गोेदेच्या पाणी नमुन्यांची होणार तपासणी

अहवाल उच्च न्यायालयात सादर होणार; सोमवारी घेतले नमुने

नाशिक : प्रतिनिधी
गोदावरी प्रदूषणासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल अवमान याचिकेवर न्यायालयाने पाण्याचे नमुने घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोमवारी (दि.5) महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मडळाने शहरातील गोदावरीतील तीन ठिकाणचे नमुने घेतले. घेतलेल्या नमुन्यांचा पाणी प्रदूषणाचा अहवाल 13 ऑक्टोबरपूर्वी न्यायालयात सादर केला जाणार आहे.
यावेळी मनपाचे नरेंद्र शिंदे, प्रदूषण मंडळाचे ताराचंद ठाकरे, याचिकाकर्ते राजेश पंडित, निशिकांत पगारे उपस्थित होते. सर्वांत प्रथम गोदावरी-कपिला संगम येथील पाण्याचे नमुने घेण्यात आले. त्यानंतर गोदावरी- नंदिनी संगम व दसक घाट येथील पाण्याचे नमुने घेण्यात आले. घेतलेल्या नमुन्यांची महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ स्वतंत्रपणे तपासणी करून तपासणी अहवाल उच्च न्यायालयात सादर करणार आहे. या तपासणीत पाण्यातील ऑक्सिजन क्षमतेसह पूरक घटक तपासले जाणार आहेत. न्यायालयाने दोन महिन्यांपूर्वीच गोदावरीतील पाण्याचे नमुने घेण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यावेळी गंगापूर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे गोदावरीला पुराचे पाणी होते. त्यामुळे नदी प्रदूषित आहे का नाही? हे तपासणीत निष्पन्न झाले नसते. याकरिता न्यायालयाने दोन महिने मुदतवाढ दिली होती. दरम्यान, गोदावरी प्रदूषणावरून पर्यावरणप्रेमींसह नागरिक वारंवार तक्रार करत असल्याचे चित्र आहे.
सिंहस्थ कुंभमेळा गोदावरीकाठी भरतो. त्याच नदीला प्रदूषणाने विळखा घातल्याचे चित्र आहे. या प्रकरणात महापालिका प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कुठल्याच उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. 22 जुलै 2026 रोजी न्यायमूर्ती ए. एस. गडकरी व न्यायमूर्ती कमल खट्टा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली होती. त्यावेळी याचिकेच्या सुनावणीवेळी न्यायालयाने महापालिकेवर ताशेरे ओढले
होते.

अहवालाकडे लक्ष
उच्च न्यायालयात पाणी नमुन्याचा अहवाल सादर केला जाणार आहे. याकडे पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे. रामकुंडासह गोदावरीत कोट्यवधी भाविक डुंबकी मारतात. परंतु नदीची अवस्था प्रदूषित झाल्याने नागरिकांची तीव्र नाराजी आहे. त्यामुळेच न्यायालयात सादर केल्या जाणार्‍या अहवालाकडे आता लक्ष लागले आहे.

Godavari water samples to be tested.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *