानिकांनी विमान सौदी अरेबियातील तबूक विमानतळावर सुरक्षितपणे उतरवले. सौदी अधिकार्‍यांनी सहवैमानिकाला ताब्यात घेतले. हा जीवघेणा प्रसंग मच्छार यांनीच कथन केला. ते अबू धाबीतील रुग्णालयात उपचार घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉलद्वारे त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या धाडसाचे कौतुक केले. इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी त्यांना खरा हीरो संबोधून त्यांचे कौतुक केले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही त्यांची प्रशंसा केली. मच्छार गुजरातचे असल्याने गुजरात सरकारने त्यांना मानाचा ‘गुजरात गरिमा’ पुरस्कार जाहीर केला, तर मॅनकाइंड फार्मा कंपनीने त्यांच्या शौर्याबद्दल एक कोटी रुपयांचे बक्षीस घोषित केले. पश्चिम आशियातील अमेरिका-इस्राईल व इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सहवैमानिक कट्टरपंथी असावा व त्याचा इराणशी काही संबंध आहे का, याचा तपास सुरक्षा यंत्रणा करत आहेत. अल-कायदाने 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेवर हल्ला केला होता. त्यावेळी 19 अपहरणकर्त्यांनी अमेरिकेतील चार प्रवासी विमानांचे अपहरण करून आत्मघाती हल्ला घडवून आणला. त्यात न्यू यॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतींना, तसेच अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय असलेल्या पेंटागॉनलाही धडक देण्यात आली. या हल्ल्यात 19 अपहरणकर्त्यांसह 2,996 जणांचा मृत्यू झाला. जगभर 9/11 म्हणून ओळखल्या जाणार्‍या या हल्ल्याचे दरवर्षी 11 सप्टेंबरला स्मरण केले जाते. त्याच धर्तीवर इस्राईलमध्ये हल्ला करण्याचा कट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, हमाम अल-हम्मामीच्या समाजमाध्यमावरील खात्यावर अल- कायदाशी संबंधित प्रतिमा आढळल्याचे समोर आले आहे. त्याच्या कट्टरतावादी विचारांमुळे ओमान एअरने त्याला उड्डाणाच्या कामावरून हटवून प्रशासकीय कामावर ठेवले होते, तरीही सुरक्षा यंत्रणांतील त्रुटींचा फायदा घेऊन त्याने सुमारे आठ महिन्यांपूर्वी फ्लायदुबईमध्ये नोकरी मिळवली. विमान इस्राईलला जात असल्याने भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला या घातपातामागे इराणचा हात असल्याचा संशय व्यक्त झाला. 7 ऑक्टोबर 2023 च्या हमासच्या हल्ल्याचा संबंध 6 ऑक्टोबर 1973 च्या ‘योम किप्पूर’ युद्धाशी जोडला जातो. कारण हमासने हा हल्ला त्या युद्धाच्या 50 व्या वर्षपूर्तीच्या दुसर्‍याच दिवशी केला. 1973 मध्ये इस्रायली जनता आपला पवित्र सण ‘योम किप्पूर’ साजरा करत असताना इजिप्त व सीरियाने इस्राईलवर असाच अचानक व मोठा हल्ला केला होता. यहुदी (ज्यू) धर्मीयांचा हा वर्षातील सर्वांत पवित्र धार्मिक सण असून, हिब्रू भाषेत ‘योम’ म्हणजे दिवस व ‘किप्पूर’ म्हणजे प्रायश्चित्त, म्हणजेच ‘प्रायश्चित्ताचा दिवस’. ऑक्टोबर सुरू होण्याच्या एक दिवस आधी झालेल्या या विमान अपहरणाच्या प्रयत्नातील हमाम अल-हम्मामीचे अल-कायदाशी असलेले कथित संबंध धोकादायक आहेत. या संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेन पाकिस्तानात लपून बसला होता. अमेरिकेने 2 मे 2011 रोजी अबोटाबाद येथे गुप्त लष्करी मोहिमेद्वारे त्याचा खात्मा केला. त्यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष डेमोक्रॅटिक पक्षाचे बराक ओबामा होते. लादेननंतर त्याचा उत्तराधिकारी आयमन अल-जवाहिरीसारखे नेतेही मारले गेले. तरी अल-कायदा आजही विकेंद्रित नेटवर्कच्या स्वरूपात अस्तित्वात असून, सैफ अल-अदेल हा त्याचा अघोषित प्रमुख मानला जातो.

The Threat from Al-Qaeda

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *