नाशिक

संपन्नांच्या सामर्थ्याचे सार्थक समग्र मानवकल्याणातच

लोहाणा महाजनवाडीच्या उद्घाटनप्रसंगी पू. दीदींनी दिला विचार

नाशिक : विशेष प्रतिनीधी
“संपन्न घटकांनी आपल्या संपत्तीचा, बुद्धीचा आणि कार्यक्षमतेचा उपयोग समग्र मानवकल्याणासाठी करावा आणि वंचितांना केवळ मदतीचा हात न देता सन्मानाने स्वतःच्या पायावर उभे करावे, त्यांनी आपले सामर्थ्य माणसाला माणूस म्हणून उभे करण्यासाठी वापरणे, हाच खर्‍या सेवेचा अर्थ आहे”, असा विचार स्वाध्याय परिवाराच्या पूज्य धनश्रीदीदी यांनी नाशिक येथील ‘ठक्कर राघवजी देवजी लोहाणा महाजनवाडी’च्या उद्घाटनप्रसंगी जमलेल्या लोहाणा समाजबांधवांपुढे मांडला. ‘सरकार माणूस घडवत नाही आणि जो माणूस आहे, त्याला माणूस म्हणून टिकूही देत नाही,’ असे परखड मत व्यक्त करत त्यांनी माणसातील चांगुलपणा जागवण्याची आणि त्याला स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव करून देण्याची गरज अधोरेखित केली. प्रत्येक व्यक्तीतील ईश्वरी तत्त्व ओळखून जात, पंथ आणि सामाजिक भेदांच्या पलीकडे माणसामाणसांत आत्मीयतेचे नाते निर्माण करणे, निष्ठा व संघटनातून एकात्मता साधणे आणि प्रसिद्धी-प्रतिष्ठेची अपेक्षा न ठेवता निःस्वार्थ भावनेने समाजासाठी कार्य करणे, हेच सामाजिक परिवर्तनाचे सूत्र असल्याचा संदेशही त्यांनी यावेळी दिला.
आकाशवाणी परिसरात लोहाणा महाजनवाडी या वास्तूचे उद्घाटन पू. दीदींच्या हस्ते रविवारी (दि. 11) सायंकाळी करण्यात आले. यावेळी वल्लभकुल आचार्य परेशकुमार गोस्वामी, लोहाणा महापरिषदेचे अध्यक्ष सतीश विठलाणी, विश्वस्त अ‍ॅड. महेंद्र घेलाणी, जितूभाई ठक्कर आणि लोहाणा समाजातील मान्यवर उपस्थित होते.
पूज्य धनश्रीदीदी यांनी बोलताना ‘शासनाच्या योजना, शिक्षण आणि कौशल्यविकास यांना महत्त्व असले, तरी व्यक्तीच्या अंतर्मनातील सद्भाावना जागृत करून त्याला स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव करून देणे, हे व्यापक सामाजिक परिवर्तनाचे खरे सूत्र आहे’, असा विचार त्यांनी मांडला. ‘वंचित घटकांना केवळ मदत देण्याऐवजी त्यांच्याशी आपुलकीचे नाते जोडून, त्यांना शिक्षण आणि समज देऊन स्वावलंबी बनवणे आवश्यक आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले. ‘संनिष्ठा, संगठन आणि सेवेतून सिद्धी’ ही लोहाणा समाजाच्या ब्रीदवाक्यातील संकल्पना विशद करताना त्या म्हणाल्या, ‘निष्ठा केवळ एखाद्या व्यक्ती, संस्था किंवा समाजापुरती मर्यादित न राहता ईश्वरी तत्त्वाशी जोडली गेली ती संनिष्ठा बनते. संघटन म्हणजे केवळ एकत्र जमणे नव्हे, तर परस्परांमध्ये मैत्री, आत्मीयता आणि एकात्मता निर्माण करणे होय. जात, धर्म, वर्ण, शिक्षण किंवा सामाजिक स्थान यांतील भेद बाजूला ठेवून प्रत्येक व्यक्तीतील समान ईश्वरी तत्त्व ओळखले, तर खर्‍या अर्थाने संघटन उभे राहू शकते’, असे त्यांनी प्रतिपादन केले. सामाजिक कार्यामागे प्रसिद्धी, प्रतिष्ठा किंवा वैयक्तिक लाभाचा हेतू नसावा. गरजूंच्या गरजा समजून घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचणे, त्यांना सन्मानाची वागणूक देणे आणि समाजातील संपन्न घटकांनी आपल्या सामर्थ्याचा उपयोग व्यापक मानवकल्याणासाठी करणे, हाच खर्‍या सेवेचा अर्थ असल्याचा संदेश त्यांनी दिला.
आचार्य परेशकुमार गोस्वामी यांनी ‘संघटनशक्ती हा आजच्या युगाचा मंत्र असून ही महाजनवाडी त्याचे प्रतीक ठरेल,’ अशी आशा व्यक्त केली. विठलानी यांनी यावेळी लोहाणा महापरिषदेच्या जगभर चाललेल्या कार्याची विस्तृत माहिती दिली. ‘महाजनवाडी हे केवळ एक संकुल नव्हे, तर संकल्प आणि संघटन यांची पुढील पिढ्यासाठी प्रेरणा ठरेल’, असा विश्वास विठलानी यांनी व्यक्त केला. जितूभाई ठक्कर यांनी महाजनवाडीच्या उभारणीचा प्रवास उपस्थितांना कथन केला. ‘पू. पांडुरंगशास्त्री आठवले अर्थात दादाजींच्या विचारांचा स्पर्श असल्यानेच हे काम सिद्ध होऊ शकले. भगवान माझ्यासोबत आहे ही भावना जोवर पक्की होत नाही तोवर आपल्या कामाचा ब्रँड तयार होणार नाही’, अशी भावनाही ठक्कर यांनी व्यक्त केली. महाजनवाडीच्या माध्यमातून लोहाणा समाजासाठी हाती घेण्यात येणार्‍या उपक्रमांची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
लोहाणा महाजनवाडीचे नाशिक अध्यक्ष चेतन बाटविया यांनी प्रास्ताविक केले. महाजनवाडीसाठी योगदान देणार्‍या विविध लोहाणा परिवारांना मानपत्र देऊन यावेळी गौरविण्यात आले.

पणजोबांच्या रूपात व्रज
ज्यांच्यामुळे ठक्कर परिवार नाशिकस्थित झाला आणि या महाजनवाडीसाठी ज्यांनी जागा दिली त्या मनोहरदास ठक्कर यांचे या सोहळ्यात अनोख्या रीतीने कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यात आले. जितूभाई ठक्कर यांचे नातू व्रज याने त्यांच्या वडिलांचा अर्थात मनोहरदास यांचा पेहराव करून उपस्थितांशी
उत्स्फूर्त संवाद साधला. व्रजने पणजोबांचे रूप घेत अस्खलीत गुजरातीत बोलून उपस्थित सर्वांचेच कौतुक मिळवले. महाजनवाडीचे आपले स्वप्न साकारल्याबद्दल जणूकाही जितूभाईंचे वडील त्यांची पाठ थोपटत आहेत, अशा भावना त्याने मांडल्या. व्रजचे भाषण संपल्यावर पू. दीदींनी जागेवरून उठत त्याला आशीर्वाद दिला आणि ‘तू पणजोबांची पगडी घातलीस, ही फार मोठी जबाबदारी आहे’, अशी जाणीवही करून दिली.

The true worth of the power possessed by the affluent lies solely in the welfare of humanity as a whole.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मोहदरी घाटात कंटेनर उलटला; नाशिक-पुणे महामार्ग ठप्प!

समोरील टायर फुटल्याने अपघात सिन्नर : प्रतिनिधी नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात शुक्रवारी (दि. 16) सकाळी…

5 minutes ago

दुष्काळाने त्र्यंबकनगरीवर पाणीकपातीचे सावट

बांधकामांवर पाण्याचा वारेमाप वापर, सिंहस्थ कुंभमेळ्यावरही परिणाम त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी पावसाने वेळेआधीच माघार घेतल्याने आणि…

11 minutes ago

टोमॅटोची ‘लाली’ घसरली; निर्यातबंदीचा फटका

निफाड : तालुका प्रतिनिधी यंदा अत्यल्प पाऊस असतानाही शेतकर्‍यांनी महागडी औषधे, कीटकनाशके व पोषकांची फवारणी…

17 minutes ago

पिंपळगाव धूम येथे बिबट्याचा तरुणावर हल्ला

नागरिकांच्या धाडसामुळे टळला अनर्थ; भीतीचे वातावरण दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी तालुक्यातील पिंपळगाव धूम येथे बिबट्याने…

22 minutes ago

संविधान बचाव समितीचा तिरंगा मोर्चा

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी मालेगाव : प्रतिनिधी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीसह मतदार यादीच्या…

27 minutes ago

सिडकोत अतिक्रमणांवर कारवाई

तीन ट्रक विविध साहित्य जप्त सिडको : प्रतिनिधी सिडको विभागातील फुटपाथवर करण्यात आलेल्या अनधिकृत अतिक्रमणांविरोधात…

30 minutes ago